हिंगुळजा देवी – पाकिस्तानातून गडहिंग्लजला !!!
हे वाचून काहीतरी भलतंसलतं लिहिलंय असं वाटलं ना ? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी की ही गोष्ट अगदी खरी आहे. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. आणि म्हणूनच इथे तुम्हाला याबद्दल काही सांगावं म्हणून लिहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये भटकंती करत असताना खरोखरच काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधू गेलो तर एकतर मिळत नाहीत, आणि जे मिळतात ते थक्क करणारे असतात.(हिंगुळजा देवी)
गडहिंग्लज हे गाव आणि तिथल्या हिंगुळजा देवीबद्दल असेच काहीसे म्हणावे लागेल. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार सतीचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकड्यांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानी बीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. हे जरी हिंदूंचे तीर्थस्थान असले तरीदेखील इथली मुसलमान जनता नानी बीबी या नावाने या देवीची पूजा करतात असे सांगितले जाते.
या हिंगुळजा देवीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. अगदी पराशुरामापासून ते श्रीरामापर्यंत अनेकांशी या कथा निगडीत आहेत. परशुरामाच्या क्रोधाला याच हिंगुळा देवीने शांत केले. तसेच रावणवधानंतर काही प्रायश्चित्त घेण्यासाठी श्रीराम हे सीता, लक्ष्मण, आणि हनुमानासमवेत याच हिंगुळा देवीच्या दर्शनाला आले होते. अशा प्रकारच्या अनेक कथा प्रचलित आहेत. याठिकाणी असलेली देवीची मूर्ति शेंदूरचर्चित तांदळा स्वरुपात आहे. ती स्वयंभू असल्याचे सांगतात. पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंसाठी एप्रिल महिन्यात येणारी हिंगुळा देवीची यात्रा म्हणजे मोठी पर्वणी असते. पूर्वी जवळजवळ ३०० कि.मी. ची रणरणत्या वाळवंटातून पायपीट करून तिथे जावे लागे. आता मात्र तिथपर्यंत उत्तम सडक झालेली आहे. नानी की हाज या नावाने पण ही यात्रा प्रसिद्ध आहे.
तीच हिंगुळा देवी गडहिंग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली. गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेले तालुक्याचे गाव. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेले सुंदर असे शहर. हिंगुळा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. याच गडहिंग्लजमध्ये एका छोट्याशा टेकडीवर हिंगुळा देवीचे मंदिर वसलेले आहे. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठ्या व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली.
मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात असलेले तेर हे गाव अगदी प्राचीन म्हणजे सातवाहनांच्या काळापासून एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. या गावीसुद्धा हिंगुळा देवीचे मंदिर आहे.
हिंगुळा देवीचे अजून एक मंदिर राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात देखील ही हिंगुळादेवी असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते. गडहिंग्लज गावाला लागूनच असलेल्या छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत असून तिथून सगळ्या गावाचा परिसर न्याहाळता येतो. या डोंगराला गुड्डाईचा डोंगर या नावानेच ओळखले जाते. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या डोंगरावरून खाली आले की भडगाव मध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे.
मूर्तीच्या हातात मशाल, कमळ अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात. नाईक घराण्यामध्ये परंपरागत देवीची पूजा चालू आहे. गडहिंग्लज गाव आणि सारा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. सुप्रसिद्ध गिरीस्थान आंबोलीच्या जवळच असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. मुळात हिंगुळा देवी आणि तिची मंदिरे भारतात अगदीच दुर्मिळ. त्यातही महाराष्ट्रात या देवीच्या नावावरून एका मोठ्या गावाचे नाव पडलेले आहे. अशा या गडहिंग्लज ठिकाणी येऊन मुद्दाम या आगळ्या वेगळ्या हिंगुळा देवीचे दर्शन आवर्जून घ्यावे. नवरात्रात देवीची उपासना करताना मुद्दाम वेगळ्या रुपात असलेल्या निरनिराळ्या देवींना भेट देऊन त्यांचे दर्शन घ्यावे. आणि आपली नवरात्राची उपासना सत्कारणी लावावी.
आशुतोष बापट