महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,877

ऐतिहासिक पेड

By Discover Maharashtra Views: 3808 6 Min Read

ऐतिहासिक पेड…

सांगली जिल्ह्याला खूपच मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. जिल्ह्यातील अनेक गावे हजारो वर्षांचा पराक्रमाचा इतिहास आपल्या पोटात सामावून आहेत. अश्याच एका ऐतिहासिक गावापैकी एक गाव म्हणजे तासगाव तालुक्यात वसलेले पेड हे गाव होय.

तासगाव तालुक्याच्या अगदी उत्तरेला व काहीसे ईशान्येला वसलेले हे गाव. पेड हे सांगली पासून सुमारे 50 कि मी तर तासगाव पासून 25 कि मी इतक्या अंतरावर आहे. गावची लोकसंख्या 2011च्या जन गणनेनुसार अंदाजे 5602 च्या असून गावच्या भवती इतरही 12 वाड्यावस्त्या वसल्या आहेत. पेड गावचे एकूण क्षेत्रफळ 2964.00 चौ हेक्टर इतके आहे. पेड हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले गाव असून तालुक्याचा इतर भाग शुष्क असून पेड मात्र एक नैसर्गिक साधनसंपत्ती ने समृध्द गाव आहे. तसेच गावाला तिन्ही बाजूनी डोंगररांग आहे त्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण देखील लाभले आहे. एकदा औरंगजेब बादशहा खानापूर नजिक आला असता या ठिकाणी भरपूर “पेड” हैं असे उच्चारल्याने पेड हे नाव पडले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

पेडचे ठळक असे वैशिष्ट्य म्हणजे गावातील मोठे वाडे तसेच विपुल प्रमाणात असणाऱ्या वीरगळ .

पेड गावात पुरातन सिध्दनाथ मंदिर, महादेव मंदिर, भवानी मंदिर , हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दर्गा अशी धार्मिक स्थळे आहेत. पेड मध्ये सहकारी बँक व्यावसायिक बँक सहकारी संस्था व पणन संस्था देखील आहेत.

पेड चा इतिहास संक्षिप्त स्वरूपात पाहिला असता, कलचुरीं च्या कर्हाटक साम्राज्याच नाक असे ज्या प्रदेशाला म्हणले आहे ते हे पेडच असावे. देशींग बोरगाव येथील हळेकन्नड शिलालेख तसेच भाळवनी येथील शिलालेखात हेडनाडू प्रदेशाचा ऊल्लेख आला असून केत गावुंड , कप्प गावुंड, महांक व करीकुळ इत्यादी बिज्ज्लाच्या पेड येथील सैन्य अधिकाऱ्यांचा ऊल्लेख देशींग बोरगाव शिलालेखात आला आहे. गावुंड म्हणजे ग्रामाधिकारी होय. हे ग्रामाधिकारी पेडचेच असावेत.

हेडनाडू नावा प्रमाणेच पेड हे गाव आपल्या समृध्दीची साक्ष देते. गावातील तीन टोलेजंग गढया भुतकाळातील समृध्दपणाच्या खुणा स्पष्ट करतात. मोठ्या वाड्याचे दोन बुरुज सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत तर इतर 4 बुरुज जमीनदोस्त झाले आहेत. साधारण दोन एकर एवढ्या परिसरात ही गढी पसरली होती. तसेच वाड्याचा चा मुख्य दरवाजा हत्ती सहज पणे आत बाहेर येऊ शकेल इतका मोठा आहे. तसेच वाड्याच्या शेजारी पिलखाना म्हणजेच हत्ती बांधावयाची जागा आहे व तेथे दगडी साखळदंड असल्याचे गावकरी सांगतात. गावातील तीन वाड्याचे मोठा वाडा छोटा वाडा व मधला वाडा असे सोईनुसार नाव पडले आहे. हे वाडे एकाच घरातील तीन भावाच असावेत.

गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील वीरगळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वीरगळ सापडणारे सांगली जिल्ह्यातील मोजक्या गावापैकी पेड एक आहे. आज सध्या चांगल्या स्थिती मधील 21 वीरगळ गावात आहेत. ( काही दिवसापूर्वी बा रायगड परिवार व मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ यांच्या वतीने सदर वीरगळ संवर्धन कार्य केले आहे.)

वीरगळ म्हणजे गावातील विराने गावच्या रक्षणासाठी किंवा गावचे पशुधन वाचवण्यासाठी हौतात्म्य पत्करले तर त्या वीराच्या स्मरणार्थ जी शिळा उभारली जाते तिला वीरगळ असे म्हणतात. पेड मध्ये अश्या विविध आकाराच्या अगदी अडीच फुटापासून ते साडेसात फुटाइतक्या भक्कम वीरगळ आहेत. हे वीरगळ गावातील योध्याचा पराक्रमच विशद करतात. वीरगळ यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून सर्व वीरगळ सुबक व आखीव रेखीव कोरल्या आहेत. ह्यावरून त्या कोणा महत्वाच्या व्यक्ती च्या असाव्यात हे सहजच लक्षात येते. गावामध्ये गो रक्षण वीरगळ , नाग शिल्प कोरलेली वीरगळ , तांबूस जांभ्या दगडात कोरलेली वीरगळ असे साधारण वीरगळ आढळून येतात.

पेडचे परंपरागत पाटील हे शेंडगे पाटील आहेत. ह्याचा पुरावा म्हणजे आदिलशहा दरबारात पाटिलकी अथवा गौडकी चा वाद गेला असता तिथे शेंडगे पाटलांनी आपण गेल्या सात पिढ्या पासून पाटिलकी करत असल्याचा जबाब दिल्याचे पत्र उपलब्ध आहेत तसेच पुढे मराठा कालखंडात अमृतराव शेंडगे हे सरदार की करत असल्याचे उल्लेख मिळतात तर भारत स्वतंत्र होईपर्यंत ही पाटिलकी शेंडगे घराण्याकडे कायम होती. तसेच सिध्दनाथ मंदिराच्या समोर गावच्या मध्यभागी अमृतराव (नाथाजी ) शेंडगे यांची समाधी देखील अस्तित्वात आहे.

पेड गावच्या अनुषंगाने अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्या म्हणजे राजा कडून गावच्या सीमा निश्चित करण्याकरिता सकाळी दिवस उजडायला घोडे पळवण्यास सुरवात केली असती सूर्यास्ताच्या वेळी जिथं घोडी थांबली तेवढी चौरस जागा पेड गावची सीमा निश्चित झाली म्हणून त्यास घोडेपेड असेही संबोधले जाते.

दुसरी कथा म्हणजे औंध चे पंतप्रतिनिधी यांचे दैवत म्हणजे औंधची यमाई ही ह्या शेंडगे पाटलांनी काही वाद झाल्याने पळवून आणली होती व ह्या झटापटीमध्ये पंतप्रतिनिधी यांचा हात शेंडगे पाटलांनी कापला होता. आज ही ती यमाई पेड मध्ये भवानी स्वरूपात पुजली जाते. अश्या विविध दंतकथा ऐतिहासिक पेड गावाशी जोडल्या गेल्या आहेत.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही पेड गावाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सांगली जिल्ह्याच्या सुरवातीच्या काळातील बँरिस्टर होण्याचा मान ह्याच गावातील बँरिस्टर टी के उर्फ तुकाराम शेंडगे यांचा आहे. ते काही काळ जत विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी देखील राहिले होते. त्यांनी गावात अहिल्याशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून शिक्षणाची गंगा जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील चालू केली. जी आज ही अव्याहत पणे सुरू आहे. तसेच आजचे मिरज विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी मा सुरेश भाऊ खाडे हे देखील पेड या गावचेच . तर दास कँपिटल या प्रसिध्द कंपनीचे सर्वेसर्वा अशोक खाडे हे देखील पेड गावचेच सुपुत्र होत. असे हे ऐतिहासिक पेड आपल्या पराक्रमाचे साक्ष देत आजही उभे आहे.

 

धन्यवाद
मधुकर हक्के.
सदस्य मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ

Leave a Comment