महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,53,670

हरीनारायण मंदिर बेनवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर

By Discover Maharashtra Views: 1297 3 Min Read

हरीनारायण मंदिर बेनवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर –

आपल्या आसपास आपल्या संस्कृतीचे पुरातन अवशेष विखुरलेले असतात आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. अगदी तशीच जाणीव आपल्याला बेनवडी येथील पुरातन हरीणारायन मंदिराला भेट दिल्यावर होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात, कर्जत शहरापासून साधारण ९ किमी अंतरावर असणारे  बेनवडी हे एक छोटसं गाव. गावात साधारण १६ व्या शतकातील पुरातन असे हरिणारायन स्वामीचे मंदिर असून हे मंदिर चित्रकलेचा व काष्ठशिल्पांचा उत्कृष्ट नमुना आहे.(हरीनारायण मंदिर बेनवडी)

गावात शिरल्यावर मेन रोड सोडून जेव्हा एका छोट्या रस्त्याला आपण लागलो तेव्हा काही मिनिटांनी समोर आपल्याला मंदिराचा एक कळस दिसायला लागतो. या रस्त्याने थोडं अजून आत गेलं की गढीसदृश काही भाग दिसतो. गढीच्या दरवाज्यातून आत गेल्यावर आपल्याला एक सुंदर तुळशी वृंदावन दिसतं. या तुळशी वृंदावनाच्या खालच्या कोनाड्यातून थेट पुढे असलेल्या हरीनारायण मंदिरातली हरी नारायण स्वामींच्या मूर्तीचं आपल्याला थेट दर्शन होतं! या तुळशी वृंदावनापलिकडे मंदिर आहे.

मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या मंदिरातल्या भिंतींवर आणि छताच्या जोड भागावर पुरातन अशी उत्कृष्ट चित्रकला आहे. छतावरील चित्रकला पाहताना आपले भान हरपून जाते. गाभाऱ्यात तीन मूर्ती आहेत. मधली आहे हरीनारायण स्वामींची, डावीकडे देशपांडे कुटुंबियांचे वंशपरंपरागत आलेले देव, आणि उजवीकडे अन्नपूर्णेची मूर्ती.

मंदिराच्या चहुबाजूंनी देशपांडे कुटुंबियांचं राहतं घर आणि ओवरी आहे. या ओवरीमधे राधाकृष्णाची आणि आणखी एक दोन मूर्ती आहेत. ज्या गढीसदृश इमारतीत देशपांडे कुटुंबीय राहतात आणि हे मंदिर आहे त्या गढीची काही प्रमाणात पडझड झाली असून त्याची डागडुजी करण्याची आवश्यकता दिसून येते. मंदिराच्या परिसरातून बाहेर हरीनारायण स्वामींच्या शिष्यांच्या समाध्या आहेत. पुरातत्व खात्याचे लोक येऊन हे सगळं पाहून गेले आहेत, परंतु अजून कुठलीही निर्णायक मदत मात्र मंदिराला मिळू शकली नाहीये.

देशपांडे कुटुंबीय या मंदिराची अतिशय निष्ठने देखरेख करतात. हे तीन भाऊ आहेत. पैकी एक भाऊ आणि कुटुंबीय कायम इथेच राहतात. यांना गाव सोडता येत नाही. कारण सकाळ संध्याकाळ देवांची साग्रसंगित पूजाअर्चना यांना करायची असते. यांना जर कुठे जायचं असेल तर त्यांच्या उरलेल्या दोन भावांपैकी एखाद्याला इथे येऊन पूजेची जबाबदारी घ्यावी लागते. इथे हरिनारायण स्वामी जयंती व पुण्यतिथीला मोठा उत्सव असतो. कीर्तन, प्रवचन, भजन, भंडारा असा भरगच्च कार्यक्रम असतो. देशपांडे कुटुंबियांनी अगदी निष्ठेने जपलेल्या या वास्तूला भेट दिल्यानंतर आपल्याला एक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळेल यात शंका नाही.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment