किल्ले – हनुमंतगड, निमगिरी.
महाराष्ट्रात किल्ल्यांच्या भरपूर जोडगोळी आहेत उदा. पुरंदर-वज्रगड, चंदन-वंदन, मनोहर-मनसंतोषगड अशीच एक जोडगोळी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आहे ती म्हणजे “निमगिरी-हनुमंतगड”. आपण आधी नाणेघाटाचे संरक्षक जीवधन, चावंड, हडसर यांच्याबद्दल माहिती घेतली. तसेच ही जोडगोळी पण नाणेघाटाची संरक्षकच आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास परिचितच नाही.फक्त सातवाहन राजांच्या काळातील ह्याची बांधणी आहे.
थोडक्यात भूगोल जाणून घेवू
निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका लहानशा खिंडीने वेगळे झाले आहेत. जुन्नरजवळ माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच जुन्नरपासून ३५ कि.मी.वर खांडीची वाडी गाव आहे. खांडीची वाडी गावामागेच निमगिरी व हनुमंतगड हि दुर्गजोडी वसली आहे. गावात आल्यावर खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड हे लक्षात ठेवुन चढाईला सुरवात करावी. टप्प्यावर एक मोठी विहीर आहे. या विहिरीच्या डाव्या बाजुस असलेल्या झाडीत पिंपळाखाली लहानशा चौथऱ्यावर मारुतीची मुर्ती आहे. या मुर्तीपुढे काही अंतरावर ४२ विरगळ एका रांगेत मांडुन ठेवल्या आहेत. या विरगळ अलीकडील काळातील असुन त्यावर फारसे कोरीव काम दिसत नाही. येथुन वर चढत जाणारी ठळक पायवाट थेट खिंडीतील किल्ल्याच्या पायथ्याच्या पायऱ्यापर्यंत जाते.
पायऱ्यांच्या अलीकडे एक वाट उजवीकडे निमगिरीच्या डोंगरात कोरलेल्या गुहेकडे जाते. टेहळणीसाठी खोदण्यात आलेली हि गुहा खोदताना अर्धवट सोडुन देण्यात आली आहे. येथुन कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला मधील खिंडीत न नेता थेट निमगिरीवर नेऊन सोडतात. कातळात कोरलेल्या या सुंदर पाय-या म्हणजे या गडाचा अनमोल ठेवा आहे. या पायऱ्या फारशा वापरात नसल्याने काही ठिकाणी मातीचा घसारा पायऱ्यावर जमा झाला आहे व पायऱ्या मातीत अर्धवट गाडल्या गेल्या आहेत त्यामुळे सांभाळूनच या वाटेने वर चढावे लागते.
खिंडीपासून ते माथ्यापर्यंत चढाईचा हा टप्पा रोमांचकारी आणि सुंदर आहे. वळणदार कातळ कोरीव पाय-यांनी जाताना वाटेत कातळात कोरलेली पहारेकऱ्याची एक चौकी लागते आणि उद्ध्वस्त दरवाजातून १० मिनिटात आपण निमगिरीच्या माथ्यावर पोहोचतो.गडाच्या कातळात कोरून काढलेला पायरीमार्ग गड सातवाहन कालीन असल्याची साक्ष देतात. निमगिरीचा किल्ला समुद्रसपाटीपासून १००८ मी उंचीवर असुन उध्वस्त दरवाजाच्या डाव्या बाजुला खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा आहे. या गुहेतून वर जाणाऱ्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत. गडाच्या या भागात व्यवस्थित तटबंदी दिसुन येते.या वाटेने प्रदक्षिणा करताना सर्वप्रथम पाण्याच्या ३ टाक्या दिसतात.काही अंतरावर छप्पर उडालेले एक लहानसे घुमटीवजा मंदीर आहे. या मंदिराला लहानसा दरवाजा असुन समोर कोनाड्यात गजलक्ष्मीचे शिल्प व त्यासमोर शिवलिंग ठेवले आहे.जवळच माणिकडोह, पिंपळगाव धरणाचा जलाशय आहे. असा हा निमगिरी-हनुमंतगड किल्ला.
Team- पुढची मोहीम