महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,117

हिरकणी एक लोककथा

Views: 12315
7 Min Read

हिरकणी एक लोककथा –

हिरकणीच्या धाडसाची व मातृप्रेमाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते. परंतु हि हिरकणी कोण नक्की तिने काय धाडस केले , हिरकणीच्या या धाडसाच्या कथेस काही ऐतहासिक संदर्भ आहेत कि लोककथा , हिरकणीचे वंशज याविषयी सदर लेखात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू .

हिरकणीच्या धाडसाची कथा –

शिवकाळात रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येत असत . त्याप्रमाणे “हिरा” नावाची एक गवळण आपल्या घरातील गाईंचे दुध घेऊन गडावर विकण्यासाठी येत असे. या विक्रीतून होणाऱ्या उत्पनातून तिचा व तिच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असे. हिरकणीचा हा नित्याचा दिनक्रम होता. सकाळी गडावर येऊन दुध विकणे व संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद होण्याच्या आत गडावरून खाली उतरून घरी परत जाणे. शिवाजी महाराजांच्या आज्ञानुसार गडाचे दरवाजे सकाळी उघडत असत व सायंकाळी गडाचे दरवाजे बंद होत असत .

हिरकणी बाळंत झाली व तिला मुलगा झाला. हिरकणीच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे गडावर दुध विकणे . त्यामुळे नाईलाजाने हिरकणीला आपल्या तान्ह्या मुलास घरी पाळण्यात निजवून गडावर दुध विक्रीस जावे लागे. हिरकणी गडावर जावून दुध विकी व बाळाच्या ओढीने लवकर गडावरून खाली उतरून घरी परते. एके दिवशी नित्यनियामाप्रमाणे हिरकणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावर दुध विकण्यासाठी गेली असता तिचे दुध विकले गेले नाही त्यामुळे दुध विकून परत गड उतरण्यास तिला उशीर झाला व संध्याकाळ कधी झाली हेच तिला कळले नाही. ज्यावेळी हे हिरकणीच्या लक्षात आले तशी ती बाळाच्या ओढीने धावत धावत गडाच्या महादरवाज्याजवळ आली परंतु दुर्दैवाने संध्याकाळ होऊन गेल्याने गडाच्या पहारेकऱ्यानी गडाचे दरवाजे बंद केले.

हिरकणीचा जीव तिच्या बाळासाठी कासावीस होऊ लागला तिने गडाच्या पहारेकऱ्याना गडाचे दरवाजे उघडण्याची विनंती केली. परंतु शिवाजी महाराजांची आज्ञा असल्याने पहारेकरी हुकमाचे बांधील होते त्यांनी हिरकणीची विनंती नाकारली. हिरकणीचे बाळ लहान होते त्यामुळे ते सर्वस्वी तिच्यावरच अवलंबून होते. आपले बाळ उठले असेल आणि भुकेने रडत असेल या विचाराने हिरकणीचा जीव कासावीस झाली तिला तिच्या डोळ्यासमोर तिचे बाळ दिसू लागले. आपल्या बाळासाठी तिने गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला . परंतु रायगड कडेकपारी , जंगली श्वापद यांनी युक्त अवघड किल्ला होता. रात्रीच्या अंधारात उतरताना जर हात सुटला किंवा पाय घसरला तर मृत्यू हा ठरलेलाच. हिरकणी गडावरून खाली जाण्याची वाट शोधत एका टोकापाशी आली व तेथून गड उतरण्याचा निर्णय केला. हिरकणी ज्या कड्यावरून उतरत होती तो कडा दिवसाच्या प्रकाशात देखील उतरणे अशक्य होते. हिरकणीला काटे टोचत होते , पायाला व हाताला जखमा झाल्या परंतु बाळाच्या प्रेमापुढे तिला ह्या वेदना जाणवत न्हवत्या . अखेरीस तिने त्या कड्यावरून सुखरूप खाली उतरत आपल्या घराकडे धाव ठोकली व आपल्या बाळास जवळ घेतले.

दुसऱ्या दिवशी रायगडावर हिरकणी गड उतरून घरी गेल्याची बातमी पसरली .शिवाजी महाराजांना हि बातमी समजली शिवाजी महाराजांना हिरकणीच्या या धाडसाचे कौतुक वाटले तसेच रायगडाच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटली. हिरकणीला मानसन्मानाने शिवाजी महाराजांसमोर आणले गेले. शिवाजी महराजांनी तिला बक्षीस दिले तसेच साडी–चोळी देवून तिचा सत्कार करण्यात आला. हिरकणी ज्या कड्यावरून खाली उतरली तो कडा दुर्गम करण्यात आला व तिथे तटबंधी बांधून बुरुज बांधण्यात आला . सदर बुरुजास हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देउन हिरकणीचा गौरव करण्यात आला.

हिरकणीवरील कविता –

हिरकणीच्या या मातृप्रेमावर व धाडसावर अनेक कवींनी काव्य केले. शैक्षणिक अभ्यासक्रमात हिरकणीच्या धाडसाची कथा व काव्य समाविष्ट केले गेले. कवी विनायक व कवी गणेश टिपणीस यांची हिरकणीवरील काव्य प्रसिद्ध आहेत . कवींनी आपल्या काव्यातून हिरकणी जनसामान्यात पोहचवली.

गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परत झणी निघाली पायथ्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई पार धाव ||
शिवप्रभुंचा निर्बंध एक होता तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता सर्व दरवाजे अचुक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे ||
सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटेना तेथ कुणी वाली कोण पाजिल तरी तान्हुल्यास आता ? विचारे या बहु दु:ख होय चित्त ||
मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावयाला नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा एक होता पथ रायागडी खासा ||

भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरती पाय वाट पाय चुकता नेमका मृत्यु येई परी माता ती तेथुनीच जाई ||
उतरू लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरि तनुस लागलेले अंग खरचटले वस्त्र फाटलेले आशा वेषे ती घराप्रति चाले ||
वृत घडले शिवभूपकर्णि जाता वदे आनंदे “धन्य धन्य माता !” कड्यावरती त्या बुरुज बंधियेला नाव दिधले “हिरकणी बुरुज” त्याला ||

:- कवी विनायक

ऐतीहासिक संदर्भ

रायगड एका मावळ्याने सर केल्याची नोंद आढळून येते. शिवाजी महाराजांनी दवंडी देवून रायगड शिडी किंवा दोर या साधनांच्या मदतीशिवाय जो सर करेल त्यास सोन्याचे कडे बक्षीस म्हणून जाहीर केले. एका मावळ्याने हे आव्हान स्वीकारत रायगड सर केला त्याचा शिवाजी महाराजांनी सत्कार केला. रायगड चढून आलेला मार्ग दुर्गम करून बंद केला गेला. कदाचित या प्रसंगाचे रुपांतर होऊन नंतर हिरकणीच्या लोककथेत झाले असण्याची शक्यता असू शकते. रायगडाच्या टकमक टोकाविषयीदेखील आपणास दंतकथा आढळून येते. एक मावळा शिवाजी महाराजांवर छत्री धरून उभा होता. टकमक टोकावरील आलेल्या जोराच्या वाऱ्यात तो छत्रीसह उडाला व तो ज्या ठिकाणी उतरला त्यास शिवाजी महराजांनी छत्रीनिजामपूर असे दिले.

रायगडावर हिरकणी बुरुज अस्तित्वात आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील गावकरी आपण हिरकणीचे वंशज असल्याचे सांगतात. ऐतिहासिक पेशवेकालीन कागदपत्रात हिरकणी बुरजाची डागडुजी व हिरकणी बुरजावर तोफ असल्याचे उल्लेख आढळतात . हिरकणीची कथा म्हणजे आईच्या प्रेमाची साक्ष परंतु दुर्दैवाने ह्या प्रसंगास कोणतेही ठोस ऐतीहासिक संदर्भ आढळून येत नाहीत. हिरकणीच्या या धाडसाची दखल कोणत्याही समकालीन किंवा उत्तरकालीन बखारकाराने घेतली नाही . हिरकणीस दिलेल्या बक्षीसाचा उल्लेख देखील कोणत्या पत्रात आढळून येत नाही. लोककथेतून व काव्यातून हिरकणी जनसामान्यांच्या मनात घर करून राहिली परंतु इतिहाच्या संदर्भ साधनातून या कथेस कोणताही संदर्भ मिळत नाही त्यामुळे लिखित स्वरूपाच्या संदर्भांअभावी हिरकणीची कथा म्हणजे एक दंतकथाच मानवी लागते.

श्री . नागेश सावंत

संदर्भ :- रायगडाची जीवनकथा :- शांताराम आवळस्कर
छायाचित्र साभार गुगल

Leave a Comment