हनुमान –
मूर्तीकलेत जो हनुमान पाहायला मिळतो तो इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकानंतर मिळतो. गुप्तपूर्व काळात रामकथेतही अंकन मिळत नाही. कथा मिळते पण अंकन मिळत नाही. त्याच्या प्रतिकृतीचं वर्णन अर्जुनाच्या रथावर असल्याचं आपणास महाभारतात मिळतं. पण ती त्याची प्रतिकृती आहे. मूर्ती नाही.
गुप्त काळ आणि गुप्तनंतरच्या काळात दिसतो तो देवगड, नचनाकुठार, चौसा (बिहार) या ठिकाणी शिल्पांकित केलेल्या रामकथांमधून. पण पूजावह अशी मूर्ती आठव्या शतकात मिळते. ज्या मूर्तीची पूजा व्हायला लागली अशी मूर्ती तेव्हा प्रत्यक्षात आली. तो प्रतिहार राजांचा काळ आहे. म्हणजेच आठव्या शतकातला. अशी मूर्ती आता लखनौच्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते.
उत्तर मध्ययुगीन काळातील मूर्ती ११-१२ व्या शतकात दिसून येते. त्या काळातील मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यात वनमाला आहे, क्वचित यज्ञोपवीत आहे, लांब गुंडाळलेलं शेपूट आहे आणि ही मूर्ती चपेटदान मुद्रा स्वरूपात आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या स्थितीतील मूर्ती. अशा मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो, तर काही ठिकाणी त्याच्या पायाशी राक्षसीणदेखील दिसून येते. याबद्दल असे म्हटले जाते की ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. बंगालमध्ये, पन्हाळ्याच्या पायथ्याला, बीड येथे अशा मूर्ती आहेत. या राक्षसीणीला तिथे पनवती म्हणतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये साडेसातीला पनवती शब्द आहे. हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे ती राक्षसीण दाखवलेली आहे असे मानले जाते. वस्तुत: शनिवार आणि मारुतीचा काहीही संबंध नाही. पण मग शनिवारी का मारुतीची पूजा करतात, तर मारुती साडेसातीला पायाखाली ठेचतो, नियंत्रण करतो म्हणून त्याची पूजा केली जाते. बंगालमध्ये अशा मूर्ती अधिक ठिकाणी पाहायला मिळतात. – गो. ब. देगलूरकर.
Rohan Gadekar