कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३ –
मागील दोन भागांमध्ये आपण कोप्पम व कोपेश्वर मंदिराबाबत ची प्राचीन काळातील माहिती समजून घेतली होती.आता पुढे कोप्पम चे खिद्रापूर हा प्रवास जाणून घेणार आहोत.कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३.
देवगिरीच्या यादवांनी कोल्हापूर जिंकून आपले राज्य मोठ्या प्रमाणात वाढवले. तसेच यादव सम्राट सिंघण द्वितीय या नंतर वास्तविक त्याचा मुलगा जैतुगी यास राज्य मिळायचे होते परंतु सिंघण च्या हयाती मध्येच जैतूगी निवर्तला असावा.त्यामुळे त्याचा मुलगा कृष्ण अर्थात कृष्णदेव या गादीवर आला.याच्या नंतर याचा मुलगा रामदेव याना राज्य मिळणार होते परंतु तो अल्पवयीन असल्याने कृष्ण चा धाकटा भाऊ महादेव यास राज्यकारभार सोपवण्यात आला. महादेव यादव ने अतिउच्च पराक्रम गाजवत उत्तर कोकण च्या शिलाहार राजांची सत्ता संपवली..सोमेश्वर व महादेव यांच्यातील सागरी युद्ध हे प्रसिद्ध आहेच. या नंतर रामदेव यादव गादीवर येऊन त्याने देखील मोठा पराक्रम गाजवला. १३व्या शतकाच्या अखेरीस सुलतानी आक्रमणे जोमाने सुरू झाली व त्यानंतर अवघा महाराष्ट्र पारतंत्र्याच्या गर्द सावलीत गेला.खिलजी,तुघलक,बहामनी असे किती तरी शासक होऊन गेले.
खिद्रापूर नावाची उत्पत्ती :-
१७ व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राचा पुनर्जन्म झाला तो छत्रपति शिवरायांच्या रूपाने..या घटने साठी देखील कित्येक शतके गुलामगिरी, आक्रमणे या भूमीला सहन करावी लागली. महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली व महाराष्ट्रधर्म वाढविला.यादव राज्यानंतर एका हिंदुपदपादशाही ची स्थापना सुमारे ४०३ वर्षांनी १६७४ ला झाली. राज्याभिषेकाच्या धामधुमीत बहलोलखान स्वराज्यावर मोठ्या फौजेसह चालून आला त्यास सेनापती प्रतापराव गुजर यांनी उंबराणी येथे तलवारीचे पाणी पाजले..या बहलोल खानाचा सल्लागार खिदरखान होता.या खिदरखान कडे मिरज व त्याचा शेजारचा परिसर असावा..ज्यावरून कोप्पम गावाचे नाव खीदरखान वरून खिद्रापूर असे झाले असावे असे कोपेश्वर मधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याला संदर्भ शोधला तर खिदरखान या नावाची व्यक्ती आदिलशाही मध्ये बहलोलखान सोबत सापडते..
श्री कोपेश्वर चे स्थान असलेले हे पवित्र असे स्थान कोप्पम,खिद्रापूर, कोपेश्वर वाडी या नावाने ओळखले जाते.
(क्रमशः )
© इतिहासदर्पण
Image credits- Kolhapur tourism