ऐतिहासिक मनोरे, कराड –
कराड शहर हे कृष्णा-कोयनेच्या संगमावर पुणे-बंगलोर महामार्गावर वसलेले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा असलेले हे शहर आहे. जवळच आणि आगाशिवची लेणी असा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अशाच एका कराडच्या मध्यवर्ती असणाऱ्या मनोऱ्याच्या ऐतिहासिक मनोरे मशिदीबद्दल आज माहिती देणार आहे.
कराडची ही मशीद मनोऱ्याची मशीद म्हणून प्रसिद्ध आहे. याला कारण असे की मशिदीच्या तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ दगडी चौथऱ्यावर दोन्ही बाजूस जवळ जवळ 32 मीटर उंचीचे मिनार उभारलेले आहेत.
या मशिदीत असलेल्या शिलालेखांवरून असे समजते की वास्तू हिजरी ९८० (इसवी सन १५७२|७३) ते हिजरी ९८३ (इसवी सन १५७५|७६) या काळात बांधून पूर्ण झाली. ज्या शिलालेखात याच काल उल्लेख आला आहे तो शिलालेख दक्षिणेच्या खांबावर उत्तर बाजूस जमिनीपासून सुमारे ५ फुटांवर आहे. ज्याची लांबीरुंदी १’६ व १’२ आहे या लेखाभोवती नक्षीदार कमान केली आहे. ४ओळींचा असलेला हा फारसी शिलालेखातून अशी माहिती मिळते की ही, इमारत(मशीद) बांधण्याचे काम ‘पहिलवान अली बिन मुहम्मद इसफहानिस तीरेअंदाज खान’ याकडे सोपवले आहे. त्यांनतर इमारत बांधणीचे वर्ष हिजरी ९८० ते ९८३ असे दिलेले आहे.
या व्यतिरिक्त मशिदीत अजून फारसी शिलालेख आहेत त्यातील एकावर शहा अली आदिलशाह याचा उल्लेख आला आहे. आणि त्याच्या कारकिर्दीत या इमारतीचा पाया रचला गेला अशीही माहिती आली आहे. याशिवाय इतर जे शिलालेख आहेत त्यात कुराणातील वचने खोदलेली आहेत. येथे लहानमोठे असे एकूण 9 शिलालेख मिळाले आहेत.
मशिदीच्या आवारात हमामखाना (स्नानगृह) आणि खानिका (सुफीच्या राहण्याची जागा) आहे. मशिदीच्या पुढे नव्याने उभारण्यात आलेल्या मंडपामुळे दर्शनी भाग झाकला गेला आहे.
संदर्भ- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड,१
सातारा गॅझेटिअर
-Santosh Tupe (संतोषथॉट्स)