कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी –
खिद्रापूर या गावाचे प्राचीन काळातील नाव कोप्पम असे होते.यास पुरावा म्हणून सुप्रसिद्ध अश्या कोपेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाला लागूनच असलेल्या भिंतीवरील शिलालेखात हे नाव आढळते. हा शिलालेख इ.स १२१३ मधील असून यादव राजा सिंघणदेव द्वितीय याचा आहे.तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हा मध्ये येऊर येथील एका शिलालेखात सुद्धा कोप्पम हे नाव येते. हा शिलालेख इ.स १०७७ चा असल्याने खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी ११ व्या शतकापर्यंत मागे जाते.(खिद्रापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी)
कोपेश्वर मंदिराचे अस्तित्त्व : १०७७ मध्ये कोपेश्वर मंदिर छोटेखानी का होईना अस्तित्वात असावे याचे कारण येऊर च्या शिलालेखात शंकर आर्य नावाच्या व्यक्तीने पुत्रप्राप्ती साठी कोप्पम मधील कोप्प देवाची ( कोपेश्वर) ची अनेक व्रत करून पूजा केली.
कोपेश्वर : महाराष्ट्राचे कुरुक्षेत्र..!!
महामहोपाध्याय वा.वी.मिराशी यांनी खिद्रापूर परिसराला कुरुक्षेत्राची उपमा दिली आहे.ती किती सार्थ आहे हे आपल्याला पुढील बाबीवरून समजते
१- इ.स ११ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेतून उत्तरेकडे आक्रमणे वाढली होती. परमप्रतापी चोल राजवंश त्यांच्या राज्याच्या सीमा रुंदावत महाराष्ट्रापर्यंत आला होता.त्यावेळी आपला महाराष्ट्र उत्तरं कालीन चालुक्य राजवंशाच्या हाताखाली होता. चौल सम्राट राजाधिराज १ ला याने महाराष्ट्र राज्यावर आक्रमण केले होते. त्याची अजस्त्र सेना अवाढव्य हत्तिदळ, अश्वदळ सह कृष्णा नदीच्या तीरावर येऊन स्थिरावले होते. मंदाध हत्ती व तेवढेच तगडे सैन्य असल्याने खिद्रापूर ला रणभूमीचे स्वरूप आले होते.त्यांना प्रतिकार कार्यासाठी सज्ज होता चालुक्य राजा पहिला सोमेश्वर अर्थात अहमल्लदेव.
ही घटना आहे सन १०५८ ची जेव्हा चालुक्यांनी पराक्रमाची नुसती शर्थच केली नाही तर राजाधिराज चोल चा पराभव करीत त्याच्या सैन्याचा धुव्वा उडविला या लढाईत राजाधिराज चोल मारण पावला. महाराष्ट्राच्या सुपुत्रांचा हा पराक्रमाचा वारसा आहे.जो आज ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही म्हणूनच हा सर्व प्रपंच.मिराशींनीं कोप्प म्हणजे लहान गाव असं ऐके ठिकाणी म्हटलयं परंतु कोप्पम् या शब्दाचा तमिळ मधे प्राचीन नगर असा अर्थ होतो. या प्राचीन नगराचा देव कोप्पेश्वर असा त्याचा अर्थ.(खिद्रापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी)
©इतिहासदर्पण & Aashish Kulkarni