गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे –
छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय, करवीर गादी.
पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्थेत कुटुंबाचा सामाजिक दर्जा,स्थान टिकून राहण्यासाठी तसेच संपत्ती,वैभव परंपरा,रूढी,प्रथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होण्यासाठी मुलगा जन्माला येणे अत्यावश्यक समजले जाते.कालमानानुसार त्यात काही बदल घडले असले तरी अजूनही बहुसंख्य जनता वंशाला दिवा हवाच,ह्या मानसिकतेतून बाहेर पडलेली नाही.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे)
ज्या कुटुंबात पुत्रप्राप्तीचे प्रयत्न निष्फळ ठरतात त्यांना दुसऱ्या कुटुंबातील मूल दत्तक घेणे वा वंश समाप्तीस सामोरे जाणे याशिवाय अन्य पर्याय राहत नाही.सामान्य माणसासाठी वंशाला दिवा असणे हि गोष्ट इतकी महत्वाची असेल तर राजेरजवाडे,सरदार,जहागीरदार,समाजातील उच्चभ्रू मंडळी ह्यांची गोष्टच न्यारी.आज पासून शीर्षकात सांगितल्या प्रमाणे मराठेशाहीतील काही उल्लेखनीय दत्तक प्रकरणे समूह सदस्यांच्या माहितीसाठी लिहिण्याचा मानस आहे.दत्तक देण्या/घेण्या मध्ये विविध पक्षांचे नानाविध हितसंबंध असत जसे कि आपल्या पसंतीचा दत्तक निवडून त्याच्या आडून राज्यकारभार करणे, निपुत्रिकाचे राज्य आपल्या राज्यात विलीन करणे,तसे जमत नसेल तर दत्तक नामंजूर करून राज्य,जहागीर खालसा करणे,इ.
आजच्या भागात कोल्हापूर गादी च्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ( प्रथम ) पश्चात घेतलेल्या दत्तकाची माहिती देत आहे.छत्रपती राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई ह्यांचा पुत्र म्हणजे संभाजी महाराज प्रथम हे होय.ताराराणी आणि त्यांचा पुत्र छ.शिवाजी प्रथम यांना रामचंद्रपंत अमात्यांच्या मदतीने राजसबाईनी करवीर गादीवरून सत्ताभ्रष्ट करून आपला मुलगा संभाजी यांस ऑगस्ट/सप्टेंबर १७१४ मध्ये सिंहासनारूढ केले.छ.संभाजी महाराजांनी ४६ वर्षे राज्यकारभार पाहिला,त्यात त्यांच्या कर्तबगार पत्नी जीजाबाईनचे खूपच मोठे योगदान आहे.छ.संभाजी महाराजांचे २० डिसेम्बर १७६० रोजी निधन झाले.सात विवाह होऊन पण त्यांना पुत्र संतती झाली नाही.महाराजांच्या मृत्यू समयी त्यांची शेवटची राणी कुसाबाई गरोदर होती. छ. संभाजी महाराजांनी आपला वारस म्हणून शरीफजी भोसल्यांच्या ( शहाजी राजांचे बंधू,शककर्ते छ.शिवाजी महाराजांचे चुलते ) वंशातील शहाजीराव खानवटकर यांचा पुत्र माणकोजीस दत्तक घ्यावे अशी आज्ञा दिली होती. अशा प्रकारे दत्तक कुणास घ्यावे हे नक्की झाले होते.
जिजाबाईंनी सर्व मंत्री,कारभाऱ्यान बरोबर विचारविमर्श करून शहाजीराव भोसले खानवटकर ह्यांच्याकडे आपल्याकडील प्रतिष्ठित सरदार पाठवून त्यांचा मुलगा माणकोजी ह्यांस दत्तक घेण्याची इच्छा कळविली.खानवटकरानी जिजाबाईन च्या प्रस्तावास मान्यता दिली पण त्यासाठी पेशव्यांकडून अनुमती पत्र आणावे अशी अट घातली. अशी अट घालण्यामागे नानासाहेब व त्यांच्या नंतर थोरले माधवराव पेशवे ह्यांची करवीर राज्यासंबंधी असलेली भूमिका होती.नानासाहेब आणि संभाजी राजे ह्यांच्यात इ.स.१७४० मध्ये करवीर आणि सातारा गाद्यांच्या विलीनीकरणा संबंधात एक गुप्त करार झाला होता,पण तो अंमलात येऊ शकला नाही.एकत्रीकरणाचा करार जरी बारगळला तरी दोन्ही राज्यांचे एकत्रीकरण करून एकच मराठा राज्य अस्तित्वात आणण्याचा विचार नानासाहेब व थोरले माधवराव पेशवे यांच्या मनातून गेला नव्हता.त्यामुळे जिजाबाईनच्या मनात पण पेश्व्यांविषयी संशय असायचा.
छ.संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर जिजाबाइनी महादजी भोसले-मुंगीकर यांच्या उमाजी भोसले ह्या भावास कोल्हापूरच्या गादीवर बसवून कारभार जिजाबाई नी करावा असे पेशव्यांनी कळविले.पण जीजाबाईना नानासाहेबांचा प्रस्ताव मंजूर नसल्याने त्यांनी तो फेटाळून लावला.तसेच पेशव्यांनी छ.संभाजी राजांची गरोदर पत्नी कुसाबाई बाळंत होईपर्यंत वाट पहावी,असे पण जिजाबाई नी सांगितले. तोपर्यंत “ पेशव्यांनी नियोजित केलेला इसम आपण दत्तक घेणार नाही,पेशव्यांनी त्याला परत घेऊन जावे आणि प्रसंग अधिक निकराला येऊ देऊ नये “असा इशारा सुद्धा दिला.जिजाबाई नी एकीकडे पेशव्यांशी वाटाघाटी,बोलणी चालू ठेवली तर दुसरीकडे पेशव्यांनी करवीर राज्य जप्तीसाठी पाठविलेल्या फौजेशी सामना देण्याची तयारी पण चालू ठेवली.एके दिवशी करवीर फौजेने करवीर राज्य जप्तीसाठी पेशव्यांनी पाठविलेल्या फौजेवर अचानक हल्ला करून त्यांस पराभूत केले.ह्याच सुमारास नानासाहेब पानिपत मोहिमेत अडकले होते.त्यामुळे सशस्त्र संघर्ष तिथेच थांबला.दरम्यान २५ मे १७६१ ला कुसाबाई प्रसूत होऊन त्यांना मुलगी झाली पण जीजाबाई नी मुद्दाम मुलगा झाल्याचे वृत्त पसरविले.त्यामागे करवीर राज्य जप्त करण्यास पेशव्यांस संधी न देणे व वस्तुस्थिती बाहेर माहित होईपर्यंतच्या काळात लष्करी तयारी करण्यास वेळ मिळावा हे हेतू होते.तसेच तोपर्यंत स्थिती निवळून आपल्या इच्छे प्रमाणे दत्तक घेण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल,अशी पण जिजाबाईना आशा होती.पानिपत संग्रामामुळे मराठ्यांचे अतोनात नुकसान होऊन त्याच्या धक्क्याने नानासाहेब पेशवे २३ जून १७६१ रोजी मृत्यू पावले.त्यांच्या नंतर त्यांचे थोरले चिरंजीव माधवराव पेशवा झाले.
शहाजी भोसले खानवटकरानी दत्तक देण्यास पेशव्यांच्या अनुमतीची अट पेशव्यांचे त्या वेळी मराठेशाहीत असलेले स्थान लक्षात घेऊनच घातली.खानवटकरांचा निरोप मिळाल्यावर जिजाबाईनी अष्टप्रधानमंडलाशी चर्चा केली.गोविंदराव पारसनीसानी सुचविले कि माणकोजिस आपल्याकडील स्त्रियांचा लळा लावून इथे आणावे,त्यानंतर पेशव्यांची संमती घेता येयील.त्यानुसार करवीरहून काही स्त्रिया,दासी खानवट इथे पाठवण्यात आल्या,ठरल्या प्रमाणे त्यांनी माणकोजीस लळा लावला व चार सहा महिन्यांनी करवीर इथे बंदोबस्तात आणले.ह्या कामी बाबुराव कारकुनाचा मोठा सहभाग होता.त्याने बजावलेल्या कामगिरी बद्दल त्यावर मर्जी होऊन त्यास चिरंजीव म्हणू लागले.त्याने पण द्रविड ब्राह्मण असून देखील भोसले आडनाव धारण केले.
अशा प्रकारे जिजाबाई नी दत्तक घेण्याच्या मार्गातील पेशव्यांच्या फौजेचा पराभव आणि आपल्या पसंतीच्या दत्तकाची निवड असे दोन अडथळे दूर केले.माणकोजीस करवीर इथे आणल्या नंतर जिजाबाई नी त्यांना राजघराण्यातील व्यक्तीस आवश्यक असणारे सर्व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली.आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली होती… पेशव्यांची अनुमती मिळविणे.आपल्या मंत्रीमंडळा बरोबर जिजाबाई नी चर्चा केली असता असे मत पडले कि ह्या कामी दस्तुरखुद्द जिजाबाई गेल्या तरच काही उपयोग होईल,पेशवे अन्य कुणाला दाद देणार नाहीत.त्यानुसार जिजाबाई नी वरवर आपण यात्रेस जात असल्याचे जाहीर करून पाच हजाराची फौज,चार महिन्यांची बेगमी,सरदार,मानकरी यांसह अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर ( १७ एप्रिल १७६२ ) तथाकथित यात्रेसाठी प्रयाण केले.जेजुरी मुक्कामी पोहचल्यावर पेशव्यांच्या तेथील कारभाऱ्यानी पुणे इथे तशी खबर पाठवली.खबर मिळताच लगोलग स्वतः माधवराव आणि राघोबा दादा जिजाबाई ना भेटण्यासाठी जेजुरी येथे गेले.उभयतांनी जिजाबाई ना कुठल्या उद्देशाने येणे झाले अशी विचारणा केली.
जिजाबाई नी प्रयोजन सांगितल्यावर माधवराव आणि राघोबा दादा दोघांनी त्यावेळी स्पष्ट केले कि , ‘’ सातारा व पन्हाळा हि दोन राज्ये पृथक नसून वास्तविक एकच आहेत.कौटुंबिक कारणांनी द्वैतभाव होता तो संपला.’’यावर जिजाबाई नी संतापून काका पुतण्यांना सांगितले कि तसे असेल तर राज्य आपले स्वाधीन करून घ्या आणि आमच्या महायात्रेचा बंदोबस्त करून द्या.आपण पुत्रवतच असून आपणास महाराजांनी दिलेले राज्याचे अधिकारी करून घ्यावे.जिजाबाईनचा रुद्रावतार पाहून पेशव्यांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.पानिपत युद्ध,राघोबा दादाची भाऊबंदकी,दक्षिण,उत्तर बाजूला मराठ्यांच्या पानिपत युद्धातील हानीमुळे महाराष्ट्रातील अस्वस्थ झालेले समाज मान,पुन्हा वर डोके काढायला लागलेले राजपूत,रोहिले,हैदर इ.मुळे आधीच माधवराव घेरले गेले होते.ह्यात आणखीन कोल्हापूर प्रकरण चिघळायला नको असा विचार करून नंतर माधवरावांनी जिजाबाईन ची मागणी मान्य केली.स्वारी पुण्यास यावी म्हणजे तेथे आपल्या इच्छे नुसार बंदोबस्त करून देतो अशी माधवरावांनी विनंती केली.तेव्हा जिजाबाई नी तसे पत्र पेशव्यांकडून लिहून घेऊन बेलभंडारा उचलायला लावून शपथ घेतली.स्नेह्भावाची खूण म्हणून माधवरावांच्या हातातील हिऱ्याची अंगठी घेऊन पुण्यास जाण्याचे ठरविले.
आठ दिवस जेजुरीत राहून जिजाबाई पुण्याला आल्या,सोबत माधवराव पण होते.पुण्यास आल्यावर सविस्तर बोलणी करून दत्तकाचे सर्व कागदपत्र पूर्ण करण्यात आले.खानवटकरानी आपला मुलगा जिजाबाईन्स दत्तक द्यावा असे पत्र पण पेशव्यांनी दिले.जिजाबाई व त्यांच्याबरोबर आलेल्या अष्टप्रधान,मानकरी,सरदार मंडळीस मेजवानी देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. खर्चास दोन लाख रुपये आणि दोन लाख किमतीचा पोषाख व जडजवाहीर देऊन सर्व मंडळीस पन्हाळ्यास रवाना केले.पन्हाळ्याला पोहचल्यावर ( २२ सप्टेंबर १७६२ )दत्तक समारंभ मोठ्या थाटाने पार पडला आणि माणकोजी यांचे शिवाजी छत्रपती असे नांव ठेवले.त्यानंतर पाच दिवसांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांना सिंहासनारूढ केले.जिजाबाई नी निजाम,हैदरअली,पेशवे व इतर लहान मोठ्या मंडळीना योग्यतेनुसार मानाची वस्त्रे व आज्ञापत्रे पाठविली.माधवराव पेशव्यांनी पण आपल्या सर्व सरदार,संस्थानिकांना जिजाबाई आणि नवीन छत्रपतींचा योग्य तो मान राखण्याविषयी ताकीदपत्रे पाठविली.
जिजाबाई एवढ्यावरच थांबल्या नाही.त्यांनी पेशव्यांशी वेळोवेळी करार करून कोल्हापूर सीमेवर उपद्रव होणार नाही ह्याची दक्षता घेतली.माधवरावांनी पण जिजाबाईनचा मान कायम राखला.ते ज्या ज्या वेळी कर्नाटक मोहिमेवर जात त्या त्या वेळी जिजाबाईनची न चुकता भेट घेत.एकंदरीत माधवरावांच्या कारकिर्दीत उभय पक्षांचे संबंध चांगले राहिले.अशा प्रकारे प्रारंभी तणावपूर्ण वाटणारे दत्तक प्रकरण आनंदी वातावरणात सिद्धीस गेले.छ.शिवाजी राजांची कारकीर्द एकूण ५० वर्षांची झाली ज्यात खूपच चढ उतार येऊन गेले.कोल्हापूर राज्य व इंग्रज ह्यांच्यात १ ऑक्टोबर १८१२ ला करार होऊन कोल्हापूर राज्याचे सार्वभौमत्व संपले,त्यानंतर सहा महिन्यांनी..२४ एप्रिल १८१३ रोजी छ.शिवाजी महाराज द्वितीय ह्यांचे निधन झाले.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे.)
संदर्भ: करवीर रियासत ले.स.म.गर्गे.
— प्रकाश लोणकर.