गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ७ –
होळकरशाहीच्या अंतिम पर्वातील दत्तक प्रकरणे –
अहिल्याराणींचे 13 ऑगस्ट 1795 ला देहावसान झाले आणि होळकरशाहीचा संपूर्ण कारभार ( मुलकी व लष्करी ) तुकोजीराव होळकरांकडे आला.त्यांना काशीराव आणि मल्हारराव हे दोन औरस व विठोजी आणि यशवंतराव हे दोन दासीपुत्र होते.तुकोजींच्या दोन्ही औरस मुलांत सख्य नसून ते नेहमी आपापसात लढत असत.मल्हाररावपुढे तर अहिल्याराणी,नाना फडणीस सहित बऱ्याच मुत्सद्द्यानी हात टेकले होते.मल्हारराव दोघा भावात धाकटा असूनही होळकरशाहीचा वारस होण्याची महत्वाकांक्षा बाळगून होता.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ७)
पुणे दरबारात नाना फडणीसांचा कल मल्हारावच्या बाजूने होता तर दौलतराव शिंदे व बाजीराव रघुनाथ पेशवा यांचा कल काशीरावच्या बाजूने होता.तुकोजीराव यांचे पुण्यात15 ऑगस्ट 1797 रोजी निधन झाले.पण तत्पूर्वी म्हणजे 20 सप्टेंबर 1795 रोजी त्यांनी आपल्या थोरल्या मुलास म्हणजे काशीरावास सुभेदारीची वस्त्रे देऊन गादीवर बसवावे असे आपला कारभारी पळशिकर यांच्या मार्फत पुणे दरबारास पत्राने कळविले होते.त्यामुळे पुण्याहून तुकोजीरावांच्या मृत्यू पूर्वीच 29 जानेवारी 1797 रोजी काशीरावास सुभेदारीची वस्त्रे पाठविण्यात आली.तुकोजींच्या मृत्यू नंतर दोन्ही औरस पुत्रातील अंतर्गत कलहाने उघड आणि उग्र स्वरूप धारण केले. ह्याच वेळी पुण्यात पण दौलतराव शिंदे आणि नाना फडणीस यांच्यातील पेशवाईच्या वारसाचा वाद चिघळून मराठेशाहीची एकूणच वाटचाल बेबंदशाहीच्या मार्गाने होऊ लागली होती.
मल्हारराव पुण्यात चर्चेसाठी आला असताना एके दिवशी..14 सप्टेंबर 1797 ला.. रात्री त्यांच्या गोटावर दौलतराव शिंद्याणी अचानक हल्ला करून मल्हाररावांस ठार केले व त्यांचा मुलगा खंडेराव यांस कैद केले.ह्या धामधुमीत तुकोजींचे दोन्ही दासीपुत्र निसटण्यात यशस्वी झाले.यशवंतरावानी नागपूरकर भोसल्यांकडे आश्रय घेतला पण त्यांनी दौलतरावांच्या सांगण्यावरून यशवंतरावांस कैदेत ठेवले. कैदेत अठरा महीने राहून यशवंतरावानी युक्तीने तिथून आपली सुटका करून घेतली.यथावकाश शिंदे,पेशव्यांच्या मुलूखात छापे घालून त्यांनी बऱ्यापैकी पैसा जमवून त्यातून फौज उभारावयास सुरुवात केली.यशवंतरावांचा धाकटा भाऊ विठोजी जो मागे यशवंतरावांबरोबर पळून गेला होता,पुन्हा एकदा पेशव्यांच्या हाती सापडला.त्यास हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारण्यात आले.
नाना फडणीसांच्या मृत्यू नंतर यशवंतरावांचा बंदोबस्त करणे दौलतराव शिंदयांस आवश्यक वाटू लागले कारण यशवंतराव शिंद्यांच्या मुलूखात छापेमारी,लूट करत असे.तसेच विठोजीच्या हत्तेचा सूड उगविण्याची प्रबळ इछा मनात बाळगून होते.बाजीराव रघुनाथ पेशव्यानी दौलतरावांच्या सांगण्यावरून विठोजीस हत्तीच्या पायी दिले अशी त्यावेळी जनभावना होती.दौलतराव आणि यशवंतराव यांच्या फौजात तीन एक वेळा लढाया होऊन कधी शिंदे तर कधी होळकर जिंकत,पराजित होत गेले.शेवटी दोघात तह होऊन युद्धविराम झाला पण दोघांच्या मनातील किलमीष,संशय कायम राहिले.
नंतर यशवंतरावानी आपल्या प्रमुख सरदाराना दक्षिणेकडे रवाना केले.होळकर फौजेने चांदवड जवळ पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला.तिथे काही दिवस राहून तिथली व्यवस्था लावून यशवंतराव 22 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्याकडे कूच करते झाले.25 ऑक्टोबर 1802 ला हडपसर इथे होळकर सैन्याने शिंदे पेशव्यांच्या संयुक्त सेनेचा पराभव केला.यशवंतरावानी बाजीरावास नम्रतपूर्वक पत्र लिहून इंग्रजां विरुद्ध सगळ्यांची एकजूट करण्याचे आवाहन केले होते. पण बाजीराव रघुनाथ पेशवे घाबरून वसई इथे इंग्रजांच्या आसऱ्यास जाऊन इंग्रजांबरोबर कुप्रसिद्ध वसईचा तह करते झाले.ह्या तहाने मराठेशाहीचे सार्वभौमत्व संपले. बाजीराव इंग्रजांकडे असताना त्यांचा भाऊ-राघोबा दादांचा दत्तक पुत्र– अमृतराव ह्यास यशवंतरावानी पेशवा म्हणून बसविले. बाजीराव रघुनाथ व इंग्रज ह्याच्यातील वसईचा तह शिंदे व नागपूरकर भोसल्यानी पण अमान्य केला होता.या प्रसंगी यशवंतरावानी सर्वानी मिळून इंग्रजांचा प्रतिकार करण्याची योजना सादर केली होती पण भोसले,शिंदे यापैकी कुणीही त्यात स्वारस्य दाखवले नाही.शेवटी यथावकाश इंग्रजानी ह्या दोघांचा पराभव करून त्यांना आपले अंकित करून यशवंतरावणा एकाकी पाडले. तरी सुद्धा यशवंतरावानी एकट्याच्या बळावर इंग्रजांशी संघर्ष चालूच ठेवला.
हिंदुस्थानातील कुणाही सत्ताधीशाने त्यांना कुठलीच मदत,साह्य न पुरविल्याने त्यांचा इंग्रज सेनेपूढे जास्त काळ टिकाव लागला नाही. इंग्रज व यशवंतराव यांच्यातील संघर्ष दोन्ही पक्षात इ. स.1805 मध्ये तह होऊन काही काळ थांबला.त्यानुसार इंग्रजानी जिंकलेला भाग होळकराना परत मिळाला,यशवंतरावानी फौज कमी करण्यास मान्यता दिली.इंग्रजांशी तह केल्यामुळे निर्माण झालेल्या शांततेचा उपयोग त्यांनी संस्थानची बिघडलेली घडी बसविण्याकामी चांगल्या प्रकारे केला.प्रत्यक्ष सत्ता हातात असूनही यशवंतरावांच्या मनात भीती असायची की शेवटी आपले स्थान दासीपुत्राचेच आहे,आपल्या ताब्यातील आपला भाऊ काशीराव व मल्हाररावांचा मुलगा खंडेराव हे दोघे होळकर खरे औरस वारस आहेत.ते स्वतः वा अन्य कोणी त्यांना हाताशी धरून आपला घात करतील ह्या भीतीपाई यशवंतरावानी इ. स.1806 मध्ये बंधु काशीराव व पुतण्या खंडेराव यांचे खून करविले.ह्यामुळे यशवंतरावांच्या भरभराट,उत्कर्षास कारणीभूत असलेल्या रोहिला अफगाण अमिरखान याचे त्यांच्या बरोबरचे मित्रत्वाचे संबंध बिघडून अमिरखान त्यांना सोडून जाऊन इंग्रजाना मिळाला.
इंग्रजांशी कराव्या लागलेल्या तहामुळे यशवंतरावांची मन:शांती बिघडली,त्यांनी इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी पुन्हा सैन्य,युद्ध सामुग्री गोळा करणे सुरू केले.ह्या उद्योगात त्यांनी स्वतःला इतके झोकून दिले की शेवटी त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडुन,त्यांना एका खोलीत कोंडून ठेवावे लागले! तीन वर्षे अशाच अवस्थेत राहून 20 ऑक्टोबर 1811 रोजी त्यांचे निधन झाले.यशवंतरावांस कोंडून ठेवल्यानंतर कारभारी लोकानी त्यांची एक तुळजाबाई नावाची रक्षा होती तिच्या नावाने कारभार चालवला.तिने मल्हारराव नावाचा एक मुलगा दत्तक पण घेतला होता.तुळजाबाई इंग्रजानुकूल होती.राज्यातील अंदाधुंदी,पैशांची तंगी,सरदारांची पुंडाइ इंग्रजांची मदत घेऊन दूर करावी अशा विचाराची ती होती.तर दुसरीकडे बाजीराव रघुनाथ पेशव्यानि कारभारी लोकाना वश करून इंग्रजांशी युद्धाचा डाव रचला.त्यामुळे इंग्रज धार्जिणे आणि बाजीराव धार्जिणे अशा दोन परस्पर विरोधी हितसंबंधांच्या गटात होळकर दरबारी वाटले गेले.
बाजीरावधार्जिण्या गटातील पठाण लोकानी डिसेंबर 1817 मध्ये तुळजाबाईला क्षिप्रा नदीमध्ये लोटून देऊन ठार मारले.ही बातमी इंग्रजाना कळल्यावर त्यांनी लगेच बंडखोरांवर सैन्य पाठविले.ज्यात अर्थातच इंग्रजांचा विजय झाला.तुळजाबाई ने दत्तक घेतलेला मल्हारराव इ. स.1833 मध्ये मरण पावला.त्याला पुत्र नसल्याने त्याच्या पत्नीने मार्तंडराव नावाचा तीन वर्षांचा मुलगा दत्तक घेऊन कारभार पाहण्यास व सुरुवात केली.दरम्यान तुकोजी होळकरांचा एक हरीराव नावाचा एक पुतण्या ससैन्य अवतीर्ण होऊन त्याने होळकरांच्या गादीवर दावा केला.हरीराव आणि मार्तंडराव यांच्यात झालेल्या लढाईत हरीराव विजयी होऊन इंग्रजांच्या मदतीने होळकरांच्या गादीवर स्थानापन्न झाले.हरीराव इ.स.1843 मध्ये निवर्तले.त्यांना पण पुत्र नसल्याने तुकोजीराव ह्या अल्पवयीन मुलास दत्तक घेऊन तो वयात येई पर्यन्त राज्यकारभार कारभारी मंडळीनी पाहिला.1857 च्या इंग्रज विरोधी उठावात तुकोजी महाराज ग्वाल्हेरकर शिंद्यान प्रमाणे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.तुकोजी महाराज प्रगतिशील विचारसरणीचे असून त्यांच्या काळात राज्यात खूप सुधारणा झाल्या. महाराजाना एकोणीस तोफांच्या सलामीचा मान इंग्रजांकडून मिळत होता.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे भाग ७)
संदर्भ:
1-मराठी रियासत खंड सात . गो.स.सरदेसाई.
2-मराठ्यांचा इतिहास खंड तिसरा.संपादक अ. रा.कुलकर्णी आणि ग.ह.खरे.
3 हिंदुस्थान कथारस ले. विनायक कोंडदेव ओक.
4-ब्रिटिश रियासत खंड दोन.गो.स.सरदेसाई.
Prakash Lonkar