महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,578

गोपाळगड | Gopalgad Fort

By Discover Maharashtra Views: 3803 4 Min Read

गोपाळगड | Gopalgad Fort

मुंबई ते गुहागर हे अंतर साधारण २७० कि.मी आहे. गुहागरहून १४ कि.मी वर अंजनवेल गावात गोपाळगड (Gopalgad Fort) उर्फ अंजनवेलचा किल्ला आहे. गुहागरहून बसने आल्यास अंजनवेल गावातून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो. किल्ल्याजवळील पठारापर्यंत गाडीने जाता येते. ह्या रस्त्याने आपण किल्ल्याला वळसा घालून पश्चिमेकडच्या तटबंदीतील छोट्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हा किल्ला एका छोट्या टेकाडावर बांधला आहे. टेकडीवरुन दोन बाजूंनी भक्कम तटबंदी खाली नेलेली दिसते. त्याच्या खालच्या भागाला पडकोट म्हणतात. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या ह्या किल्ल्यावर जमिनीकडून आक्रमण झाल्यास संरक्षणार्थ खोल खंदक खोदलेला आहे. जमिनीकडील बाजूला किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. त्यावर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. सगळ्यात वरच्या भागाला सात मीटर उंच व अडीच मीटर रुंद तट आहे.

गडाला दोन प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एक पूर्वेकडे आहे तर दुसरे पश्चिमेकडे. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस पहारेकर्यां्च्या देवड्या आहेत. ह्या व्यतिरीक्त किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, धान्य व दारु कोठारे त्याजवळील बांधीव तलाब आणि छोटी-मोठी घरांची जोती, तीन विहीरी असे अवशेष आपल्याला दिसतात. विहीरी असल्या तरी त्या आता पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. ७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या Gopalgad Fort किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता अस्तित्वात नाही.त्यावरील लेखाचा मराठी अर्थ असा- जर कोणी एखादे बांधकाम हातात घेतले व ते चालू असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याची मालकी दुसऱ्याकडे जात नाही का ? केवळ देव कालातीत आहे. त्याव्यतिरिक्त सगळे नश्वर आहे. जगाचा प्रकाश असणाऱ्या आमच्या राजाने ह्या किल्ल्याचे निर्माण योजले होते पण ते पाहण्यापूर्वी तो मरण पावला. दिनांक १० हिजरी सन १११९ म्हणजे इसवीसन १७०७. हा गड वरचा कोट, बालेकोट व पडकोट ह्यांचा मिळून बनलेला आहे.

पडकोटाचा भाग म्हणजे समुद्रकिनार्याोपर्यंत जाणारी ही दुहेरी तटबंदी , १६९९ मध्ये सिध्दी खैरतखानाने बांधली. सन १७४४ मधे तुळाजी आंग्रेने सिद्दीकडून का किल्ला जिंकून घेतल्यावर बालेकोट बांधला. ह्या दोन तटांमुळे संपूर्ण किल्ल्याचे तीन भाग झाले आहेत. परकोटाच्या टोकाला समुद्राकडील बाजूस कमानी आहेत. त्याच्या बाजूस चोर दरवाजा आहे आणि त्याच्या समोरच एक खराब पाण्याचं टाकं आहे. परकोटाला समुद्राच्या बाजूने शिरण्यासाठी दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर बालेकोटा पर्यंत तटाबुरूजांचे बांधकाम आज भग्नावस्थेत आहे. या परकोटामध्ये ही चोरदरवाजाच्या जवळ खराब पाण्याचं टाकं आहे. गडाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर कातळात खोदलेली पायर्यांआची विहीर आहे. या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य आहे. प्राचिन काळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरपासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या मुखावर विजापूरच्या आदिलशाही राजवटीमधे सोळाव्या शतकात अंजनवेलचा किल्ला /गोपाळगड बांधण्यात आला.

मूळ किल्ल्यात अनेक राज्यकर्त्यांनी भर घालून Gopalgad Fort किल्ला वाढवला, मजबूत केला. शिवाजी महाराजांनी इ.स १६६० च्या दाभोळ स्वारीवेळी अंजनवेलचा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला व याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली व किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स १६९९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी खर्यातखान याने किल्ला जिंकला व पुढील ४६ वर्षे तो त्याच्या ताब्यात होता. याच काळात किल्ल्याचा पडकोट बांधण्यात आला व वर उल्लेख केलेला शिलालेख कोरण्यात आला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. सन १७५५ च्या पेशवे आंग्रे करारानुसार आंग्रेने हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. पानिपतच्या युध्दानंतर सदाशिव भाऊंचा तोतया बनून आलेल्याने ६ महीने किल्ला स्वत:कडे ठेवला. त्यानंतर मात्र १८१८ पर्यंत तो मराठ्यांकडे राहीला.१७ मे १८१८ मधे इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. सन १८२९ पर्यंत इथे इंग्रजांचा सैनिकी तळ होता. सन १८६२ मधील एका साधनात ह्या किल्ल्यात ८८ तोफा असल्याचा उल्लेख सापडतो. दुर्भाग्यवश आज त्यातील एकही तोफ तिथे दिसत नाही.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment