ऐतिहासिक लोणी भापकर –
बारामती तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं लोणी भापकर हे एक गाव. पेशव्यांचे सरदार सोनजी भापकर यांचे हे इनाम गांव. बारामती जेजुरी मार्गाने जाताना २५ -२६ किमी अंतरावर काऱ्हाटी पाटीच्या पुढे पाच सात किमी लोणी पाटी म्हणून एक थांबा आहे. एक चौक आहे म्हणा हवं तर. उजवीकडे सुपा मार्गे शिरूर ला तर डावीकडे लोणी भापकर गावामध्ये जाता येतं. गावामध्ये मुख्य रस्त्याने आल्यावर आपण गावाच्या मध्यभागी असलेल्या चौकात पोहोचतो. पुण्याहून सोलापूर महामार्गाने चौफुला – सुपा – लोणी भापकर या मार्गानेही आपण या ठिकाणी येऊ शकतो. तसेच पुण्याहून जेजुरी मार्गे बारामतीला येताना मोरगाव पासून पुढे सात आठ किमी अंतरावर लोणी पाटी म्हणून थांबा आहे. उजवीकडे वळून सरळ पाच सहा किमी अंतरावर ऐतिहासिक लोणी भापकर गाव वसलेले आहे.
गावातील मध्य रस्त्यावरून करंजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा किमी अंतरावर सरदार भापकर यांचा भव्य असा गढी / वाडा आहे. गावाच्या चौकात पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास सहजरित्या आपणास मंदिराचे शिखर नजरेत भरेल. गावचे कालभैरवनाथ हे ग्राम दैवत. सरदार भापकर यांच्या काळातच हे मंदिर बांधले असल्याचे म्हटले जाते. शिवाय, मंदिराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला उंच मनोऱ्यावर एक घंटा लटकवलेली दिसते. सरदार भापकरांनी पेशवाईच्या काळामध्ये पोर्तुगिजांचा पराभव करून ती घंटा हस्तगत केली आणि मंदिराला अर्पण केली असे म्हणतात. मंदिराच्या समोर दगडी बांधकाम केलेल्या दोन दीपमाळ, तसेच उजव्या दीपमाळेच्या शेजारी असलेली बारवही बघण्यासारखी आहे. मंदिराच्या चहुबाजूंनीं चार पाच फूट रुंद अन अडीज तीन पुरुष उंच अशी भर भक्कम तटबंदी त्या काळातील मजबूत बांधकामाची साक्ष देतात. अन आजही आपल्या आधुनिक प्रगत तंत्रज्ञान असलेल्या २१ व्या शतकात आपली ओळख टिकवून दिमाखात उभी आहे.
मंदिरातील काळभैरव अन जोगेश्वरीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. सरदार भापकरांनीच या मूर्ती मंदिरामध्ये स्थापन केलेल्या आहेत. मंदिरातील आणि बाहेरील बहुतांशी भाग रंगवल्यामुळे मूळ दगडातील कोरीव नक्षीकाम रंगांखाली गेले असले तरी आपले अस्तित्व टिकवून आहेत. आतमध्ये पेशवे काळातील चित्रे, प्राण्यांची शिकार करतानाचे शिल्प, वादक, शिपाई अन नर्तक यांची शिल्पे बघायला मिळतात. तसेच दगडामध्ये केलेली विविध नक्षीकाम, कमल फुले, महिरप यांचे नाजूक कोरीव कामही पाहण्याजोगे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना डाव्या अन उजव्या बाजूला थोडं खाली देवी, देवतांची अन नर्तकी यांची नक्षीकाम केलेली शिल्पे दिसतात. मंदिरावर विविध देवदेवतांची, संतांची, प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपावर एकूण चार मिनार / कळस आहेत. त्यावरही देवदेवतांची शिल्पे रंगवलेली आहेत. मंदिराच्या मुख्य कळसाभोवती सुद्धा एकूण चार मिनार आहेत. कुतुब मिनार किंवा ताजमहालला ज्याप्रमाणे चार मिनार आहेत अगदी त्याप्रमाणेच यांची रचना आहे. शिवाय मंदिराचे घुमटाकार कळसही स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच.
त्यानंतर आपण जर करंजे गावाला जाणाऱ्या रस्त्याने गावातुन थोडस पुढे गेलो तर उजव्या बाजूला शिव शुंभुचे सोमेश्वर मंदिर नजरेस पडते. भैरवनाथ मंदीरासारखी नक्षीदार कलाकुसर या मंदिराला नाही. मंदिराचे सभागृह चौकोनी आकाराच्या एखाद्या खोलीसारखे आहे तर मुख्य गाभारा अनेक उभे स्तंभ एकत्र करून केल्या सारखा भासतो. मंदिराचा कळस घुमटाकार आहे. मंदिराच्या समोर असलेला चौथरा अन त्याचे मंडपही दगडी बांधकामात केलेले आहे. गाभाऱ्यातील शिवलिंग अन मंदिराच्या बाहेर असलेली वीरगळेही पाहण्यासारखी आहेत. त्यावर शूरवीरांच्या लढाईचे प्रसंग कोरलेले आहेत. अजून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बाभळीच्या काटेरी झाडाझुडपांमध्ये सरदार भापकर यांची गढी नजरेस पडते. चार बुरुंजान्नी युक्त आणि आतमध्ये असलेला वाडा अजूनही सुस्थितीमध्ये आहे. गढीचे बुरुंज आता ढासळलेले आहेत. बाहेरच्या भिंतींचीही बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. पण आतील मुख्य राहण्यासाठीचा वाडा आजही सुस्थितीत आहे. त्या काळात बनवलेले वाड्याचे लाकडी प्रवेशद्वार आजही चांगल्या स्तिथीत आहे. भापकर यांचे वंशज आजही या वाड्यामध्ये राहतात.
मुख्य रस्त्याने पुन्हा थोडस पुढे गेलो कि उजव्या बाजूला एक रस्ता जातो, त्या दिशेने थोडस अंतर पुढे गेलो कि डाव्या बाजूला आपणास एक पुरातन मंदिर नजरेस पडेल. हेच मल्लिकार्जुन मंदिर. शिव शंकर अन पार्वती यांची दोन शिवलिंगे या मंदिरामध्ये पाहावयास मिळतात. तेथील पुजाऱ्यांच्या माहितीनुसार हे मंदिर पांडवकालीन आहे. मंदिराच्या रचनेकडे पाहिल्यास १४व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंती स्थापत्य कलेचा त्यावर पगडा असलेला जाणवतो. अशाच प्रकारचे शंकराचे श्री सिद्धेश्वर मंदिर आपण कोऱ्हाळे बुद्रुक या गावी पाहू शकतो. मंदिराच्या शिखराचा भाग आणि सभामंडपाच्या वरच्या भागाची पडझड झाली असल्याने त्याची डागडुजी केली आहे. मंदिराच्या अन सभामंडपाच्या भिंतींचा भाग हा दगडी बांधकामात तर शिखराचा भाग नागर शैलीतील मातीच्या व चुना मिश्रीत विटांचा बनवलेला आहे. त्या काळातील कारागिरांची कलाकुसर अन नाजूक कोरीव काम आपण या मंदिरामध्ये पाहू शकतो. मंदिराच्या आतमध्ये नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ अन त्यावरील देवी देवता, नर्तकी, अप्सरा, प्राणी, शूरवीरांची, कृष्णाची, शिव पार्वतीची शिल्पे डोळे दिपवून टाकतात. सभामंडपाच्या छतावरील दगडी झुंबर म्हणजे आजकालच्या जमान्यातील चमत्कारच म्हणावा लागेल असे नाजूक कोरीव काम केलेले आहे.
आतमध्ये आल्यावर एखाद्या लेणीमध्ये आल्यासारखे वाटते. काही ठिकाणी कामशास्त्रातील कामशिल्पेही कोरलेली आपण पाहू शकतो. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूलाही देवी देवतांची शिल्पे, स्तंभ, रत्न, निसर्ग शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरच्या समोर नंदीचे शिल्प आहे आणि समोरच दिसते ती भव्यदिव्य आणि स्थापत्यकलेतील अनमोल देणगी लाभलेले आकर्षक जलकुंभ किंवा पुष्करणी. रस्त्यावरून सहजासहजी न दिसणारी ही पुष्करणी पूर्णपणे दगडी बांधकाम असलेली आहे. प्रत्येक दगडावर काही अंक कोरलेले आहेत आणि उतरायला चहूबाजूंनी खालीपर्यंत दगडी पायऱ्या आहेत. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही पुष्करणीही पांडवकालीन आहे, पांडवांची कला आहे. पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेले हे जलकुंभ पाहण्याची मजा काय औरच. खाली आल्यावर खालच्या कठड्यावरून आपण चहूबाजूंनी फिरून पुष्करणी पाहू शकतो. प्रत्येक ठिकाणी लहान लहान मंदिरांचा आकार असलेल्या जागा कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी त्यामध्ये देवी देवतांची शिल्पे असावीत पण आता आतमध्ये काहीच नाहीये. पश्चिम बाजूला एक चौथरा अन त्यावरचे मंडपही नजरेत भरते. याला बहुदा वराहमंडप असे म्हणतात.
पुष्करणीतील मंडपाच्या पायथ्याला हत्तीच्या तोंडाच्या भागाची शिल्पे कोरलेली आहेत. जणू या सभामंडपाचा सगळा भार या हत्तींनी पेलला आहे. त्यावरच्या भागात विष्णूच्या अवतारांची शिल्पे तर त्याच्या थोडं वरच्या भागात काही पुराणातील देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. त्याच्या वरच्या भागात चहूबाजूंनी कामशास्त्रातील विविध प्रसंगांची कामशिल्पे कोरलेली आहेत. पूर्वी या सभामंडपात महावराची मूर्ती स्थित असण्याची शक्यता असावी, सध्या हा सभामंडप रिकामाच आहे. कारण अगदी समोरच दशभुजा दत्ताचे मंदिर आहे. मंदिरासमोर महावराची मूर्ती नको म्हणून कदाचित तिथून बाहेर काढली असावी. आता महावराची भग्न अवस्थेतली मूर्ती जलकुंभाच्या पूर्व बाजूस बाहेर जमिनीवर ठेवलेली आहे. त्यावर विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्याची शेपटी सर्पाप्रमाणे वेटोळे केलेली आहे. तर समोर खाली एक मूर्ती हात जोडलेल्या स्थितीत आहे. तसेच खाली शंख, चक्र, गदा ही प्रतीकेही कोरलेली आहेत.
पुष्कर्णीच्या आतील सभामंडपासमोर दशभुजा दत्ताचे मंदिर आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. श्री दत्ताचे सहा आणि कालिकेचे चार असे मिळून मूर्तीला दहा हात आहेत. महाराष्ट्रामध्ये दहा हात असलेली दत्ताची एकमेव मूर्ती या मंदिरामध्ये आहे. तेथील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुर्धर रोगांनी पीडित आणि दुःखी लोकांचे गाऱ्हाणे या देवतेला साकडं घातल्याने वा नवस बोलण्याने पूर्ण होतात.
ऐतिहासिक लोणी भापकर एवढे चांगले ऐतिहासिक वास्तू वैभव लाभूनही दुर्लक्षितच असलेले मल्लिकार्जुन मंदिर, ओसाड पडलेली पुष्करणी, त्यामधील मोकळा सभामंडप, अन दुर्लक्षित महावराची मूर्ती मनाला कुठेतरी सल देऊन जातात. आपण नुसतेच म्हणतो कि, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तरीही बहुतांशी गड, किल्ले, वाडे – राजवाडे, शिल्पे, मंदिरे, लेण्या जतन करायचे सोडाच त्याची निगराणी वा डागडुजीही वेळोवेळी होत नाही. शेवटी आपला ऐतिहासिक वारसा असाच शेवटच्या घटका मोजत राहणार कि काय? असा नेहमी प्रश्न पडतो.
लेख संपवायच्या आधी एक आवर्जून सांगावसं वाटतं, हे असच चालू राहिलं तर, “छत्रपती शिवरायांच्या, संभाजीराजांच्या, मराठ्यांच्या पराक्रमाची अन दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारे गड – किल्ले, मंदिरे असेच जमीन-दोस्त होणार आणि तिकडे दूर अरबी समुद्रामध्ये काही हजार करोडो रुपयांची स्मारकं होत राहणार.”
Shinde Sunil
खूप छान माहिती मिळाली …धन्यवाद
बघायला जायची इच्छा आहे..ही सगळी ठिकाणे पाहताना चालावे किती लागेल किंवा चढून जावे लागेल का ? माझ्या बरोबर सिनियर सिटिझन आहेत..
पुणे ते बारामती पुढे लोणी भापकर किती अंतर ?
आधी कोणते ठिकाण पाहावे?