महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,112

हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी

By Discover Maharashtra Views: 3971 8 Min Read

हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी

मध्य रेल्वेच्या मनमाड – भुसावळ मार्गावर असलेले एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे चाळीसगाव . औरंगाबाद येथून94 किमी तर धुळ्यापासून 55 किमी अंतरावर असलेले चाळीसगाव , जळगाव औरंगाबाद व नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा तालुका आपल्या धार्मिक ऐतिहासिक व नैसर्गिक विपुलतेने परिपूर्ण आहे .
चाळीसगावपासून पूर्वेला 20 किमी अंतरावर असलेले पाटणादेवी हे एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी परिसराला पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ देखील आहे .या परिसराला यादव काळात विज्जलगड देखील म्हटले जायचे . येथून जवळच कण्हेरगड आहे . आज हा संपूर्ण परिसर शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने हिरवीगार वनराई आपले मन मोहून टाकते .

पाटणादेवी मुख्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर पूर्वाभिमुख असलेले प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिर आपल्याला ऐतिहासिक काळात घेऊन जाते . या मंदिराची भव्यता नजरेत भरण्यासारखी आहे . मंदिर परिसरात अनेकठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात . त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो . यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते .
या मंदिराचे निर्माण कार्य एक भव्य 10 फूट उंचीच्या ओट्यावर झाले आहे . त्याची लांबीच 100 फुटांपर्यंत आहे . नंदीगृह, सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात . छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहे .

मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे . साधारणपणे 24 खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसते प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे . खांबांवरील तुळया त्यांचे जोतरे त्यावर रचलेले आयताकृती दगड , सगळं कसं अगदी जुळवून आणलंय . अतिशय कसलेल्या मुरब्बी कारागिरांच्या हातून या कलाकृतीचे निर्माण झाले आहे . प्रत्येक चौकीतील छताच्या रचनेत वैविध्य जाणवते .कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून 25 फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानामुळे मन थक्कच होते .

गर्भगृहाच्या बाहेर जमिनीवर कोरलेली शंख व चक्र ही विष्णू आयुधे बघतांना मनात कोडे निर्माण होते .प्रवेशद्वाराच्या पायथ्याला मेंढ्यांची शिंगे व सिंहाचा जबडा असलेला बटबटीत डोळ्यांचा किर्तीमुख लक्ष वेधून घेतो . त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शिल्पे पुसट असल्याने नीट आकलन होत नाही . प्रवेशद्वारावर श्रीगणेश विराजमान असून सप्तमातृका कोरलेल्या आहेत .तसेच गणसेना दिसते चौकटीवर यक्ष गंधर्व किन्नर गायन वादन व नृत्य करतांना दिसतात .

गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो . त्यावरील अक्षरांची ठेवण व एकसंधता पाहून कलाकारांना प्रणाम करावासा वाटतो . आज या शिलालेखाला कुठलेही संरक्षण कवच नाही . त्यामुळे पर्यटकांच्या भक्ष्यस्थानी तो पडेल की काय अशी भिती वाटते .( कुतूहल म्हणून प्रत्येकजण त्याला हात लावतोच ) म्हणून काचेच्या शोकेसमध्ये त्याला बंदिस्त केल्यास एक समृद्ध वारसा सुरक्षित राहील . काही ठिकाणी त्याचे पापुद्रे पण निघत आहेत.

गर्भगृहाचा आकार चंद्राकृती असून मध्यभागी असलेली शिवपिंडी मन प्रसन्न करते आत बराच अंधार असल्याने सुरुवातीला काहीच दिसत नाही .पण नंतरमात्र हळूहळू दिसायला लागते याला आतून 28 कोपरे आहेत .
आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत . प्रदक्षिणा करतांना मंदिराची भव्य दिव्यता नजरेत भरते . मंदिराची भौमितिक संरचना वाखाणण्याजोगी आहे .बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना सरळ रेषेत न उभारता त्रैमितीक रचना पध्दतीचा वापर केला आहे . प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे ( समजा कालांतराने एखादा खांब ढासळला तर तितकीच जागा रिक्त होईल .पण मूळ वास्तूला कुठलीही हानी पोहचणार नाही याची काळजी वास्तू उभारतांना घेतलीआहे .)

स्तंभावरील कोरीवकाम अप्रतिमअसून उठावदार शैलीतील मूर्तिकाम नजर खिळवून ठेवते . उठावदार शैली शिल्पांवर शेकडो वर्षाचा ऊन वारा पाऊस यामुळे परिणाम झालेला दिसतो .अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत . काहीचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही .तर काही शिल्पे मानवी हस्तक्षेपामुळे विद्रुप झालेली दिसतात . काही हौशी गवशी मंडळी शिखराच्या अर्ध्यावर चढून आईलपेंटने स्वतःची इंग्रजी आद्याक्षरे लिहून पापाचे भागीदार झालेले दिसतात . यांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे .

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तारेच्या जाळीचे कुंपण घालून अशा नतद्रष्ट लोकांपासून काही शतके मंदिर वाचवता येईल .जेणेकरून भावी पिढीसाठी हा वारसा जीवंत राहील .( ही वास्तू पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी काहीतरी पावले उचलावी ही रास्त अपेक्षा आहे .)

मंदिरावरील शिल्प कला ही मंत्रमुग्ध करणारी आहे .संपूर्ण मंदिराला एका मेखलेने बद्ध केले आहे या मेखलेवरील शिल्पे डोळ्यांचे पारणे फेडतात . नंदिवर आसनस्थ शिव, तांडव मुद्रेतील शिव, धनुष्यबाण धारण केलेला पिनाकपाणी शिव,पद्मासनस्थ शिव , अशी कितीतरी शिवशिल्प मन मोहून टाकतात .
नृत्य गणेश , विणावादक गणेश , वरददायक गणेश अशी वेगवेगळ्या स्वरूपात गणेश शिल्प आढळतात .आश्चर्य म्हणजे हनुमानाचे शिल्प देखील या मेखलेवर विराजमान आहे .

सर्वात आश्चर्य म्हणजे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते .ही प्रतिमा बाहुबली गोमटेश्वराचीच का ? या विषयी निश्चित माहिती नसले तरी तेथील मूर्तीशी तिचे कमालीचे साधर्म्य आहे .
यावरून एक निष्कर्ष काढता येतो की या कारागिरांना गोमटेश्वराची माहिती असावी किंवा त्या निर्माणकार्यात यांचाही सहभाग असावा . त्या काळातील दळणवळण इतके प्रगत नसतांना असे साम्य पाहून मन थक्क होते .
मंदिर शिखराच्या वरच्या बाजूला दगडात कोरलेल्या पताका शिखर सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात . त्यांच्यातील जिवंतपणा बघण्यासारखा आहे .

मेखला पट्टीच्या खाली बाहेर धावणारी हत्तीशिल्पे , व वृषभशिल्पे दिसून येतात . जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे .
हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी मंदिराच्या वरच्या बाजूला गावक्षांचे कोरीवकाम अद्भुत आहे .या गवाक्षांना दोन नक्षीकाम केलेल्या स्तंभानी आधार दिला आहे तर खालच्या बाजूने अर्ध गोलाकार दगडी स्तंभांवर पेललेला भार नजर हटू देत नाही .एका गावक्षात कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती विस्मित करते .तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे .पायाखाली एका दैत्याला दाबले आहे .ते मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे .हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते . शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे .त्यांच्या प्रतिभशक्तीला लाख प्रणाम !

उठाव शैलीतील हे शिल्प आज बरेच झिजलेले दिसते पण तरीही त्याचे सौंदर्य कमी होत नाही . मंदिराच्या प्रत्येक  कोनाड्यात यक्ष गंधर्व व नृत्यांगना यांच्या असंख्य प्रतिमाचा चपखल मेळ बसवलेला आहे . मंदिर निर्माण शास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या कलाकारांच्या हातून या वास्तूचे निर्माण झाले आहे .यात तिळमात्र शंका नाही .
मंदिराच्या उजव्या बाजूला दोन सात फूट उंचीचे स्तंभ उभे आहेत . त्यावर शंख चक्र गदाधारी विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत .बाजूला जय विजय उभे आहेत . हे बघतांना वेरूळ लेण्यांची आठवण येते . या मंदिर निर्माण काळात शैव व वैष्णव यांच्यात बरीच एकरूपता झाल्याचे दिसते .
ही प्राचीन वास्तू सन1958च्या अधिनियम 24 नुसार पुरातत्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे . परंतु वास्तू संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत याचे वैषम्य वाटते .

मित्रानो प्रत्येक गोष्ट कायद्याने संरक्षित होईल तेव्हाच का आपण तिचे संरक्षण करणार ? एक जबाबदार पर्यटक म्हणून आपणही प्रत्येक वास्तूचा आदर केला पाहिजे .आपल्याकडून त्या वास्तूला काही नुकसानतर पोहोचत नाही ना याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे .तरच हा अनमोल ठेवा आपण भावी पिढीसाठी संरक्षित ठेऊ शकू !

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

Leave a Comment