अंबाजोगाईतील हत्तीखाना…..
अंबाजोगाई हे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील मुख्य शहर, प्रामुख्यानं तिथल्या योगेश्वरी देवीच्या मंदिरामुळे जास्त प्रसिद्ध आहे. हे शहर बाराव्या शतकात यादवांच्या शासन काळातही मोठं सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. आंबाजोगाई शहराच्या परिसरात याचे अनेक पुरावे आजही भग्नावस्थेत आढळून येतात. इथं असलेली बाराव्या शतकातील प्राचीन जैन लेणी ‘हत्तीखाना’ नावानं प्रसिद्ध असून ती आज अतिशय दुर्लक्षित आहेत. त्यांनी आपलं अस्तित्व कसंतरी टिकवून ठेवलं आहे.
आंबाजोगाई इथल्या योगेश्वरी मंदिराच्या वायव्येला केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर, जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून २०० मीटरवर इ. स. १०६६मधे खोदण्यात आलेली मंदिरं आहेत. यांना हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी गुहा, जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवी लग्न मंडप असंही म्हटलं जातं. १०६० ते १०८७ या काळात शासन करणाऱ्या उदयादित्य राजाच्या काळात ही लेणी खोदली गेली. आज ही लेणी महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराशास्त्रीय स्थळे आणि अवशेष १९६०च्या अधिनियमानुसार संरक्षित केलेली आहेत. चौकोनी आकाराच्या या लेण्यांचं प्रवेशद्वार दक्षिणेकडे असून प्रवेशद्वाराजवळ खडकात कोरलेले हत्तीचे दोन भव्य पुतळे दिसतात. त्यावरूनच या लेण्यांचं नाव हत्तीखाना असं पडलं असावं. बहामनी काळात या जागेचा उपयोग हत्ती पाणी पिण्यासाठी करत होते, असेही संदर्भ सापडतात. लेणी मंडपाच्या आत साडेआठ चौरस मीटरचं प्रांगण आहे. हा मंडप चार दगडी स्तंभांवर तोललेला आहे. प्रांगणामधे कुशलतेनं खोदलेला ९.१४ x ९.१४ मीटर आकाराचा नंदी मंडप आहे. मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. प्रांगणाच्या चारही बाजूंना चार हत्ती आहेत. यातील एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो.
लेण्यांतील गुहांचा अंतर्भागही पूर्वी खूप आकर्षक असावा. लेण्यांतील एक गुहा ३२ खांबांवर तोललेली आहे. तिथे शंकर आणि गणपतीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. पूर्वेला एक सभामंडप आहे. त्यात तीन प्राचीन गर्भगृहं असावीत. नंदीमंडपाच्या शेजारी एक तुटलेला मानस्तंभ असावा. तो असावा असं दर्शविणारी एक गोलाकार संरचना आजही शिल्लक आहे. इथे एक शिलालेख सापडला होता. तो अंबाजोगाईच्या तहसीलदार कार्यालयात सुरक्षिततेसाठी हलविण्यात आल्याचं कळलं. या शिलालेखात महामंडलेश्वर उदयादित्य या राष्ट्रकूट राजाने सेलू, राडी, जवळगाव आणि कुंभेफळ ही गावं लेण्यांच्या देखभालीसाठी इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आढळतो.
डोंगर उताराच्या सपाट भागावर आणि त्या काळच्या समृद्ध नदीकाठी ही लेणी खोदली गेली. आज मात्र लेण्यातील अनेक मूर्ती आणि दगडात कोरलेली हत्ती शिल्पं दुभंगलेल्या अवस्थेत दिसून येतात. आजही या नदीच्या किनाऱ्यावर अनेक जैन, हिंदू मंदिरं दिसतात. प्राचीन काळी हा प्रदेश खूप विकसित व संपन्न असावा. पावसाळ्याव्यतिरिक्त वर्षाच्या इतर वेळी या नदीची आजची अवस्था अगदीच दयनीय आहे. युद्धजन्य किंवा तत्सम परिस्थिती उद्भवल्यानं किंवा अनुदान न मिळाल्यामुळे यातील बरीच लेणी अपूर्ण राहिली असावीत, असं जाणकारांचं निरीक्षण आहे. एका समृद्ध आणि संपन्न कालखंडाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या लेण्यांची झालेली दुर्दशा बघून आपण आपल्या वारशाबाबत किती असंवेदनशील आहोत त्याची कल्पना येते. साभार..डाॕ. कार्लेकरसर
माहिती साभार – Dr. Satish Kadam