शिवाजी महाराजांच्या सुरतच्या दुसऱ्या लुटीच्या ठळक घडामोडी !!
सप्टेंबर १६६६ ला शिवाजी महाराज आग्रा कैदेतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्या नंतर चा काहि काळ महाराजांनी शांततेत पुर्वी झालेल्या तहा नुसार व्यथित करुन स्वराज्याची घडी आतुन व्यवस्थित बसवली. सेत सारा पद्धती ठरवली गेली, सैन्य भरती, किल्ल्यांचा बंदोबस्त व्यवस्थित केला. प्रलंबित निवाडे तंडे मिटवले. व महाराज मिर्झाराजें सोबत अदिलशाहीवर मोगलांकडुन चालुन गेले. अदिलशाही वरील मोहिम आटोपल्यानंतर शिवाजी महाराजांचे विजय पर्व चालू झाले. स.स.१६७० ला शिवाजी महाराजांनी मोगलांना हैराण करुन सोडले. महाराजांना आवर घालण्याचे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न फसत होते. तर महाराज इकडे मोगलांची लांडगेतोड करुन छापे टाकून अनेक किल्ले घेतले. व सुरतेच्या दुसर्या लुटिची मोहिम हाती घेतली. २ ऑक्टो. १६७० रोजी सुरतेत वार्ता येऊन थडकली की, १५००० फौजेसह शिवाजी महाराज सुरतेच्या अलिकडे फक्त २० मैलावर येऊन पोहोचले आहेत. महाराज सुरतेजवळ आल्याची बातमी ऐकताच शहरातील सर्व व्यापारी व सरकारी अधिकारी यांची एकच पळापळ सुरू झाली.दि. २ ऑक्टो. १६७० च्या दिवसभर व रात्रीही सर्वत्र पळापळ सुरू होती.
दि. ३ ऑक्टोबर १६७० ला सकाळीच महाराजांनी सुरतेवर हल्ला चढविला. यावेळी सुरतेला औरंगजेबाने संरक्षक तटबंदी केलेली होती. महाराज तटबंदीजवळ आले. मोगलांनी थोडाफार प्रतिकार करून पाहिला, पण १५००० फौजेपुढे ३०० सैनिकांचा पाड तो काय लागावा? पहिल्याच धडाक्यात मोगली सैन्य पळून गेले. मराठी फौज शहरात घुसली पाहता पाहता लुटीला आरंभ झाला. महाराज सुरतेला आल्याचे कळताच फ्रेंचांनी एक मौल्यवान नजराणा त्यांना पेश केला. त्यामुळे ते संकटमुक्त झाले. अखेर इंग्रजांचा नाद सोडून देऊन मराठे फ्रेंच बारीसमोरील एका जुन्या कारावान सराईवर चालून गेले. काशघरचा भूतपूर्व राजा नुकताच मक्का यात्रेहून परतून या सराईत उतरला होता, अब्दुल्लाहखान औरंगजेबाचा नातेवाईक असून तो औरंगजेबाकडेच निघालेला होता. औरंगजेबासाठी प्रचंड नजराणाही त्याने सोबत आणलेला होता. त्याच्याजवळ काही तातार सैनिक होते पण ते संख्येने फारच कमी होते. समोरचे फ्रेंच महाराजांपासून आपले संरक्षण करतील या भरवशावरच त्याने कारावान सराईचा आश्रय घेतलेला होता. फ्रेंच बखारीतील दोन सैनिक मराठ्यांनी टिपले क बहुधा त्यामुळे घाबरून जाऊन फ्रेंचांनी तार्ताऐवजी मराठ्यांनाच दारूगोळा पुरविला, अखेर नाइलाज झालेला पाहून संध्याकाळी तातर सैनिक सर्व संपत्ती मागे सोडून आपल्या राजासह किल्ल्याकडे पळून गेले. तार्तारांची प्रचंड संपत्ती महाराजांच्या हाती पडली. या संपत्तीत सोने, चांदी, मौल्यवान पदके एवढेच नव्हे तर एक सोन्याचा पलंगही होता !
दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ४ ऑक्टो. १६७० रोजी मराठे जुन्या सराईच्या आडोश्याने पुन्हा इंग्रज बखारीवर चालून गेले. पण मास्टरच्या कडव्या प्रतिकारापुढे मराठ्यांची दाळ शिजेना. तरीही मराठे जमेल तेवढे भाजून काढीत होतेच. मराठ्यांची एक तुकडी नव्या सराईवर चालून गेली. तिकडे तुर्की व इराणी लोक उतरलेले होते. त्यांनीही चिवट प्रतिकार सुरू ठेवला. त्यामुळे तिथेही मराठ्यांना पाऊल पुढे टाकता येईना. मराठ्यांच्या काही टोळ्या सुरतेत धिंगाणा घालीत होत्या. त्यांना मात्र भरपूर लूट मिळाली. सुरतेचे बरेच सावकार आसपासच्या खेड्यात पळून गेले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी महाराजांनी ५०० घोडेस्वार रवाना केले. त्यांनी एका खेड्यात घातलेल्या धाडीत नवल साहू व हरी साहू या सावकारांकडून १३००००० रुपयांची संपत्ती मिळविली. ५ ऑक्टोबर १६७० रोजी दुपारी शिवाजी महाराजांनी सुरत सोडली. पण सुरत सोडताना महाराजांनी सुरतेच्या मुख्य अधिकाऱ्यास व प्रमुख व्यापाऱ्यांकडे सालाना १२ लाख रुपयांची खंडनी न द्याल तर पुन्हा सुरतेत येऊन शहराचा उरलेला भाग जाळुन टाकेन असा इशारा दिला. सुरतेच्या या दुसऱ्या लुटीत शिवाजी महाराजांना एकूण ६६००००० (सहासष्ट लाख) रुपये लुट मिळाली. त्या पैकी सुरतेत ५३ लाख तर नवल साहू व हरी साहू या व्यापाऱ्यांकडून १३ लाख रुपये खंडनी मिळाली. या लुटिमुळे सुरतेतील सर्व व्यापार ठप्प झाला. मोगलांचे प्रचंड नुकसान तर झालेच होते. शिवाय औरंगजेबाच्या मोगली साम्राज्याची विश्वसनीयता संपुष्टात आली. अस्या सुरतेच्या दुसऱ्या लुटीच्या ठळक घडामोडी होत्या. लेख आपणास कसा वाटला हे आम्हास जरुर कळवा.
संदर्भ:-
शि.का.प.सा.स. १२३२, १२३४ १३३७,
शककर्ते शिवराय खंड २ – शिवकथाकार विजय देशमुख
संकलन:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे