गुढ शिल्पे, गोकुळेश्वर, चारठाणा –
काही मंदिरांवर तंत्रमार्गी, अघोरपंथी, शाक्तपंथी अशी शिल्पे कोरलेली आढळून येतात. त्यांचा अर्थ त्या संप्रदायातील एखाद्या कृतीशी निगडीत असतो. पण सामान्य दर्शकाला मात्र कळत नाही. हे गुढ शिल्पे, गोकुळेश्वर, चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथील गोकूळेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावरील आहे. यात एकुण पाच मानवी आकृती दिसून येतात. पण पाय मात्र ८ आहेत. दोन्ही टोकाच्या दोन स्त्रीया आहेत. अगदी मधला पुरूष आहे. पण त्या बाजूचे दोन कोण हे चटकन कळत नाहीत. कारण त्यांचे केस स्त्रीयांसारखे मागे बांधलेले आहेत. पण छाती सपाट दाखवली असल्याने त्यांना स्त्री संबोधता येत नाही.
मधल्यांनी बाजूच्यांच्या डोक्यावर हात ठेवले आहेत. शिवाय सर्वात मधल्याचे वाटणारे दोन्ही हात बाजूच्या स्त्रीयांच्या हातात आहेत. हेच हात मधल्या पुरूषांचेही भासतात. पायासोबतच हाताचीही संख्या आठच आहे.
यातील टोकाच्या स्त्रीया स्वतंत्र आहेत. मधले तीनही एकमेकात अडकलेले आहेत. एक तर्क असा मांडता येतो. पुरूषाच्या उजव्या बाजूस त्याची शक्ती असते आणि डाव्या बाजूस पत्नी (वामांगी). बहूतेक देवतांच्या बाबत हे शिल्पांकित केलेले आढळून येते. येथे सामान्य पुरूषाच्या बाबतीतही हे सुचित केले असावे. आणि आज कार्टून काढताना जशी चलचित्र काढली जातात तसे उजवीकडचे चित्र पहिले, दूसरे चित्र दोन्ही स्त्रीयांचे हात हाती घेतलेले. आणि तिसरे मग पूर्णत: डावीकडच्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला असे. मधला पुरूष एकच असावा. फक्त तीन अवस्थांत दाखवला आहे. याला एक गती आहे. ही नृत्यातीलही एक गतीमान अशी मुद्रा असू शकते. कारण डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात टिपरी सारखे काही दिसत आहे. याचा तंत्रमार्गातही काही वेगळा अर्थ असू शकेल. केसांची आणि पायांची रचना यातून पुरूषांत स्त्रीचा अंश आहे असेही सुचवायचे असावे.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद