हटकेश्वर, गोद्रे –
नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे. हटकेश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्यास काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते, असा उल्लेख काशीखंड या ग्रंथात आहे. असे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हटकेश्वर मंदिर, गोद्रे काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित राहिले आहे.
आदिवासी भागातील गोद्रे या गावाजवळील डोंगरावर हटकेश्वर मंदिर आहे. या मंदिराची महती अनेक दुर्मीळ ग्रंथात आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला दर्शनासाठी हजारो भाविक व पर्यटक येथे येतात. जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असताना हटकेश्वर डोंगर व त्या भोवतालचा परीसर निसर्गरम्य असूनही विकसित झालेला नाही. या डोंगरावरून लेण्याद्री गणपती, शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला,सिंदोळा किल्ला, पिंपळगाव जोग धरण, येडगाव धरण,वडज धरण,माणिकडोह धरण, हरिश्चंद्रगड सह्याद्रीच्या रांगा यांचे मनमोहक दर्शन घडून येते.
हटकेश्वर मंदिर हे उंच डोंगररांगेवर असून ही डोंगरांग दक्षिणोत्तर पसरलेली आहे. डोंगररांगेचा पश्चिम भाग संपूर्ण धुकेछादित असतो तर पुर्व भाग संपूर्ण स्वच्छ वातावरणात दिसतो त्यामुळे एक चमत्कारच पहावयास मिळतो. तसेच रानहळदिची अनेक एकर पसरलेली फुलबाग गुलाबी,सफेद व पिवळ्या रंगांनी बहरलेली दिसते आणि रानमोग-याची शेतीच कुणी या पठारावर करतोय की काय हे येथे प्रत्यक्ष पाहताना भास होतो. वर पठारावर असलेले दोन विवर,जुना महादेव व हटकेश्वर मंदिर व तेथे असलेले शेकडो नंदी भाविकांच्या पुर्ण केलेल्या मनोकामनांची पावतीच देतात.
पावसाळ्यात पश्चिम भागात पाऊस तर पुर्वभाग अतिशय कमी प्रमाणात पाऊस पहायला मिळतो. उत्तरेकडील भागात टोकदार डोंगर माथ्यांनी वेढलेला असल्याने त्याचा नामोल्लेख व-हाडी डोंगर म्हणुन केला जातो. व टोकदार सुळके अनेक गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. येथेच दोन टोकदार सुळक्यांना जोडणारा एक नैसर्गिक पुल तयार झालेला असुन तो असंख्य पर्यटकांचे खास आकर्षण करताना दिसत आहेत. म्हणूनच शेकडो पर्यटक या डोंगर रांगेवर भटकंती करण्यासाठी येतात.
अशा या तिर्थक्षेत्राचे पुरावे अनेक धार्मिक ग्रंथात मिळत असून त्यामध्ये हटकेश्वराची माहिती देण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमाक्र 11 मध्ये म्हटले आहे,
ना तरी कारवेसुनी वसुंधरी !
जो हिराणाक्षु विवरी ! ते उघडले हटकेश्वरी!
जेवी पातळ कुहर! !
(अर्थ – हिराणाक्षु दैत्य पृथ्वीला काखेत घेऊन एका विवरात घुसला. भगवान शंकरांना या संकटाची जाणिव झाल्याने त्यांनी या दैत्यास पाताळापासुन ज्या गुहेबाहेर काढले ते ठिकाण म्हणजेच हटकेश्वर मंदिर )
नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे तसेच ( स्कंदपुराण) नागरकथा मध्येही त्याचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.
काशीखंड या ग्रंथात सांगितले आहे की हटकेश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्यास काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते. या हटकेश्वर देवस्थान नक्की कुणाचे यावरून एक गमतीदार कथा सांगितली जायची. कारण या डोंगरावर हक्क तीन गावांचा सांगितला जायचा. मग देव नक्की कुणाचा. गोद्रे,आलमे कि डिंगोरचा. यावरून खुप वादावादी सुरू असायची. मग सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला. प्रत्येक गावातील एक व्यक्तीस डोंगरावरून खाली फेकायचे जो जगेल त्याचा देव. अर्थात देव त्याला तारेला. मग काय ही युक्ती वापरात आणली व गोद्रे गावातील फैकलेली व्यक्ती फेकल्यानंतर थोडी जास्त वेळ जगली व हे देवस्थान त्यांना देण्यात आले. ही फक्त कथा आहे.
Sachin Kadam Srk