महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,47,205

सरसेनापती हंबीरराव मोहिते | शिवरायांचे शिलेदार

By Discover Maharashtra Views: 3690 4 Min Read

शिवरायांचे शिलेदार – सरसेनापती हंबीरराव मोहिते…

आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले. बहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,’प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास ‘हंबीरराव’ नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.

बहादूरखान,दिलेरखानादींना नजरेत धरले नाही :

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लुट मारून आणिली.या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो,’राजियांनी आपले लष्करास हुकूम करून हंबीरराव सरनौबत फौज घेऊन मोंघलाईत शिरले. खानदेश, बागलाण, गुजराथ, अमदाबाद,बुर्‍हाणपूर,वर्‍हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला.मालमत्ता अगणित जमा करून चालिले.तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले.राजियाची फौज तोलदार गाठली.मोंघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालिला.दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली.हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही.तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले.मालमत्ता राजियास दिली.

व्यंकोजीराजावर विजय :

कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले.व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते.दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला.विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले.याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली.प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले.व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते. पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.हे युध्द १६ नोव्हेंबर,१६७७ साली झाले.यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला(२२ जुलै, १६७८).

प्रधानांची बंडखोरी मोडिली :

छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर अष्टप्रधान मंडळीतील काही जणांनी राजारामास गादीवर बसविण्याचे ठरवून संभाजीराजेंचा गादीवरील हक्क नाकारला.या मंडळीतील मोरोपंत पिंगळे,आण्णाजी दत्तो,प्रल्हाद निराजी या मंडळीना वाटले की राजाराम हा हंबीररावांचा सख्खा भाचा असल्यामुळे,आपल्या कटात हंबीरराव सामील होतील.पण हंबीररावांनी या तिघांना कैद करून कोल्हापूरास पन्हाळा किल्ल्यावर संभाजीराजें पुढे उभे केले.कारण हंबीररावांना माहित होते की मोघलांच्या प्रचंड अशा सेनेशी संभाजीराजांसारखा छावाच लढू शकतो.
पुढे संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोघलांचे संपन्न असे बुर्‍हाणपूर शहर लुटिले.मोघल इतिहासकार खाफीखान म्हणतो,’देशोदेशीचे जिन्नस, जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने असा लक्षावधी रूपयांचा माल बुर्‍हाणपूरातील दुकानांत साठविला होता.तो सर्व मराठ्यांनी लुटला.मराठे अगदी अनपेक्षीतपणे आले. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते.त्यांना मराठ्यांनी घेरले.विशेषत: बहादूरपुर्‍यावर ते इतक्या अनपेक्षीतपणे तुटून पडले की त्या पुर्‍यांतून एक माणूस किंवा एक पैसा हलविता आला नाही.’

अनेक लढाया :

पुढे मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्याबरोबरच्या नाशिकजवळच्या रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले(जुलै १६८२).त्यांनतर मोघल सरदार कुलीच खानाबरोबर भीमा नदीच्या परिसरात लढाई(ऑक्टोंबर,१६८२),शहाजादा आज्जम बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई(१५ डिसेंबर,१६८२ व जाने-फेब्रु १६८३),मोघल सरदार बहादुरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई(२७ फेब्रुवारी, १६८३),शहाबुद्दीनबरोबर रायगडच्या परिसरात लढाई(जानेवारी,१६८५),मोघली मुलखात चढाया(सन १६८६),अशा अनेक लढाया केल्या.या अशा पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदाराशी झाली(डिसेंबर १६८७).उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जाखानाच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली.पण लढाईच्या कालात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले.अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली.ऐन धामधुमीच्या कालात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा …….!!!

लेखक – स्वराज्याचा एक अज्ञात मावळा
खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment