गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ४ –
नाना फडणीसांच्या मृत्यू पश्चात 35 वर्षाने झालेले दत्तक विधान.
सवाई माधवरावांच्या जवळपास संपूर्ण कारकिर्दीत मराठेशाहीची सूत्रे नाना फडणीसांच्या हातात केंद्रित झाली होती.(इ.स.1774 ते 1795) स. माधवरावांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे पेशवेपदी आपल्या नियंत्रणात राहणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यावरून नाना विरुद्ध दौलतराव शिंदे विरुद्ध होळकर यांच्यात उद्भवलेल्या संघर्षामुळे मराठेशाही खिळखिळी होऊन त्याचा इंग्रजांना अतोनात फायदा झाला.दौलतराव शिंद्याणी नानांच्या इच्छे विरुद्ध बाजीरावच्या धाकट्या भावास.. चिमणाजीला स. माधवरावांच्या पत्नीस दत्तक देऊन पेशवा बनविले होते.(जून 1796) पण नाना फडणीसानी महाड इथून रचलेल्या कारस्थानामुळे दौलतरावांपूढे बाजीरावला पेशवा नियुक्त करण्याच्या नानांच्या प्रस्तावास मान्यता देण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता.तसेच त्याच्या बदल्यात शिंद्याना भरपूर लाभ देण्याचे आमिष पण नानांनी दाखवले होते.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ४)
महाडहून नाना नोव्हेंबर 1796 मध्ये पुण्यास आले व डिसेंबर 1796 मध्ये बाजीराव पेशवापदी आरुढ झाले.तरी पण सर्वांच्या मनातुन एकमेकां विषयीचा संशय,भीती कधीच गेली नाही. यातून दौलतरावाणि नानास डिसेंबर 1797 मध्ये अटक करून जुलै 1798 मध्ये मुक्तता केली. नानानी पुन्हा कारभार हाती घेतला पण स. माधव रावांच्या मृत्यू नंतर घडलेल्या विविध घडामोडीनमुळे नानांचे मन व्यथित होऊन त्यांचा त्यांचे कारभारात लक्ष लागेनासे होऊन निराश,हताश मनःस्थितीत लवकरच म्हणजे 13 मार्च 1800 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी मृत्यू पावले. नानांचे एकूण 9 विवाह झाले होते. त्यातील सात स्त्रिया नानांच्या हयातीतच मरण पावल्या होत्या. उर्वरित दोघी पैकी एक नानांच्या मृत्यू नंतर 14 व्या दिवशी मरण पावली तर दुसरी जीउबाई त्यावेळी फक्त नऊ वर्षांची होती. नानांच्या नशिबात पुत्र लाभ नव्हता.त्यामुळे त्यांनी डिसेंबर 1794 मध्ये दामोदर बळवंत यास दत्तक घेतले,पण तो लवकरच वारला.त्यानंतर आपल्या अंतिम दिवसात नानानी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडून आणखीन एक दत्तक घेण्याची परवानगी मिनतवारी करून मिळवली पण त्यावेळच्या अस्थिर,अगम्य राजकीय वातावरणात दत्तक घेणे शक्य झाले नाही.त्यामुळे नानांच्या मृत्यू समयी त्यांना एकच वारस होता—त्यांची नऊ वर्षे वयाची पत्नी—जीउबाई.
नानाच्या मृत्यूसमयी दोन्ही स्त्रिया सिद्धटेक इथे यात्रे निमित्ताने होत्या. त्या चार दिवसानी पुण्यात आल्या. नानांकडे अफाट धन दौलत असल्याचे त्याकाळी बोलले जात असे. त्यांनी आपले धन देशभरातल्या विविध सावकारांकडे तसेच मुख्य खजिना लोहगडावर ठेवला होता. नवकोट नारायण म्हटल्या जाणाऱ्या नानांचा मृतदेह घराबाहेर आणताना त्यांच्या अरब शिपायानी थकीत पगार चुकता केल्याशिवाय पार्थिव बाहेर काढू देणार नाही असे बजावले. तेव्हा बाजीराव पेशव्यानि नानांच्या वाड्यावर तोफा डागुन अरब शिपायाना बाहेर पडण्यास मजबूर केले. नानांचा दुर्लभ शेठ म्हणून एक सावकार मित्र होता. त्याने अरब शिपायांच्या पगाराची थकबाकी चुकती केली.
नानांच्या संपत्तीवर दौलतराव तसेच दूसरा बाजीराव यांचा डोळा होता. दोघेही त्यावेळी खूप आर्थिक विवंचनेत होते. नानांकडून पैसा काढण्यासाठीच त्यांना दौलतराव शिंद्याणी अटक केली होती पण नानानी आपल्या संपत्तीचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.बाजीराव पेशव्यानि नानांचे वाडे,इनाम गावे,जाहागिरी जप्त करून जिउबाईस शनिवारवाड्यात नेऊन ठेवले.हे झाल्यावर दौलतराव शिंद्यानी पेशव्यास कळविले की नानांकडे त्यांचे एक कोटी रुपये घेणे असून ते फिटेपर्यंत नानांचे कुटुंब आणि मालमत्ता शिंद्यांच्या ताब्यात देऊन जिउबाईस दत्तक देऊन त्याच्या कडून फडणीशीचा कारभार करून घ्यावा. शिंद्यांची चाल पेशव्याच्या लक्षात येऊन त्याने दौलतरावांस सांगितले की महादजीनच्या विधवा स्त्रिया आणि दौलतरावांच्या सावत्र माता पण दूसरा दत्तक ( दौलतराव शिवाय )घेण्याची परवानगी पेशव्याकडे मागत आहेत जी आपण देऊ इच्छितो. पेशव्याचा जवाब ऐकून दौलतरावचे डोके चालेना. त्यानी बाजीराव पेशव्यांस नाना समर्थक बाबा फडके,नारोपंत चक्रदेव,बाबुराव वैद्य,आबा शेलूकर इत्यादीना दत्तक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यास सांगितले आणि आल्यावर कैद करून नाना यातना देऊन नानांच्या संपत्तीची माहिती काढण्याचा प्रयास केला.
नानांचा मुख्य खजिना लोहगडावर होता.तिथे त्यांचा अत्यंत विश्वासू धोंडो बलळाल निजसुरे नावाचा किल्लेदार होता. जिउबाईस बाजीराव पेशव्यानि अटक करून शनिवार वाड्यात ठेवल्याचे त्याला कळताच त्याने बंड पुकारले.पुढे 1802 मध्ये यशवंतराव होळकरांनी पुण्यावर चाल केली तेव्हा बाजीराव पेशवे वसईस इंग्रजांच्या आश्रयाला गेले. यशवंतरावानी जिउबाईस शनिवार वाड्यातून काढून लोहगडावर धोंडोपंतच्या हवाली केले.ती तिथे दोन एक वर्षे होती.इंग्रजांच्या मदतीने पेशवाई पुन्हा मिळाल्या नंतर बाजीराव पेशव्यानि जिउबाई आणि लोहगड आपल्या ताब्यात देण्याचा तगादा जनरल आर्थर वेलसलीकडे सुरू केला.नाना समर्थकानी पण इंग्रजांकडे जिउबाई ची बाजू लावून धरली.इंग्रज आणि नानांचा वफादार किल्लेदार धोंडोपंत निजसुरे ह्यांच्यात मार्च 1804 मध्ये करार झाला ज्यानुसार धोंडोपंताने इंग्रजांच्या अधीन राहण्याचे कबूल केले.
लोहगड बाजीरावास दिला गेला,जीउबाईला इंग्रजांकडून वार्षिक बारा हजार रुपये तनखा मुक्रर झाला व तिने आपल्या नातेवाईकांसह इंग्रजांच्या आश्रयाखाली हवे तिथे राहावे असे ठरले. बाजीराव पेशव्यानि सुद्धा बाई पुण्यात आपल्या मालकीच्या वाड्यात राहण्यास आली तर वार्षिक पंचवीस हजार रुपये तनखा तसेच नानांची सर्व मालमत्ता देण्याचे आश्वासन दिले पण बाईंनी इंग्रजांच्या अधीन राहणे मंजूर केले.बाजीरावची ब्रहमावर्त इथे रवानगी झाल्यावर (फेब्रुवारी 1819) एल्फिन्स्टन ने जिउबाईस जी पनवेल मध्ये राहत होती,पुण्याला बोलावून मेणवली च्या वाड्यावरील जप्ती उठवून वाडा तिच्या हवाली केला.ती पुढे मेणवली च्या वाड्यात जाऊन राहिली. जिउबाईस वार्षिक बारा हजारची पेन्शन,मेणवली गाव,निजामाने नाना गेल्यावर दिलेली पाच हजार उत्पन्नाची जहागीर,तसेच पुण्यातील बेलबागेच्या खर्चा प्रीत्यर्थ मिळत असलेली पाच हजारांची नेमणूक इतकी संपत्ति होती. नानांकडे असलेल्या संपत्तीचा बराचसा भाग त्यांनी सवाई माधवरावांच्या वारशासाठी खेळलेल्या राजकारणात खर्च झाला होता.इतरत्र ठेवलेली संपत्ति ज्या कुणाकडे ठेवण्यास दिली होती त्यांनी गडप केली.जिउबाईस वा पस्तीस वर्षानी घेतलेल्या दत्तक यापैकी कुणास ही नानांच्या अफाट संपत्ति मधील अंश पण मिळाला नाही.एवढा मोठा खजिना कोठे व कसा गायब झाला हे अद्याप पर्यन्त गूढच राहिले आहे.
मिळत असलेले उत्पन्न ताब्यात असलेली संपत्ति वंशपरंपरेने चालू ,हस्तांतरित होत राहण्याच्या उद्देशाने जिउबाईने मिरजेच्या थोरल्या पातीतील बाळासाहेब मिरजकरांचा नातू ( मुलीचा मुलगा ) गंगाधरपंत यास दत्तक घेऊन त्याचे महादजीपंत रावसाहेब असे नाव ठेवले.हे दत्तक विधान 1827 मध्ये झाल्याचे वासुदेवशास्त्री खरे म्हणतात तर नानांच्या वंशजाच्या म्हणण्यांनुसार ते 1835 मध्ये झाले.नानांचा मृत्यू इ. स.1800 मध्ये झाला. त्या नंतर जवळपास 54 वर्षानी जिउबाईचे मार्च 1854 मध्ये निधन झाले.
पेशव्यांचे ( भट ) आणि फडणीसांचे ( भानू ) पूर्वज एकाच वेळी कोंकणातून देशावर नशीब काढण्यासाठी आले होते. दोन्ही घराण्यानी मराठेशाहीसाठी दिलेले योगदान नक्कीच प्रशंसनीय व प्रेरक राहिले आहे.योगायोगाची गोष्ट म्हणजे दोन्ही घराण्यांच्या शेवटा बरोबरच मराठेशाहीचा पण शेवट घडून आला.
संदर्भ:1-मराठी रियासत खंड 8… गो. स. सरदेसाई.
2-नाना फडनविस ,हिन्दी चरित्र-ले. श्रीनिवास बालाजी हरडिकर.
3-मराठ्यांचा इतिहास. खंड तिसरा. संपादक अ. रा . कुलकर्णी आणि ग. ह. खरे.
4-पेशव्यांची बखर संपादक काशीनाथ नारायण साने.
– प्रकाश लोणकर