धरणाच्या पोटातील हिर्डोशी, ता.भोर –
उन्हाळ्यात पाणी साठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.नदी प्रवाहाच्या दोन्ही बाजूला प्रामुख्याने लोकवस्ती म्हणजेच गाव,वाडी,वस्ती असते.भोर तालुक्यात शिरगाव येथे निरा नदीचा उगम झालेला आहे.या निरा नदीच्या दोन्ही बाजूला अनेक गावे वसलेली होती.इतिहासात “हिरडस मावळ” या नावाने या गावांची सामूहिक ओळख होती.देश व कोकण यांना जोडणारा वरंध घाट हा याच विभागात येतो.संपूर्ण भाग सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आहे.या डोंगरात प्रामुख्याने हिरडा,बेहडा,आइन,शिसव,सागवान इत्यादी वृक्षाची झाडे आहेत.सर्वात जास्त प्रमाण मात्र हिरडा याचे आहे.हिर्डोशी.
हिर्डोशी या भोर-महाड रस्त्यावर असलेल्या गावाला येथील सर्वात जास्त हिरडा उत्पन्नामुळे हे नाव मिळाले आहे.सुमारे वीस एक वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने निरा नदीवर देवघर येथे “निरा देवघर धरण” बांधले.त्यानंतर नदीच्या दोन्ही बाजूची सर्व गावे विस्थापित झाली.भोर ते महाड या रस्त्यावरचे महत्त्वाचे व्यापारी गाव हिर्डोशी हे देखील विस्थापित झाले.निरा देवघर मधील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याखाली गेलेले पूर्वीचे हिर्डोशी दिसून येते आहे.
जुन्या हिर्डोशीच्या खाणाखूणा दिसून येतात.त्या काळची डांबरी रस्ता चांगल्या अवस्थेत असून गावाच्या जवळ वाहनांनी वेग मर्यादित ठेवावा म्हणून असलेले वेग नियंत्रक रस्त्याचे उंचवटे शाबूत आहेत.रस्त्याच्या दोन्हीही बाजूला असलेल्या व्यायसायिकांच्या दुकानाचे जोते तेथील वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतात.जि.प.शाळा,आरोग्य केंद्र,पिठाची गिरणी,पोलिस स्टेशन,निवासी वास्तू ,ग्रामदैवत इत्यादींचे अवशेष आहेत.
जुन्या हिर्डोशीच्या बस थांब्या जवळच एक दगडी शिळा असून तिच्यावर “महाड २५ कि.मी.” असे लिहलेले सुस्पष्ट दिसते.आज मात्र येथून महाड ४५ कि.मी.अंतरावर आहे.विकासाने दोन गावातील अंतर मात्र वाढले आहे.
स्थानिक नागरिक मोठ्या आत्मियतेने ही आमची शाळा,हा दवाखाना,हे माझे घर असे बोटाने दाखवित होते.न कळतच जुन्या आठवणीत रममान होत होती.शासनाने स्थानिकांना नुकसान भरपाई देऊन त्यांचे पुर्नवसन केले पण गावच्या मातीत रुतलेल्या भाव भावना,कटू गोड आठवणी ह्या पाण्या खालीच राहिल्या आहेत.उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर गावकरी हमखास येथे येतात,सभोवतालच्या परिसरात भिर भिरत्या नजरेने काही तरी शोधताना दिसतात.असे काय राहिले आहे या मातीत! मित्रांनो,आठवणींचे गोड सुख.आजही गतकाळातील वैभवशाली “हिर्डोशी”त्यांच्या डोळ्यासमोर येते.
पडझड झालेले ग्रामदैवत शंभू-महादेवाचे पुर्वाभिमूखी मंदिर आहे.मंदिरात शिवलिंग आहे.समोरील बाजूला काही शुरवीरांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या ब-याच वीरगळ आहेत.झाडे ही माणसापेक्षा जास्त आपल्या मातीवर प्रेम करतात हे येथे पाहावयास मिळते,कारण सलग २० वर्षे पाण्याखाली राहून ती अंशतः शाबूत असल्याचे दिसून येते.पडक्या अवशेषांशी ही निर्जिव झाडे आपल्या गतकाळातील वैभवाच्या आठवणी नक्कीच सांगत असणार आणि शेवटच्या क्षणापर्यत साथ देण्याच्या आणाभाका शंभू महादेवाच्या साक्षीने घेत असतील.
© सुरेश नारायण शिंदे,भोर