मजेशीर पत्र | ऐतिहासिक लेख संग्रह –
ऐतिहासिक लेख संग्रह यामध्ये एक फार मजेशीर पत्र आहे.गोपाळराव गोविंद पटवर्धन यास नानासाहेब पेशव्याने लिहलेल्या पत्रात स्वराज्याच्या दिलेल्या कामात दिरंगाई केल्याबद्दल जे जे शब्द वापरलेले आहेत ते वाचून एखादी मोहीम दिल्यावर त्यात दिरंगाई होत असेल तर मोजक्या शब्दात समजावून सांगायची पद्धत कशी असते याचाच प्रत्यय येतो.
हा प्रसंग आहे उदगीर मोहिमे नंतरचा. या तहानुसार दौलताबाद किल्ला मराठा राज्यात सामील होणार होता.परंतु दौलताबाद चा किल्लेदार किल्ला देत नव्हता. या मोहिमेसाठी नानासाहेब पेशव्याने गोपाळराव पटवर्धन यांची नेमणूक केली.पण तिथे गेल्यानंतर पटवर्धन यांनी किल्लेदाराशी वैयक्तिक बोलणी सुरू केली त्यामुळे किल्लेदार जास्तच मागणी ( पैशाची ) करू लागला. हे नानासाहेब यास समजताच नानासाहेबाने पटवर्धन यास पत्र लिहले त्यात नानासाहेब लिहितात –
‘तुम्ही सख्त जलद शिपाई असे जाणोन मी तुम्हास पाठविले होते.तुम्हीच असा विचार लिहिणार,इतके कळले असते तर एखादे लहानसान पथक पाठविले असते.तो प्रथम दिवशीच रस्त बंद करिता, काहीच द्ययावचे न बोलता,म्हणजे आज काम झाले असते’.यास्तव तुम्हास यश यावे म्हणून तुम्हासच आज्ञा तुम्हास करितो ते तुम्ही करत नाही ये गोष्टीस इलाज कोणता करावा ?
गोपाळरावजी ! हे दौलताबाद तुम्हास फार दुर्घट वाटते परंतु दोन महिन्यात सखतीने वेढा घालून एक रुपया न देता घेऊ का की त्याची कुमक कोणी करत नाही.मोगलाने कुमक केली तर पुनरपि श्रीकृपेने पन्नासहजार फौज जमा करून अगदी मोगल दक्षिणेत होता का नव्हतासा करू हे मोगल समजले आहेत. तुम्ही समजत नाही यास इलाज काय करावा ? रागे भरून लिहले म्हणजे तुम्हास आता राग येईल.या पत्रपूर्वी कार्य झाले असेल तर उत्तम आहे.नाहीतर परिचिन्ह शहरपन्हा घेऊन वेढा बसविणे श्री कृपेने कार्य होईल. जो जो तुम्ही राजकारण करिता तो तो काम नासते या उपर या पत्रावरून जितका राग येईल तितका त्यावर काढणे.जर कार्य झाले असेल तर व्यर्थ राग येऊ न देणे.
संदर्भ – ऐतिहासिक लेख संग्रह खंड १
विशाल खुळे