महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,25,131

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ६

By Discover Maharashtra Views: 2554 9 Min Read

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ६ | गंगाधरराव नेवाळकर –

बुंदेलखंड नरेश छत्रसालने महंमद बंगशचा पराभव करून त्याला बुंदेलखंडातून हाकलून लावल्याबद्दल थोरल्या बाजीरावाना कृतद्णे पोटी आपल्या राज्याचा एक तृतीयांश उत्पन्नाचा भाग बक्षीस दिला होता.यातील वीस लाख रुपये उत्पन्नाचा मुलुख म्हणजेच झाशी संस्थान होय. इ. स.1756 साली तेथील पूर्वीच्या गोसावी राजाने बंड करून पेशव्यांच्या सुभेदारास पळवून लावले. पुणे इथे ही बातमी पोहचल्यावर तेथून पाठविण्यात आलेल्या रघुनाथ हरी नेवाळकर नावाच्या शूर सरदाराने मोठ्या हिमतीने गोसाव्यानचे बंड मोडून पुन्हा मराठ्यांचा अंमल बसविला.त्यांच्या या कामगिरीबद्दल झाशी संस्थानची सुभेदारी कायम,वंशपरंपरेने नेवाळकर घराण्यात देण्यात आली.हे रघुनाथ द्वितीय म्हणून ओळखले जातात.ह्यांच्या मूळ  पुरुषाचे–आजोबांचे नाव पण रघुनाथराव असेच होते.ते रघुनाथराव प्रथम म्हणून ओळखले जातात.त्यांनी सुमारे चाळीस वर्षे झाशीचा कारभार उत्तम प्रकारे चालवून मराठ्यांचा धाक,दबदबा बुंदेलखंडात कायम ठेवला.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ६)

वृद्धापकाळ झाल्यावर दुसऱ्या रघुनाथरावांनी झाशी  संस्थानचा कारभार आपले धाकटे बंधु शिवराव यांच्याकडे सोपवला. (1796)शिवरावभाऊ पण वडील बंधु प्रमाणेच शूर,प्रजाहितदक्ष होते.सवाई माधवरावांच्या मृत्यू नंतर पुणे दरबारात माजलेली अनागोंदी व इंग्रजांचा वाढता प्रभाव लक्षात  घेऊन अन्य ठिकाणच्या सुभेदारां प्रमाणे शिवराव भाउनी पण पेशव्यांचे वर्चस्व झुगारून इंग्रजांशी हातमिळवणी केली. दोघांच्यात 6 फेब्रुवारी 1804 रोजी मैत्री करार झाला. त्यानुसार त्यांनी संकट प्रसंगी एकमेकाना मदत करावी,इंग्रजांच्या अनुमति शिवाय कुठल्याही गैर हिंदुस्तानी व्यक्तिना कामावर ठेवू नये तसेच चालत आल्याप्रमाणे पेशव्याना खंडणी देत जावी असे ठरले. शिवराव भाउनी पण बंधु रघुनाथराव (द्वितीय) यांच्या प्रमाणेच उत्तम कारभार करून कीर्ती,नावलौकिक प्राप्त केला. शिवराव भाउना कृष्णराव,रघुनाथराव (तृतीय) आणि गंगाधरराव अशी तीन मुले होती.त्यातील ज्येष्ठ पुत्र कृष्णराव त्यांच्या हयातीतच इ. स.1811 मध्ये मरण पावला होता.

शिवराव भाउना असाध्य रोग झाल्याने त्यांनी आपला नातू रामचंद्रराव (ज्येष्ठ पुत्र कृष्णराव याचा मुलगा )याच्याकडे कारभार (इ. स.1814)सोपवून श्रीक्षेत्र ब्रहमावर्त इथे रामनामाचा जप करत गंगेत देहत्याग केला.13 जून1817 रोजी बाजीराव रघुनाथ पेशवा आणि इंग्रज यांच्यात पुणे मुक्कामी करार झाला ज्या अन्वये सागर,झाशी,यांसह बुंदेलखंड व माळव्यातील सर्व प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानुसार इकडे इंग्रज आणि झाशी सुभेदार रामचंद्रराव यांच्यात पण 17 नोवेमबर 1817 ला दहा कलमी करार झाला.झाशीचा कारभार वंश परंपरेने रामचंद्रराव यांच्याकडे चालणे व त्यांनी इंग्रजांशी एकनिष्ठ राहणे ह्या त्यातील प्रमुख बाबी होत्या. रामचंद्रराव आणि इंग्रजांचे संबंध इतके स्नेहपूर्ण,सलोख्याचे राहिले की तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटींकने 19 डिसेंबर 1832 ला झाशी इथे मोठा दरबार भरवून रामचंद्ररावना `महाराजाधिराज` व `फिदवी बादशाह इंग्लिसतान`किताब देऊन गौरव केला. रामचंद्रराव आजारी पडून इ. स.1835 मध्ये निपुत्रिक मरण पावले.त्यांच्या पत्नीने रामचंद्ररावच्या बहिणीच्या मुलास दत्तक घेतले पण त्यावरून दरबारात दुफळी माजुन प्रकरण इंग्रजांकडे गेले.इंग्रजानी निवाडा दिला की शिवराव यांचा द्वितीय औरस पुत्र  आणि मयत रामचंद्र राव याचा चुलता रघुनाथराव तृतीय हाच खरा वारस आहे. म्हणून त्यांची झाशीच्या गादीवर नियुक्ती करण्यात आली.यांचा कारभार ठीक न राहिल्याने इंग्रजानी त्यांना हटवून 1837 मध्ये संस्थानचा कारभार आपल्या हाती घेतला. रघुनाथराव तृतीय एप्रिल 1838 मध्ये मृत्यू पावले.

ह्यावेळी संस्थानवर हक्क सांगणाऱ्या चार व्यक्ति पुढे आल्या.इंग्रजानी यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली. समितीने निकाल दिल की शिवराव यांचे तृतीय पुत्र गंगाधरराव हे सरळ वारस आहेत.त्यानुसार 27 डिसेंबर 1842 रोजी गंगाधरराव झाशीचे संस्थानधिपति झाले.वाई निवासी मोरोपंत तांबे द्वितीय बाजीराव यांचे बंधु चिमणजी अप्पा यांच्याबरोबर महाराष्ट्रातून काशी इथे गेलेल्या लवाजम्यात होते.त्यांची कन्या मनू हिज बरोबर गंगाधररावांचा द्वितीय विवाह झाला.मनू म्हणजे प्रख्यात वीरांगना राणी लक्ष्मीबाई होय.

गंगाधररावानी झाशी संस्थानची व्यवस्था अतिशय उत्तम ठेवली होती. संपत्ति,लष्कर,बंदोबस्त,धार्मिक रूढी,परंपरांचे पालन,आदीमुळे ते बुंदेलखंडात अतिशय लोकप्रिय राज्यकर्ते म्हणून प्रसिद्ध झाले होते.इ.स.1851 मध्ये राणी लक्ष्मीबाई यांस पुत्र लाभ झाला परंतु ह्या बालकास अवघ्या तीन महिन्यांचे आयुष्य लाभले. पुत्रवियोगाच्या दुःखाने गंगाधररावांची तब्बेत दिवसेंदिवस बिघडू लागली. इ. स.1853 च्या नोवेमबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात तब्बेत चिंताजनक झाली.त्यावेळी गंगाधररावानी आपल्याच घराण्यातील वासुदेवराव नेवाळकर यांचा पाच वर्षे वयाचा मुलगा आनंदराव यास 20 नोवेंबर 1853 रोजी हिंदू धर्मशास्त्रा नुसार दत्तक घेतले. ह्या प्रसंगी इंग्रज अधिकारी पण उपस्थित होते. दत्तक विधाना नंतर आनंदराव यांचे दामोदरराव गंगाधरराव असे नामांतर झाले.दत्तकविधानाचा कार्यक्रम झाल्यावर गंगाधररावानी इंग्रज अधिकाऱ्याना उभयतानच्या सौहार्दपूर्ण संबंधांची आठवण देऊन आपण घेतलेल्या दत्तकास मान्यता देण्याची विनंती केली.दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोवेमबरला राणी लक्ष्मीबाईंवर आकाशच कोसळले.माध्यान्ह समयी गंगाधररावांचे निधन झाले..

द्वितीय बाजीराव पेशव्यानी ज्या इंग्रज सेनानीपूढे आत्मसमर्पण केले होते तो मेजर मालकम ह्या वेळी ग्वाल्हेर,बुंडेलखंड आणि रेवा संस्थानांचा पोलिटिकल एजंट होता.त्याने 25 नोवेमबरला हिंदुस्थान सरकारच्या फॉरेन सेक्रेटरीला गंगाधरराव यांचे निधन आणि त्यांनी घेतलेल्या दत्तकासंबंधी सविस्तर माहिती कळवली.मेजर मालकमने असा सुर लावला की झाशी संस्थानास दत्तक घेण्याचा काहीही कायदेशीर हक्क नाही.त्याचे असे म्हणणे होते की,इ.स. 1804 मध्ये आम्ही शिवराव भाऊ बरोबर केलेला करार ते पेशव्यांचे मांडलीक ह्या नात्याने केला होता. इ. स.1817 साली पेशव्यानि झाशी संस्थानवरील सर्व हक्क इंग्रजाना दिले होते. त्यावेळी शिवराव भाऊंचे नातू रामचंद्रराव ह्यांना इंग्रजानी झाशी संस्थानचा वारस म्हणून मान्यता दिली होती.रामचंद्रराव इ. स.1835 मध्ये निपुत्रिक मरण पावले.त्यांच्या जागी त्यांचे चुलते रघुनाथराव तृतीय यांना वारस नेमले.त्यांचे 1838 मध्ये निधन झाल्यावर त्यांचे धाकटे बंधु गंगाधरराव यांना झाशी संस्थानधिपति म्हणून मान्यता दिली.. आता गंगाधरराव मृत्यू पावले आणि त्यांना कुणी वारस नसल्याने आता त्यांच्या वंशाचा शेवट झाला आहे. मालकम ने गंगाधरराव यांनी ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊनच यापूर्वी कधीही,कुठेही चर्चिला न गेलेल्या दत्तकाचा बूट काढला असावा असा अंदाज व्यक्त केला. मालकम ने दत्तकविधान नामंजूर करून राणी लक्ष्मीबाई यांस राजेशाही थाटात उर्वरित आयुष्य काढता येईल इतपत निवृत्ती वेतन द्यावे अशी पण शिफारस केली

मेजर मालकमने आपला अहवाल तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी ह्यास कलकत्ता इथे पाठविला. डलहौसीची भारतात 1848 मध्ये नेमणूक झाली होती.त्याने आल्यावर सातारा,नागपूर आणि तंजावूर ही तीन मोठी मराठी संस्थाने दत्तक नामंजूर करून खालसा केली होती.त्यामुळे झाशी संस्थानचे काय होणार हे स्पष्ट होते.मालकमने अहवाल पाठविला त्यावेळी डलहौसी अयोध्या बाजूस दौऱ्यावर गेला होता.त्यामुळे मालकमच्या अहवालावर सहा महीने कुठलीच कारवाई झाली नाही. आपल्या वंशजानचे व इंग्रजांचे संबंध अतिशय सलोख्याचे असल्याने इंग्रज आपण घेतलेल्या दत्तक पुत्रास मान्यता देतील अशी भाबडी आशा मनी बाळगून लक्ष्मी बाईनी पण डलहौसीला इत्यंभूत पत्र लिहिले ज्यात इंग्रजानी झाशीच्या आसपासच्या काही जहागीरदार,सुभेदाराना मंजूरी दिलेल्या दत्तक प्रकरणांचा दाखला दिला होता.लॉर्ड डलहौसी 1854 च्या फेब्रुवारी महिन्यात अयोध्येहून कलकत्ता इथे परतला.आल्यावर त्याने झाशी दत्तक प्रकरण हाती घेऊन सोळा मुद्यांची टिप्पणी तयार करून राणी लक्ष्मी बाईंचे बहुतेक मुद्दे खोडून काढून पेशव्यांच्या जे आता इंग्रजांचे मांडलीक झाले आहेत,मांडलीकाना दत्तक घेण्याचा अनुस्यूत (implied right) अधिकार नाही असे स्पष्ट केले. वंश समाप्ती झाल्यावर दत्तक पुत्रास मान्यता देण्यास सरकार बांधील नसल्याचे डलहौसीने स्पष्ट केले. 27 फेब्रुवारी 1854 रोजी डलहौसी ने गंगाधररावानी घेतलेला दत्तक नामंजूर करून झाशी संस्थान खालसा केल्याच्या आदेशावर सही केली.

मेजर मालकम ने त्यानुसार 13 मार्च 1854 ला जाहीरनामा काढला. ह्यात राणी लक्ष्मीबाईना दरमहा पाच हजाराची तहहयात पेन्शन, झाशी येथील राजवाडा, संस्थानचे सर्व जवाहिर व खासगी शिल्लक यांचा जमाखर्च करून नक्त ऐवज त्यांच्या सुपूर्द करणे, त्यांच्या हयातीत त्यांच्यावर वा त्यांच्या नोकर माणसांवर इंग्रजी कोर्टानी कारवाई करण्यास मनाई, वगैरे तरतुदींचा समावेश होता. संस्थान ताब्यात येताच इंग्रजानी संस्थानच्या फौजेस पगार,बक्षीस देऊन कायमची सुट्टी दिली. झाशीच्या खजिन्यातील सहा लक्ष रुपये दामोदरराव वयात येई पर्यन्त इंग्रजी खजिन्यात ठेवण्यात आले. राजघराण्यातील सर्व मंडळी किल्ल्यातून खाली राजवाड्यात आली व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. डलहौसीच्या निर्णयावर राणी लक्ष्मीबाईनी इंग्लंड मध्ये आपल्या दोघा वकिलांना आपली बाजू मांडण्यास पाठविले. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 2 ऑगस्ट 1854 रोजी राणी लक्ष्मीबाईंचे अपील फेटाळून लावले आणि लॉर्ड डलहौसीचा निर्णय कायम ठेवला. अशा प्रकारे जवळ जवळ एक शतक अस्तित्वात राहीलेले झाशी संस्थान इंग्रजी राज्यात विलीन झाले.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ६)

संदर्भ:रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस लिखित झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मी बाई साहेब ह्यांचे चरित्र.

प्रकाश लोणकर

Leave a Comment