पुरुष गुलाम व स्त्री कुणबीण बटिक –
टीप:- मराठेशाहीतील कागदपत्रात येणारा कुणबीण हा शब्द जातीवाचक नसून हा शब्द स्त्री गुलाम किंवा बटिक या अर्थाने येतो.
**पेशवे दफ्तर खंड ४२ **मधील असलेल्या एका नोंदीत तत्कालीन समाजव्यवस्थेत असलेली गुलामगिरी याविषयीची महत्वाची माहिती मिळते. त्यात असलेली ३० कलमे किंवा नोंदी अभ्यासल्यास तत्कालीन जीवनपद्धतीत गुलामांचे जीवन , त्यांच्या समस्या व समाजाचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टीकोन याविषयी माहिती मिळते.
गुलाम किंवा कुणबिणी म्हणजे कोण व त्या कश्या केल्या जात असत :-
पुरुष जातीतील व्यक्तीस गुलाम म्हणून संबोधले जाई तर स्त्री जातीतील व्यक्तीस बटिक अथवा कुणबीण संबोधले जाई.
तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार ब्राम्हण जातीतील व्यक्तीस गुलाम करत नसत. तसेच तत्कालीन शूद्र जातीतील व्यक्तीस हि गुलाम करत नसत. परंतु गुलाम न करण्याची कारणे मात्र भिन्न होती. ब्राम्हण जात हि श्रेष्ठ तर शूद्र जातीतील व्यक्ती उच्च वर्णीय व्यक्तीच्या घरी गुलाम म्हणून राबल्यास शिवाशिव होणार म्हणजे विटाळ होणार.त्यामुळे त्यांना गुलाम केले जात नसे. म्हणजे या दोन जाती व्यतिरिक्त इतर जातीतील लोक गुलाम केले जात. ( कलम १ )
उच्च जातीतील गुलाम व्यक्ती कनिष्ट जातीतील व्यक्तीच्या घरी गुलाम म्हणून राहत नसे. पुस्र्ष व्यक्तीस सहसा गुलाम केले जात नसे. कुणबीनीच्या पोटी जन्मास आलेला व्यक्ती गुलाम होत असे. ( कलम २ )
शूद्र किंवा नीच जातीतील स्त्री छीनाल्यास ( व्यभिचारकर्मात ) सापडली असता. तिच्या पतीस किंवा तीला दंडाची रक्कम देण्यास शक्य नसेल किंवा प्रतिष्ठीत व्यक्तीची स्त्री नसल्यास त्या स्त्रीस कुणबीण करून तिला ठेवत असत किंवा दुसऱ्या कोणास विकून टाकत. सदर कृत्य हे तत्कालीन समाजात शास्त्रसमंत नव्हते तरीदेखील जुलमाने जबरदस्तीने कुणबीण करत असत. ( कलम ३ )
लढाईत व गाव लुटण्याच्या वेळेस पुरुषास धरत नसत. परंतु बायका अगर मुलीस धरून आणत व त्यांना कुणबीण करत नंतर त्यांची विक्री केली जाई. मात्तबर पुरुषास पकडून आणल्यास त्याच्याकडून खंडनी घेऊन सोडून देत. ( कलम ४ )
दुष्काळात आईबाप आपल्या मुली विकत त्यांना गुलाम म्हणून विकत घेऊन कुणबीण करत असत. ( कलम ६ )
वाटेत वारसा नसलेले हरवलेले मूल सापडल्यास त्या मुलाचे जो पालनपोषण करेल ती व्यक्ती त्या मुलास गुलाम म्हणून ठेवत असे. ( कलम २९ )
कुणबीणीची खरेदी विक्री करणारे लोक चांगल्या घरातील स्त्रियांना फसवून पळवून आणून कुणबीण म्हणून विकत असत. ( पेशवे दफ्तर खंड ४३ )
गुलामांची कामे :-
गुलाम झालेल्या कुणबीणीस मालक सांगेल ती कामे करावी लागत जसे घोड्याची व मालकाची खीजमत करणे. घर सारवणे. भांडी किंवा कपडे धुणे. शेतात राबणे, गाई गुरे राखणे, दळण कांडण करणे, तसेच काही वेळेस गुलाम म्हणून खरेदी करणारा मालक स्वत:च्या इष्काकरता म्हणजे शारीरिक सुखासाठी कुणबिणीस ठेवत असे. ( कलम २ )
गुलामांची मुक्तता :-
दुष्काळात ज्या मुलास किंवा मुलीस विकत त्यांना त्यांच्या जातीतील लोक मालकास मोबदला देवून त्यांची सुटका करत. व तिचे लग्न लावून देत. परंतु मोबदला देण्यास आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यास मालक दयाळू असल्यास तो विना मोबदला सोडत असे. कुणबीणीस मूल झाल्यास मात्र तिला कोणीही सोडवून घेऊन जात नसे. ( कलम ९ , १० , ११ )
हरवलेल्या मुलाच्या जातीतील व्यक्ती किंवा वारसदार आल्यास त्यास सोडले जाई . मालकास काही धन देवून त्यांची सुटका केली जाई. मुलास १५ वर्ष्यापर्यंत सोडविले जात असे. हरवलेल्या मुलीस तिला मुल झाले नसल्यास सोडविले जात असे .( कलम ३० )
एखाद्या गुलामाने आयुष्यभर गुलामगिरी कबूल केली असल्यास त्याच्याएवजी बदली म्हणून दुसरी व्यक्ती गुलाम म्हणून दिल्यास त्याची सुटका होत असे. ( कलम १३ )
मालकाच्या इच्छेने गुलाम व्यक्तीची मुक्तता होत असे. मालक त्याच्या मृत्यूसमयी गुलामास सोडचिट्ठी देवून मुक्तता करत असे. मुक्तता झाल्यानंतर मालकाचा मुलगा व गुलामाचा संबंध नसे. ( कलम १५ )
गुलामास सरकार दरबारातून मदत मिळत नसे. त्यांना सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसत. जबरदस्तीने अथवा अन्यायपूर्वक गुलामगिरीत आणलेल्या व्यक्तीस सोडवण्यास मदत करत. ( कलम १७ )
गुलाम म्हातारा झाल्यास त्याचा मालक त्यास अन्नवस्त्र देतो . मालक गुलामाचे पोषण करण्यास समर्थ नसल्यास तो गुलामास सोडून देतो. ( कलम २५ )
गुलामांची मुले :-
कुणबीणीच्या पोटी जन्मास येणारी व्यक्ती एकाच पिढीपर्यंत गुलाम असे. त्याच्या आई जी जात असे तीच जात त्या व्यक्तीची असे. ( कलम ५ )
कुणबीणीच्या मुलास मालक दुसऱ्यास विकत असे परंतु गुलामाच्या मुलास मात्र विकता येत नसे. ( कलम १९ )
कुणबीणीचा विवाह झाल्यास तिचे होणार मुल हे गुलामहोत नाही. कुणबीणीने लग्न न करता दुसऱ्याशी संबंध ठेवल्याने मुल झाल्यास कुणबीणीच्या मालकाचा तो गुलाम होतो.
गुलामाने दुसऱ्या स्त्रीशि लग्न न करता संबंध ठेवून मूल झाल्यास ते मुल त्या स्त्रीचे गुलामाचे न्हवे . ( कलम २६ , २७ )
गुलामांना मिळणारी धनसंपदा व कर्ज :-
गुलाम व्यक्तीस कोणत्याही प्रकारे धनप्राप्ती झाल्यास त्याच्या मालक ते धन घेत नसे. मालकाने आपल्या गुलामास मृत्यूपत्रात जे लिहून दिले असेल त्या गोष्टींचा तोगुलाम मालक होत असे. गुलाम मेल्यास मात्र त्याचा मालमत्तेचा वारस त्याच धनी होत असे. ( कलम १५ )
गुलामाकडे धन जमा झाल्यावर तो स्वतःसाठी गुलाम खरेदी करू शकत असे. खरेदी केलेल्या गुलामाने काही पैसे मिळवल्यास तो आपल्या मालकास त्यातून काही देत नसे. ( कलम २१ )
गुलामाने कर्ज घेतल्यास अथवा गुलामाने काही अपराध केल्यास मालक त्यास जबाबदार नसे. (कलम २२ )
शूद्र जातीतील कुणबीनिंचा विटाळ ( पेशवे दफ्तर खंड ४३ )
बाजीराव गोपाळ जोशी यांच्या वाड्यात बाजीराव मोरेश्वर भावे राहत असत. बाजीराव मोरेश्वर यांची कुणबीण होती. चार महिने ती वाड्यात राहत होती परंतु चार महिन्यानंतर ती जातीने चांभार असल्याचे कळले. बाजीराव मोरेश्वर यास प्रायाश्चित घ्यावे लागले. बाजीराव मोरेश्वर यांच्या शेजारी नरहर गोपाळ याचे कुटुंब राहत होते. दोन्ही घरांमध्ये भिंत होती परंतु दोन्ही घराची विहीर हि सामाईक होती त्यामुळे त्यास देखील प्रायाश्चित घ्यावे लागले.
वेगवेगळ्या जातीतील बटिक व पोरगे (पेशवे दफ्तर खंड ४५ )
इ.स. १७४६ साली अधिकारी आवजी कवडे याने साताऱ्यास ५ बटिक व २ पोरगे पाठविल्याची नोंद आढळते . सदर नोंदीत वेवेगळ्या जातीतील व्यक्ती या गुलामम्हणून पाठविल्याची नोंद येते . त्यात गोजरी नावाची बटिक हि कुणबी जातीतील वय वर्ष ३० व १ पोरगा वय वर्ष २ , राधा बटिक जातीची चांगली मराठी वय वर्ष ३० व १ पोरगा वय वर्ष ४ , कृष्णा बटिक हि जातीची पंचाल सोनार वय वर्ष २५ , काशी बटिक हि जातीची रजपूत वय वर्ष ३० , राधा बटिक हि जातीची हाटकर धनगर वय वर्ष २५ .
विशेष टीप :-
मराठेशाहीतील गुलाम याविषयी अधिक नोदी वाचण्यासाठी वाचकांनी बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी , थोरले माधवराव पेशवे यांची रोजनिशी , दुसर बाजीराव पेशवे यांची रोजनिशी , सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी अभ्यासाव्यात किंवा मराठेशाहीचे अंतरंग हे जयसिंगराव पवार यांचे पुस्तक अभ्यासावे
श्री नागेश सावंत
संदर्भ :
पेशवे दफ्तर खंड ४२ ( राजा प्रतापसिंहाची रोजनिशी व इतर कागद )
पेशवे दफ्तर खंड ४३ :- पेशवे सामाजिक व आर्थिक
पेशवे दफ्तर खंड ४५ :- मराठेशाहीचा कारभार
पण ही गुलामगिरी राबवत कोण होत?ह्यालाच पेशवाई अस म्हणलं जात का?कृपया याबाबत मार्गदर्शन करा किंवा पुरावा कुठे सापडेल ते सांगा.