हिम्मतबहाद्दर उदाजीराव चव्हाण…
सांगली-पुणे रस्त्यावर सांगलीपासून १० कि.मी.वर एक फाटा फुटतो. त्या रस्त्याने जवळपास एक कि.मी. गेल्यावर कसबे डिग्रज लागते. सांगली संस्थानातले हे एक टुमदार गाव. करवीर संस्थानाची ‘हिम्मतबहादर’ पदवी मिळालेल्या चव्हाण घराण्याचे जहागिरीचे गाव. अशा एका तत्कालीन अत्यंत शूर घराण्यातील उदाजीराव या हिम्मतबहादर विठोजींच्या चिरंजीवांची समाधी नळदुर्गच्या खंडोबा मंदिराच्या दारात आहे हे अनेकांना माहीत नसेल.
या चव्हाण घराण्याचे मूळ पुरुष बालोजी. त्यांचे पुत्र राणोजीराव चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वाचे सरदार आणि लष्करात मोठय़ा हुद्दय़ावर काम करत होते.
राणोजीरावांनी महाराजांसोबत बऱ्याच मोहिमांत भाग घेतला होता. सुरतेच्या स्वारीत राणोजीराव होते, असा उल्लेख सापडतो. नंतर सिद्दी च्या जंजिरा मोहिमेत लढत असताना ते धारातीर्थी पडले.
त्यांचे दोन पुत्र होते पैकी मोठे विठोजीराव व धाकटे मालोजीराव. विठोजीराव वयाने साधारण १८ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सरदार बनवले व त्यांना एका तुकडीवर लष्करी अधिकारी नेमून स्वराज्य सेवेत सामावून घेतले.
महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतही विठोजीरावांनी लष्करी सेवा इमानेइतबारे पार पाडली.
कर्नाटकात युद्ध सुरू असताना महानगर ऊर्फ बंगलोर इथे २२ मे १६९९ रोजी विठोजी मारला गेला. नंतर त्याचा पुत्र उदाजी याला रामचंद्रपंतांनी हिम्मतबहादर पदाची वस्त्रे दिली.
१७३२ रोजी सगुणाबाई िनबाळकर व िहदूराव घोरपडे यांना शाहूंची जी आज्ञापत्रे पाठविण्यात आली त्यात उदाजीरावांना ‘हिम्मतबहादर’ व ‘ममलकतदार’ असे दोन किताब लावलेले दिसतात. पैकी हिम्मतबहादर हा किताब जुना आहे.
उदाजीही त्यांच्या पूर्वजाप्रमाणे पराक्रमी होते. शाहू महाराज आल्यावर ताराबाईंच्या पक्षात जाऊन ते बत्तीस शिराळ्यात गढी करून राहिले होते.
उदाजी व दामाजी थोरात हे सातारा प्रांतापर्यंत स्वारी करत व चव्हाणचौथाई वसूल करत, गाव लुटत असा कार्यक्रम सुरूच होता. शत्रूच्या मुलखातून जबरदस्तीने चौथाई वसूल करण्याची मूळ कल्पना शिवाजी महाराजांची.
परंतु ही चौथाई प्रत्यक्ष स्वराज्यात उदाजीराव चव्हाण वसूल करत असल्याने त्याला कुचेष्टेने चव्हाण चौथाई असे नाव मिळाले होते, असे उल्लेख कागदपत्रात आहेत.
याचा त्रास एवढा जाणवत होता की, त्या त्या प्रांतातील सरदारांनाही या अरिष्टनिवारणार्थ आपापल्या प्रजेवर ‘चव्हाणपट्टी’ असा एक स्वतंत्र कर लादला होता, आणि त्या पैशातून ते फौजा बाळगून उदाजीरावांशी लढा देत.
उदाजीरावांचे चुलते मालुजी चव्हाण यांना इ.स. १७३८ मध्ये डिग्रज हा सरंजाम म्हणून शाहूराजाकडून मिळाला होता. शिवाय कर्नालपैकी निम्मा गाव त्यांना पालखीच्या खर्चासाठी शाहूंनी इ.स. १७४४ साली दिला होता.
मिरज प्रांतापैकी फक्त हे दीड गाव आता या घराण्याकडे चालू राहिले. अशा या पराक्रमी उदाजीरावांचा मृत्यू नेमका कोठे झाला याचा उल्लेख नाही.
पण कै. रथाजीराव चव्हाण यांनी आपल्या कैफियतीत यासंबंधी जो मजकूर लिहून ठेवला आहे त्यानुसार इ.स. १७६२ च्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात या विरण्यात योद्धय़ाचा एका लढाईत अंत झाला.
अक्कलकोटकर व हिम्मतबहादर यांचे एका हद्दीच्या गावाबद्दल कलह चालू होता. तेथे लढाई झाली त्यात उदाजीराव ठार झाले.
त्यांचे पुत्र विठोजीराव व प्रीतीराव हे उभयता नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे होते.
त्यांनी उदाजीरावांचा देह नळदुर्गला आणून अणदूर येथील श्रीखंडोबा मंदिराच्या बाहेर त्यांची समाधी बांधली.
या समाधीचा जीर्णोद्धार इ.स. २००६ मध्ये करण्यात आला.