महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,714

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे ३

By Discover Maharashtra Views: 1471 10 Min Read

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे ३ –

सवाई माधवराव पेशव्यांचा वारस –

छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा गादी) ह्यांनी आपल्या मृत्यू समयी आपल्या पश्चात राज्याची व्यवस्था कशा प्रकारे चालवावी ह्या संबंधात काही आदेश,सूचना लिखित स्वरुपात लिहून ठेवल्या होत्या ज्या दोन याद्या ` म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यातील एक सूचना अशी होती कि नानासाहेब पेशव्यांच्या घराण्यात पेशवाई वंश परंपरेने कायम राहील.त्यानुसार नानासाहेब पेशव्यांच्या नंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले माधवराव पेशवे झाले.त्यांच्या नंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा बनला.पेशवे (भट) घराण्यातील भाऊबंदकीला सुरुवात इथपासून झाली.नानासाहेबांचा धाकटा बंधू रघुनाथराव उर्फ राघोबा दादाची पेशवा व्हायची इच्छा माधवरावांच्या वेळेपासूनची होती.माधवरावांच्या कारकिर्दीत राघोबा दादांचे पेशवा बनण्याचे स्वप्न करारी माधवरावांमुळे स्वप्नच राहिले.तरी पण दादाने प्रयत्न सोडून दिले नाही.मराठेशाहीच्या इतिहासात पदासाठी स्वकीयांचा खून करण्याची पहिली घटना दादाने नारायणरावाचा भाडोत्री मारेकर्यांकडून खून (ऑगस्ट १७७३) करवून आपल्या नावावर नोंदवली ! (गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे ३ – सवाई माधवराव पेशव्यांचा वारस)

नारायणरावांच्या हत्त्ये नंतर त्यांचा पुत्र सवाई माधवराव ह्यास बारभाई मंडळाने पेशवे पदावर बसवले.

(मे १७७४)नारायणरावांचे ओम्कारेश्वरी क्रियाकर्म झाल्यावर त्रिंबक मामा पेठे,सखाराम बापू बोकील,नाना फडणवीस आणि हरिपंत फडके यांनी बाजूच्या नदीतील वाळूचे शिवलिंग बनवून त्यावर हात ठेवून शपथ घेतली कि, पेशवाई थोरल्या पातीची म्हणजे रघुनाथरावच्या थोरल्या भावाची…नानासाहेबांची.त्यांचाच वंश पुढे चालवायचा,रघुनाथरावच्या वंशास नमस्कार करायचा नाही.

नानासाहेबांचा वंश सवाई माधवरावांच्या मृत्यू (२७ सप्टेंबर १७९५) बरोबर संपला. सवाई माधवरावाची प्रथम पत्नी रमाबाई जानेवारी १७९३ मध्ये प्रदीर्घ आजाराने मृत्यू पावल्या.स.माधवरावांचा दुसरा विवाह विजयदुर्ग येथील गोखले कुटुंबातील यशोदाबाई हिच्या बरोबर झाला.यशोदाबाईस संतती झाली नाही.राघोबा दादा त्यापूर्वी डिसेम्बर १७८३ मध्ये कोपरगाव इथे मृत्यू पावले होते.त्यामुळे त्यावेळी पेशवे घराण्यातील हयात पुरुष मंडळी म्हणजे राघोबा दादांचा दत्तक पुत्र अमृतराव,व त्यानंतर जन्मलेले बाजीराव आणि चिमणाजी अप्पा हि होय.माधवराव दौलतीच्या वाटणीच्या संदर्भात राघोबा दादांशी चर्चेत मीच तुमचा मुलगा आहे,असे बोलून दाखवीत. मुला अभावी दादांचा वाटणी विषयीचा दावा काहीसा कमजोर पडत असल्याने,दादांनी नाशिक येथील गोविंदपंत भुस्कुटे यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलास १९ एप्रिल १७६८ रोजी दत्तक घेऊन त्याचे नाव अमृतराव असे ठेवले.हा दत्तक घेतल्या नंतर राघोबा दादांना १० जानेवारी १७७५ ला बाजीराव व ३० मार्च १७८३ ला चिमणाजी अप्पा असे दोन पुत्रलाभ झाले.बाजीराव आणि चिमणाजी हे औरस पुत्र असल्याने ह्या दोघांच्या जन्माआधी दत्तक घेतलेल्या अमृतराव दत्तक स्पर्धेतून आपोआप बाहेर झाला.उरलेल्या दोघात बाजीराव मोठा होता.हिंदू धर्मातील प्रथा,परंपरा सुद्धा त्याच्या बाजूने होत्या.अशा प्रकारे बाजीरावचा पेशवाई वरील दावा चांगलाच बळकट होता.तरी पण बाजीरावास पेशवेपदी स्थानापन्न होण्यासाठी न भूतो न भविष्यति असे अडथळे पार करावे लागले.

सवाई माधवरावाच्या वारस निवडीमध्ये नाना फडणवीस आणि दौलतराव शिंदे (महादजींचा दत्तक मुलगा) ह्या दोघांना खूप स्वारस्य होते.(Stake holders)नाना आणि दौलतराव ह्या दोघांना आपल्या नियंत्रणात राहणारा पेशवा हवा होता ज्याच्या आडून त्यांना मराठेशाहीच्या कारभारावर आपली पकड ठेवता आली असती.नाना फडणविसांचा बाजीराव पेशवा होण्यास विरोध यासाठी होता कि पेशवा झाल्यावर बाजीराव राघोबा दादांस ज्या कुणी छळले,त्रास दिला असेल त्या सर्वांवर ज्यात मुख्य दस्तुरखुद्द नाना प्रमुख होते,सूड उगवेल.दुसरे कारण असे होते कि सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत त्यांच्या नावावर सावकारांकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज नानांनी काढले होते.त्या प्रीत्यर्थ बऱ्याच जणांना जहागिऱ्या,इनामे,नेमणुका दिल्या होत्या.जर बाजीराव पेशवेपदी आरूढ झाला तर तो हि देणी,सावकारांना दिलेले लाभ आपला त्याच्याशी काही संबंध नाही असे सांगून हात वर करेल.राघोबा दादांची इंग्रजांशी असलेली दोस्ती आणि बाजीरावची राघोबा विरोधकावर सूड उगविण्याची शक्यता ह्या गोष्टींचा हवाला देऊन नानांनी बाजीरावच्या ऐवजी पेशवे घराण्यातीलच दूरच्या नात्यातील एखादा मुलगा आणून सवाई माधवरावांची विधवा पत्नी यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन त्यास पेशवा बनवून पूर्वी प्रमाणे कारभार नानांच्या हातात राहू द्यावा,असा प्रस्ताव शिंदे,होळकर,भोसले आदि सरदार व इतर मुत्सद्द्यांपुढे मांडला.परंतु नानांनी मांडलेल्या ह्या प्रस्तावास कुणाचाही पाठींबा मिळाला नाही.

पेशवे घराण्यात बाजीराव हा औरस वारस उपलब्ध असताना दत्तक आणि तोही बाहेरून आणण्याच्या नानांच्या प्रस्तावास सर्वांनी विरोध केला.नानांचा अडीयलपणा पाहून दौलतराव शिंदेंच्या गोटातील नाना विरोधकांनी राघोबा पुत्र बाजीराव यास पेशवेपदी बसविण्याचे ठरविले.इथून सुरु झाले नाना आणि त्यांच्या विरोधकांचे डाव,प्रतिडाव, शह,काटशह,कारस्थानांचे घमासान.सवाई माधवरावांच्या मृत्यू समयी सर्व राघोबा दादा पुत्र शिवनेरी किल्ल्यावर कैदेत होते.कैदेत असूनही बाजीरावने बाहेर घडत असलेल्या घटनांची माहिती मिळण्याची व्यवस्था केली होती.सवाई माधवराव आणि बाजीराव ह्यांच्यात होत असलेल्या गुप्त पत्रव्यवहाराची खबर नानांस मिळून त्यांनी पकडलेली माणसे,पुरावे स.माधवरावा समोर हजर करून त्याचा जाब स.माधवरावास विचारला होता ज्यामुळे स.माधवरावांचे मानसिक संतुलन शेवटच्या काही दिवसात बिघडले होते.असो.दौलतराव शिंदे आपल्याला पेशवा बनविण्याच्या बाजूने अनुकूल असल्याचे बाजीरावास कळताच त्याने शिंद्यांच्या लष्करात कार्यरत असलेल्या अमृतरावच्या सदाशिव मल्हार ह्या मेव्हण्या मार्फत दौलतराव शिंद्यांशी बोलणी सुरु केली. बाहेरची व्यक्ती दत्तक घेऊन तिला पेशवा बसविण्याचा नानांचा डाव हाणून पाडून आपणास पेशवेपदी बसविण्याकामी दौलतरावानी साह्य केले तर त्या बदल्यात सव्वा कोटी रुपये आणि पंचवीस लाख रुपयांची जहागीर देण्याचा बाजीरावाने करार केला.

दौलतरावाचा जुना कारभारी जिवबादादा बक्षी सहा जानेवारी १७९६ रोजी जामगावी मरण पावला.मरण्यापूर्वी शिंद्यांकडील ह्या अनुभवी व राजकारणातील अनेक चढ उतार पाहिलेल्या कारभाऱ्याने दौलतरावास सांगितले कि, ‘ दत्तकपुत्र घेऊन पेशवाई चालविण्यास नानांनी संमतीपत्र करून घेतले,परंतु या गोष्टीस बहुमत अनुकूल नाही;बाळाजी विश्वनाथाचा अंश हयात असता दत्तक घेणे रास्त नाही,तरी तुम्ही बाजीरावास पदावर बसविण्याची तजवीज करावी.` करारात ठरल्या प्रमाणे घडले असते तर स.माधवरावांच्या काळात नानांची ते गाजवीत असलेली जवळपास निरंकुश,एकहाती सत्ता संपुष्टात आली असती.दौलतराव आणि बाजीराव ह्यांनी इतक्या गुप्ततेने बातचीत चालू ठेवली होती कि त्याचा थांगपत्ता नानांच्या हेराना लागला नाही.हि बातमी निजामाकडून नानांस कळली.नानांनी ताबडतोब बाहेरचा दत्तक आणण्या ऐवजी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजीलाच यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक बसवून सत्ता आपल्या हातात ठेवण्याचे ठरवून त्या प्रमाणे परशुरामभाऊ पटवर्धनांस जुन्नरहून चिमणाजीला घेऊन येण्यास फर्मावले.नानांची हि चाल धर्म,शास्त्र बाह्य होती.चिमणाजी नात्याने यशोदाबाईंचा सासरा लागत होता.सासऱ्याला सुनेस दत्तक देणे पूर्णतया चुकीचे होते,तरी नानांनी शास्त्री,पंडित,मराठे सरदारांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून परशुरामभाऊस जुन्नरला पाठविलेच.बाजीरावने मोठ्या मुलाचा हक्क डावलून धाकट्याला दत्तक मार्गे पेशवाईचा धनी बनविण्याचा नानांचा उद्योग अन्यायकारक व धर्मशास्त्र अमान्य असल्याचे सांगून चिमणाजीस परशुरामभाऊच्या ताब्यात देण्यास नकार दिला.इतक्यात शिंद्यांची फौज जुन्नरकडे निघाल्याची खबर नानांस कळली.

शिंद्यांचा डाव बाजीराव आणि चिमणाजी ह्या दोघांस ताब्यात घेऊन कराराप्रमाणे बाजीरावास पेशवेपदी बसविण्याचा होता.बाजीराव आणि चिमणाजी शिंद्यांच्या हाती पडले तर आपल्या सगळ्याच योजना फिसकटतील असे लक्षात आल्याने नानांनी चिमणाजी यशोदाबाईंस दत्तक देऊन त्याला पेशवा बनविण्याची आपली आधीची योजना बदलली.बाजीरावला पेशवेपदी बसवून त्याला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा दौलतरावाचा प्लान यशस्वी होऊ नये म्हणून नानांनी आधीची बाजीराव विरोधाची भूमिका सोडून बाजीरावास पेशवेपदी बसविण्याचे मान्य करून त्याच्या सर्व अटी मान्य केल्या.त्यानुसार परशुरामभाऊ पटवर्धन बाजीराव आणि चिमणाजीस घेऊन खडकीला तीन मार्च १७९६ ला आले.नानांच्या ह्या चालीमुळे दौलतराव आणि त्यांचा नवीन कारभारी बाळोबा तात्या पागनीस नानांवर खूप संतापले आणि त्यांच्या फौजांनी मोर्चा पुण्याकडे वळवला. परशुरामभाऊनी,आम्ही सर्व सरदार असताना एकटे शिंदे काय करतील?असे सांगून नानांस पुण्यातच राहावे असे सुचविले.ह्यावेळी नानांनी आणखीन एक खेळी खेळून पाहण्याचे ठरविले.

साताऱ्यास जाऊन छत्रपतीना वश करून त्यांच्याकडून दौलतरावास चेकमेट देण्याची खेळी!२१ मार्च रोजी नानांनी साताऱ्याकडे कूच केले.दुसऱ्या दिवशी नानांनी छत्रपतींची भेट घेऊन त्यांना, ‘ आपण खाली उतरावे,फौजबंदी करावी,मी कोट रुपये आधी आपणापाशी ठेवितो आपण सवाई माधवरावाचे पत्नीस दत्तकपुत्र देऊन पेशवाईची वस्त्रे द्यावी,’अशी विनंती केली.पण छत्रपतींनी हि विनंती मान्य केली नाही.नाना छत्रपतींचा निरोप घेऊन खाली शहरात येइपर्यंत बाजीरावने महाराजांची मर्जी संपादन करून त्यांना आपल्या बाजूने केले.

या सर्व शह काटशहातून शिंदे आणि नाना यांच्यातील वैरभाव चांगलाच पेटला.दौलतरावांनी पुण्यात आल्यावर बाजीरावाकडे नानांस कारभारातून ताबडतोब हटविण्याचे आणि त्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी ताबडतोब पंचवीस लाख रुपये देण्याचा तगादा लावला.तिजोरीत फुटकी कवडी पण नसल्याचे व नाना परतल्यावरच पैशांची तोड निघू शकेल,असे बाजीरावाने दौलतरावांस सांगितले.पण दौलतरावाची समजूत काही पटली नाही,उलट बाजीराव नानांस हाताशी धरून आपल्याशी केलेल्या करारातून सुटू पहात आहे अशी दौलतरावांची समज झाली.नाना बाजीरावची संभाव्य युती/खेळी हाणून पाडण्यासाठी दौलतरावने परशुरामभाऊस आपल्या बाजूला वळवून बाजीराव ऐवजी चिमणाजीला पेशवा बनविण्याचा डाव रचला.९ मे १७९६ रोजी बाजीराव सलोख्याची बोलणी करण्यासाठी शिंद्यांच्या छावणीत गेला असता त्याला शिंद्यांनी कैद केले.परशुरामभाऊने जबरदस्तीने चिमणाजीस पुण्याला नेले.२५ मे रोजी यशोदाबाई च्या मांडीवर दत्तक देऊन ३ जूनला त्याला पेशवेपदी बसविले.

नानांनी नाना युक्त्या,क्लूप्त्या योजून चिमणाजीच्या जागी बाजीरावास ५ डिसेम्बर १७९६ ला पेशवा बनविले.पण ह्या सर्व प्रकारात नानांनी अंगिकारलेल्या अनेक प्रकारांमुळे (इंग्रज,निजाम,टिपू सारख्या मराठ्यांच्या शत्रूंस मदतीस बोलवणे,त्यासाठी भरपूर पैशांचा वापर करणे,इ.) त्यांच्या मराठेशाहीचे संरक्षक ह्या प्रतिमेस मोठा धक्का बसला.इतके सारे करून ते बाजीराव पेशवा झाल्यावर जेमतेम तीन एक वर्षे जगले.त्यातील सात महिने त्यांना दौलतराव च्या कैदेत काढावे लागले.त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत निराशा,हताशा आणि उपेक्षेत गेले.सवाई माधवराव सप्टेंबर १७९५ मध्ये मरण पावले.त्यांच्या जागी दुसरा पेशवा..चिमणाजी बसेपर्यंत सात महिने पेशवाईचा धनी शोधण्यात गेले,बाजीराव,दौलतराव,नाना,परशुराम भाऊ सहित अनेक जण एकमेकांचे वैरी झाले,पुण्यात प्रचंड फौजा रिकाम्या राहिल्या.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे ३)

संदर्भ:
१- मराठी रियासत खंड सात आणि आठ.
२-मराठ्यांचा इतिहास.खंड तिसरा.अ.रा.कुलकर्णी आणि ग.ह.खरे.
३-पेशवाई –कौस्तुभ कस्तुरे.
४-मराठ्यांच्या आपसातील लढाया..गोविंद गणेश भागवत,धावडशीकर

प्रकाश लोणकर.

Leave a Comment