हिराबाग | Hirabag –
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांच्या काळात पुणे शहराच्या विकासाचा आणि समृद्धीचा पाया घातला गेला, ते पुण्याचे खरे शिल्पकार. पुण्याच्या भरभराटीसाठी त्यांनी अनेक कामे केली. पर्वती तळ्याच्या पार्श्वभूमीवर सारसबागेजवळ नानासाहेब पेशव्यांनी हिराबाग ही नयनरम्य बाग खासगी वापरासाठी निर्माण केली. टिळक रस्त्याने अप्सरा हॉटेलशेजारून एक रस्ता आत जातो, तिथून आत गेल्यावर समोर हिराबागेची जागा आहे. सध्या या जागेला टाऊन हॉल म्हणतात.
इ.स. १७५५ मध्ये नानासाहेबांनी पर्वती तळ्याकाठी बागेसाठी जागा निवडून तेथे एक घर बांधले. या घराचा दिवाणखाना पेशवेकालीन पद्धतीचा आहे. या दिवाणखान्याच्या पश्चिमेस फरसबंदी चौक होता. या चौकातून पर्वती तळ्याकडे उतरत जाणाऱ्या रुंद पायऱ्या होत्या. या चौकातून पर्वती तळ्याचे व बेटावरील गणपती मंदिराचे विहंगम दृश्य दिसत असे. घराच्या वरच्या मजल्यावर मधोमध प्रशस्त गच्ची आहे. या गच्चीला जोडून एक पारंपरिक मराठा शैलीतील दिवाणखाना आहे. या दिवाणखान्यातील दुतर्फा असलेले शिसवी खांब नक्षीदार महिरपींनी जोडलेले आहेत. दिवाणखान्याच्या लाकडी छतावर सुंदर नाजूक नक्षी कोरलेली आहे. या दिवाणखान्यात पूर्वी चिरेबंदी दगडाची फरशी होती. या फरशीचे अवशेष इमारतीच्या काही भागात आढळतात. घराच्या सभोवताली १४ एकरांत फळाफुलांची बाग विकसित करण्यात आली होती. या घराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून, या प्रवेशद्वाराच्या पुढे भव्य फरसबंदी चौक आणि कारंजे होते. त्याच्यापुढे रुंद तळे होते. तत्कालीन इंग्रजी साधनांमध्ये या बागेचा उल्लेख प्लेझर हाऊस किंवा डायमंड गार्डन असा केलेला आढळतो.
पहिल्या माधवराव पेशव्यांच्या विवाहाचा भोजन समारंभ या ठिकाणी झाल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात आहे. वसंतपंचमी, रंगपंचमी यांसारखे उत्सव या ठिकाणी साजरे होत. मानकऱ्यांना जेवणासाठी आमंत्रणे असत.
इ. स. १७६३ मध्ये निजामाने पुण्यावर केलेल्या स्वारीच्या वेळी हिरावागेचे नुकसान झाले. पहिल्या माधवराव पेशव्यांनी येथील घराची आवश्यक तेथे डागडुजी केली. या इमारतीतील दिवाणखान्याच्या पश्चिमेस व उत्तर-दक्षिण भागात लहान-मोठ्या खोल्या आहेत. दिवाणखान्यांच्या खिडक्या व दरवाजे पाश्चिमात्य पद्धतीचे असून त्यांना काचेची तावदाने आहेत. येथील खोल्या व खिडक्या- दरवाज्यांचे काम १९ व्या शतकात झाले असावे. खोल्यांच्या भिंतींवर काही ठिकाणी पेशवेकालीन देवळ्या व महिरपी कोरलेल्या आहेत. वेळोवेळी इमारतीची दुरुस्ती करताना गरजेनुसार येथील खोल्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. नानासाहेब पेशव्यांनंतर थोरले माधवराव पेशव्यांनीही या बागेचा आणि घराचा वापर केला. पण या बागेला खरे महत्त्व प्राप्त करून दिले, ते दुसरे बाजीराव पेशवे यांनी. त्यांच्या काळात या बागेत इतके समारंभ झाले की, लोकांची अशी समजूत झाली की, ही बाग त्यांनीच तयार केली. सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांनी या बागेचा उपयोग इंग्रज मानकऱ्यांना, रेसिडेंट व इतर अधिकाऱ्यांना शाही मेजवानी देण्यासाठी केला.
इ.स. १८०३ मध्ये लॉर्ड व्हेलेन्शिया या ब्रिटीश प्रवाशाने पुण्यास भेट दिली होती. दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारात त्याने उपस्थिती लावली होती. या प्रसंगी बाजीरावाने पाहुण्यांकरिता हिराबागेत भव्य मेजवानीचे आयोजन केले होते. इंग्रजांचा पुण्यातील रेसिडेंट बॅरी क्लोज, इंग्रज अधिकारी यंग, सॉल मरे व स्मिथ यांच्या सोबत लार्ड व्हेलेन्शिया यांनी हिराबागेस भेट दिली होती. हिराबागेतील घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या व्हरांड्यामध्ये पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या व्हरांड्यामध्ये दोन्ही बाजूंस बसण्याकरिता पांढऱ्या शुभ्र कापडांनी आच्छादित बिछायती घालण्यात आल्या होत्या. अस्सल पेशवाई पद्धतीने केळीची पाने, सोन्याच्या फुलांचे पाट, रांगोळ्या, उदबत्त्या, समया असा जेवणावळीचा थाट केला होता. इंग्रजांना खाली बसून जेवणे अवघड गेले. पण त्यांच्या वर्णनाप्रमाणे, त्यांनी काहीही तक्रार न करता जेवणाचा आनंद घेतला. येताना ते बरोबर काटे, चमचे, सुऱ्या घेऊनच आले होते. त्यांचा वापर करून त्यांचे जेवण झाले.
भोजनानंतर येथील दिवाणखान्यात पाहुण्याच्या मनोरंजनार्थ नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी दुसऱ्या बाजीरावास अनेक भेटवस्तू दिल्या. पेशव्यांकडूनही पाहुण्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नंतर दुसऱ्या बाजीरावाने स्वतः सर्व पाहुण्यांना पानसुपारी देऊन निरोप दिला. लॉर्ड व्हेलेन्शियाने हिराबागेतील कार्यक्रमाचे वर्णन ‘व्हॅलेन्शियाज ट्रॅव्हल्स’ या प्रवासवर्णनात केलेले आहे. तसेच त्याने हिराबागेत नारळ, आंबा व अनेक प्रकारचे वृक्ष व इमारतीसमोर असलेल्या, द्राक्षवेलींनी वेढलेल्या सुंदर कारंज्याचे वर्णनही आपल्या प्रवासवर्णनात केलेले आहे. इ. स. १८०४ मध्येही बाजीरावाने जनरल वेलस्लीला ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा प्रतिनिधी म्हणून शाही खाना दिला आणि मानाचा पोशाख नजर केला. या पोशाखासाठी खर्ची पडलेल्या रकमेची नोंद उपलब्ध आहे त्यानुसार, वेलस्ली रु. ४५५, मि. वेब रु. ३७६, क. कोलमन रु. ३६९, बॅरी क्लोज रु. १२८ आणि डॉ. वेल्स रु. १३७ अशा रकमेचे पोशाख दिले गेले.
पेशवाईनंतर पेशव्यांच्या मिळकती इंग्रजांकडे आल्या. हिराबागेत पुण्यातील नागरिकांकरिता सार्वजनिक व्यासपीठ करण्याची योजना न्या. महादेव गोविंद रानडे व पुण्यातील इतर मान्यवरांनी आखली. या योजनेनुसार हिराबाग विकत घेऊन तेथे इ.स १८७४ मध्ये टाऊन हॉल कमिटीची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात हिराबागेत अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले. इ.स. १८९७ मध्ये लो. टिळकांच्या प्रयत्नाने स्वामी विवेकानंदांचे व्याख्यान येथे झाले होते. हिराबाग टाऊन हॉल कमिटीची नियमावली व कार्यपद्धती मुंबईच्या टाऊन हॉलच्या धर्तीवर आहे. युरोपियनांप्रमाणे एखादा क्लब असावा या उद्देशाने सर विश्वेश्वरय्या यांनी येथे डेक्कन क्लबची २१ सप्टेंबर १८८१ मध्ये स्थापना केली. या क्लबच्या सुरवातीच्या सभासदांमध्ये रँग्लर परांजपे, तात्यासाहेब केळकर इत्यादी पुण्यातील मान्यवरांचा समावेश होता.
लो. टिळकांनी इ.स. १८९५ मध्ये शिवजन्मोत्सवाचे कार्य हाती घेतले. तळेगावचे सरदार खंडेराव दाभाडे यांच्या आणि स्वतःच्या सहीने टिळकांनी पत्रक काढून हिराबागेत ३० मे १८९५ रोजी सायंकाळी जंगी सभा भरविली आणि त्यामध्ये पेशवाई अखेरपासून निद्रिस्त पडलेल्या रायगडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा पण केला. ‘केसरीमध्ये याविषयी लेख लिहून त्यांनी सरकारचे, दोन्ही छत्रपतींचे आणि जनतेचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले, इतकेच नव्हे तर या कार्यासाठी निधी जमविण्यासही आरंभ केला.
बागेचे मूळ प्रवेशद्वार पूर्वेला होते. आता त्याशेजारी स्टेडियम बांधले असल्याने बाजूच्या छोट्या दारातून इमारतीत जावे लागते. आत गेल्यावर समोर नानासाहेबांनी हौसेने बांधलेला शिसवी खांब- महिरपींनी शोभणारा दिवाणखाना दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूला छोटे चिंचोळे जिने वरच्या लहान खोल्यांत जातात. या दोन खोल्यांच्या मध्ये गच्च्ची आहे. पुण्यातल्या इतर स्थळांची जशी कमी अधिक प्रमाणात परवड झाली, तशीच हिराबागेचीही झाली. समोरचे तळे आटले. नगरपालिकेने अर्धा खड्डा बुजवून तेथे सणस मैदान केले. समोरची बाग उजाड झाली. तेथे क्रिकेटचे मैदान तयार केले.
संदर्भ:
हरवलेलं पुणे – डॉ. अविनाश सोवनी
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पत्ता : https://maps.app.goo.gl/PpsWM7t7RGkinDsD9
आठवणी इतिहासाच्या