महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,25,365

हबसाण जंजिरा | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 2840 7 Min Read

हबसाण जंजिरा | बखर संस्थानांची –

रायगड जिल्ह्यातील भूतपूर्व संस्थान –

संस्थानचे राज्यकर्ते स्व:ताला नबाब म्हणत. पश्चिम किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस  गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे . मराठाकालीन कागदपत्रांत  हबसाण असाही याचा उल्लेख येतो. हबशी लोकांचा हबसाण. किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा  दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीतकोरीव लेख आहे.  यास २२ बुरुज आहेत.  होती. कोटात  मशिदी, तलाव, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. कलाल बांगडी नावाची प्रचंड लांब पल्याची  तोफ किल्यात आढळते. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे.  पंधराव्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले.  हे लोक हबशी म्हणून ओळखले जात. त्यांना सौदी असेही म्हणत. सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून

हिंदुस्थानात आणले तेच पुढे  अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्घ झाले. त्याच वेळी मलिक अंबरने  निजामशाहीचा गेलेला बराच प्रदेश परत त्याने  मिळविला. १६१८ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी  सुरुल हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून जंजिऱ्याच्या नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२० मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१ मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला. त्याबरोबर सिद्दी अंबर विजापूरचा ताबेदार झाला. यावेळी जंजिरा संस्थानच्या सीमा वाढल्या होत्या.

पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत ते विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना होऊ लागला. जंजिऱ्याच्या सिद्दी प्रमुखास आदिलशहाने वझीर किताब दिला. वझीर सिद्दी अंबर १६४६ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर झाला. यापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. या मोहिमेत पोर्तुगीजांनी सिद्दीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला. तेव्हा सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करुन फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारुन मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले.

सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे मे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही महाराजांना यश लाभले नाही. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करुन जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६ मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले.नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला (१६८२) पण त्यांनाही ते जमले नाही.  महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत रामचंद्रपंतांनी सिद्दीवर हल्ला केला (१७०१) परंतु यश आले नाही.

सिद्दी कासिम मरण पावल्यावर (१७०७) पद्मदुर्गाचा किल्लेदार सिरुरखान त्याच्या जागी आला. त्याच्या मृत्यूनंतर (१७३४) सिद्दी रेहमान जंजिऱ्याचा नबाब झाला. १७३९ मध्ये हुसेनने त्यास पदच्युत करुन नबाबी मिळविली. तत्पूर्वी सिद्दी सात या शूर, मर्द व राजकारणी सेनापतीचा चिमाजी आप्पांनी पराभव करुन त्यास रेवासजवळ चरईच्या लढाईत ठार केले पण किल्ला स्वराज्यात आला नाही. हुसेन सिद्दीनंतर (१७४५) सय्यद अल्लाना गादीवर आला पण त्यास सिद्दी इब्राहिमने पदच्युत करुन (१७४६) गादी बळकाविली.

मिया आचन सिद्दी १७४८ मध्ये जंजिऱ्याचा प्रशासक बनला. पुढे १७५१ मध्ये सिद्दी मसूदने त्यास घालविले. मसूद वारल्यानंतर (१७५६) बरेच सिद्दी बदलले. मराठ्यांविरुद्घ इंग्रज सतत सिद्दीस मदत करीत, तसेच गोव्याचे पोर्तुगीजही, त्यांना दारुगोळा व शस्त्रसामग्री पुरवीत असत.. सिद्दी घराण्यात गादीवरुन अंतःकलह चालू झाले. त्याचा फायदा नाना फडणीसांनी १७९१ मध्ये घेऊन सिद्दी गादीचा एक हक्कदार बालूमिया याला सुरतेजवळची सचिनची जहागीर देवविली व जंजिऱ्याचा करार केला पण पेशवे प्रत्यक्ष जंजिऱ्याचा ताबा मिळवू शकले नाहीत. त्या वेळचा जंजिऱ्याचा नबाब सिद्दी जोहर इंग्रजांना शरण गेला. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) इंग्रजांनी जंजिऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन १८३४ मध्ये त्यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली. सिद्दी मुहम्मद याने १८४८ मध्ये राज्यत्याग करुन सिद्दी इब्राहिम या मुलास गादीवर बसविले. १८६७ मध्ये जंजिऱ्याचा नबाब व तेथील सरदार यांत तीव्र मतभेद निर्माण झाले. इंग्रजांनी तेथील नबाबाला पदच्युत करुन (१८६९) तिथे इंग्रज रेसिडेंट नेला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला. तेव्हा त्याचे पद चालू ठेवले, पण अधिकार कमी केले. सिद्दी इब्राहिम खान १८७९ मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या मुलास इंग्रजांनी गादीवर बसविले. सज्ञान झाल्यावर त्याच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला त्याने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्यास ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर (१९४७) जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४८) व ते मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

मराठी विश्वकोश ( fb साभार संक्षिप्त..)

सिद्दी लोक पराक्रमी, लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी होते. मलिक अंबर, मलिक काफूर, मलिक याकुब, फतेहखान, सिद्दी संबळ, याकुबखान, सिद्दी कासीम, सिद्दी मसूद, सिद्दी सात, सिद्दी खान, सिद्दी सुभान इ. अनेक सरदार हुशार, बुद्घिमान आणि लढवय्ये म्हणून विख्यात होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता.

अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्य राहिलेला आहे. आनेक संस्थानांच्या स्टँपपेपर वर जहागीर , इलाखा हा शब्द पाहावयास मिळतो. जंजिरा संस्थानवर जंजिरा हबसाण असे पाहायला मिळते.

( १ आण्याचा १९२४ चा हबसाण जंजिराचा एक स्टँप पेपर.)

संतोष मु चंदने, चिंचवड , पुणे.

Leave a Comment