गुरू मंदिर, श्री क्षेत्र कारंजा, कारंजा लाड –
विदर्भातील अकोला जिल्हा. करंज मुनींच्या वास्तव्या ने कारंजा शेषांकीत क्षेत्र म्हणून अोळखले जाते. श्री नृसिंह सरस्वतीचे जन्मापासून मुंजी पर्यंत वास्तव्य या गावात होते.श्रीक्षेत्र कारंजा येथील गुरू मंदिर. करंजमुनींच्या प्रभावाने गरुडापासून शेषनागास संरक्षण येथेच मिळाल्यामुळे या क्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव आहे. याच करंजनगरीत श्री नृसिंहसरस्वती शके १3व्या सुमारास जन्मास आले.
भगवान दत्तात्रेयाचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असून हे स्थान परमपूज्य थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती येथे येईपर्यंत कारंजावासीयांना अज्ञातच होते. स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रेयाचा व्दितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान आहे असे तत्कालीन प. पू. ब्रम्हानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले. प. पू. ब्रम्हानंद स्वामी पूर्वाश्रमीचे लीलावत होते. त्यांना श्री नृसिंह स्वामी महाराजांची मूर्ती तयार करुन गुरू मंदिर बांधण्याची उत्कट इच्छा होती, हे कार्य त्यांना गाणगापुरातच करायचे होते .
प्रत्यक्ष महाराजांनी प. पू. ब्रम्हानंद स्वामींना दृष्टांत देऊन गाणगापूरची जी व्यवस्था आहे ती तशीच राहू द्या, त्यामध्ये काहीही पालट करु नये, आपणास काही कार्य करायचे असेल तर आमचे जन्मस्थान व-हाडात कारंजा येथे आहे. त्या ठिकाणी आपणास जे करायचे असेल ते करा. त्यानंतर प. पू. ब्रम्हानंद सरस्वती महाराज आणि प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची भेट झाली. श्रीं चे जन्मस्थान कारंजालाच आहे हे स्पष्ट झाल्या नंतर प. पू. ब्रम्हानंदांनी ‘श्रीं’ ची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली. ती मूर्ती एप्रिल मध्ये कारंजास आणण्यात आली. मंदिर तयार झालेलेच होते. त्यामुळे चैत्र वद्य व्दितीयेला २१ एप्रिल १९३४ रोजी मुर्तीची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्व आहे. त्या पादुका काशी क्षेत्रातून प. पू. ब्रम्हानंद स्वामींनी कारंजास आणल्या व विधीवत त्यांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात केली. या पादुका सकाळी गंधलेपनाकरीता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यावर देव्हा-यात ठेवल्या जातात. या पादुकांना अत्तर, केशर यांचे गंधलेपन नियमीतपणे होत असते. या ठिकाणच्या पुजा-याला त्रिकाल स्नान करुन गाभा-यात जावे लागते. तेही त्यांनी घरुन स्नान करुन आलेले चालत नाही. आचारी व पुजारी यांच्याकरिता स्वतंत्र स्नानगृह आहे. तेथेच स्नान करुन नंतर ते आपआपल्या कामी लागतात. पुजा-याशिवाय कोणालाही ‘श्रीं’ च्या गर्भगृहात प्रवेश नाही. हे ठिकाण अतिशय जागृत आहे. याचा प्रत्यय विविध भक्तांस वारंवार येत असतो.
गुरू मंदिर बांधकाम व श्री नृसिंहसरस्वती मूर्ती यांचे मंदिर बांधण्यास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम पायाशुद्धी करण्यात आली. त्याकरिता नाशिकचे रहिवासी श्री. अण्णाशास्त्री वारे व श्रीधरशास्त्री आणि काशीचे दोन विद्वान ब्राह्मण यांना पाचारण करून शास्त्रोक्त विधिपूर्वक काही ताम्रपट मंदिराच्या पायामध्ये ठेवण्यात आले. शके १८५५ मार्गशीर्ष महिन्यात मंदिराची कोनशिला बसविण्यात आली. दिनांक ३ डिसेंबर १९३३ ह्या दिवशी श्री दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. मुंबईवरून स्थापत्यशास्त्रनिपुण श्री. आचरेकर यांना बोलाविण्यात आले होते. केवळ चार महिन्यात (चैत्र १८५६ या महिन्यात) मंदिराचे काम पूर्ण झाले.
जयपूर येथे श्रींची संगमरवरी पाषाणाची नयनमनोहर मूर्ती तयार करवून ती श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी स्वत: आपल्याबरोबर मोटारीतून कारंजा येथे आणली. शके १८५६ चैत्र शुद्ध १३पासून पंचान्हिक दीक्षेने प्रारंभ करून चैत्र वद्य २लाच (दिनांक १/४/१९३४) चित्रा नक्षत्रयुक्त वृषभ लग्नाच्या सुमुहुर्तावर श्री गुरुनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या ह्या मूर्तीची मंदिरात त्यांनी प्रतिष्ठापना केली.
श्री ब्रह्मानंदसरस्वतींनी त्या निर्गुण पादुका काशीहून अत्यंत शूचिर्भूतपणे स्वतंत्र मोटारीतून स्वत: कारंजास आणल्या व शके १८५८मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांची स्थापना केली. या निर्गुण पादुकांची स्थापना श्री गुरुमूर्तीच्या स्थापनेनंतर एक वर्षाने झाली.
श्री नृसिंह सरस्वती.
जन्म: लाडाचे कारंजा, पौष शुद्ध इ. स. १३७८
आई/वडिल: आंबामाता / माधव
वेष: संन्यासी
मुंज: इ. स. १३८५
गुरु: कृष्णसरस्वती
संन्यास: इ. स. १३८८
तिर्थाटन: इ. स. १३८८ ते १४२१
औदुंबर चातुर्मास: इ. स. १४२१
नरसोबावाडी: इ. स. १४२२ ते १४३४
गाणगापुर: इ. स. १४३५ ते १४५८
कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५८
निजानंदीगमन: इ. स. १४५८
विशेष: दत्तावतार, धर्मसंस्थापनेचे कार्य
चरित्र ग्रंथ, श्री गुरुचरित्र.
संतोष चंदने