महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,77,081

हरिहरेश्वर शिवमंदिर, तोंडोळी

Views: 1376
3 Min Read

हरिहरेश्वर शिवमंदिर, तोंडोळी –

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरापासून कोरडगाव मार्गे २३ किमी अंतरावर पाथर्डी-शेवगाव सीमेवर असलेलं तोंडोळी हे एक छोटंसं खेडेगाव. तोंडोळी गावापासून १ ते १.५ किमी अंतरावर निसर्गरम्य अशा परिसरात, डोंगराच्या कुशीत वसले आहे हरिहरेश्वर या नावाने ओळखले जाणारे एक प्राचीन शिवमंदिर. डोंगराने वेढलेल्या, शांत व निसर्गरम्य परिसरात असलेले हरिहरेश्वर शिवमंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून श्रावणातील तिसऱ्या सोमवारी इथे मोठा यात्रोत्सव असतो.

हरिहरेश्वर मंदिराला हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर या नावाने ओळखले जाते. या नावा विषयी मंदिराचे पुजारी बाळकृष्ण महाराज अशी कथा सांगतात की, अनेक वर्षांपूर्वी भस्मासुराला भगवान शंकराने वर दिला की, ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो भस्म होईल. एकदा भस्मासुर भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे धावला असता भगवान शंकर दंडकारण्यात पळाले, तेव्हा पार्वती ने सर्व देवांची व भगवान विष्णूची भेट घेऊन त्यांना हा वृत्तात सांगितला. तेव्हा भगवान विष्णू ने मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा वध केला व नंतर याच अरण्यात भगवान शंकर व विष्णूची भेट झाली व ते कैलासात गेले. तेच हे ठिकाण म्हणून येथे भगवान शंकर व विष्णू यांची दोन लिंगे आहेत. पूर्वी या मंदिराच्या चारही दिशेला सप्तर्षी राहत होते. याचा स्पष्ट उल्लेख शिवलीलामृताच्या १२ व्या अध्यायात आलेला आहे.

मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप चार पूर्णस्तंभावर तोललेला आहे. या मंदिराचे गर्भगृह वैशिष्ट्यपूर्ण असे असून गर्भगृह सभामंडपापेक्षा आकाराने मोठे आहे. गर्भगृहात चार पुर्णस्तंभ असून शिवपिंडी च्या मागील बाजूस सरळ रेषेत आणखी तीन स्तंभ आपल्याला दिसून येतात. शिवलिंगाच्या पीठावर दोन लिंग असून ही दोन लिंगे भगवान शिव व भगवान विष्णू चे प्रतिनिधित्व करतात.

मंदीराच्या जवळ एक विहिर असून समोर गणेश मूर्ती, मारुती मंदिर, दत्त मंदिर व काही नवीन बांधकाम आपल्याला दिसून येते. तसेच मंदीरा समोर नंदी, भग्न शिल्पं, वीरगळ, सतीशीळा व एक सुंदर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती उभी आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव असून या तलावाचे बांधकाम देखील मंदिरा इतकेच पुरातन असावे असे तलावाच्या बांधकामा वरून आपल्याला अनुमान काढता येते.

मंदिराच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपात एका चार फुटी पीठावर शिव छत्रपतींची सिंहासनारूढ प्रतिमा नव्याने स्थापन करण्यात आली आहे. डोंगराच्या कुशीत व निसर्गरम्य परिसरात असलेल्या या पुरातन शिवमंदिराला भेट दिल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती व समाधान मिळते एवढं मात्र नक्की.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment