ऐतिहासिक वाडे…
वाडे संस्कृती हळूहळू लोप पावत चालली असल्यामुळे आज महाराष्ट्र,कर्नाटक मध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच वाडे शिल्लक राहिले आहेत.मोठमोठे सरदार,जाहगिरदार, सावकार, व्यापारी यांनी तालेवार पध्दतीने वाडे बांधले.या वाड्यांच्या विटा आणि विटा घडून गेलेल्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत.कुठे तलवारीचा खणखणाट झाला असेल,कुठे खलबतं शिजली असतील, इतिहासातील अनेक रणमर्द शौर्यवंत पुरूषांचा सारा वावर आपल्यात सामावून हे वाडे उभे आहेत.यातील अनेक वाड्यांना घरघर लागली आहे तरी वास्तुपुरुषांसारखे ते आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे आहेत.पैठणचे ऐतिहासिक वाडे १२,१३ व्या शतकातील आहेत.
वाड्यांची मुळ रचना सर्वत्र सारखीच आढळते फक्त त्या त्या व्यक्तीच्या ऐपतीनुसार आकारमान व सजावटीत बदल झालेला दिसतो.वाडा म्हणजे प्रथमता आला ‘महादरवाजा’यातून प्रवेश केल्यावर’देवड्या’ देवड्यांच्या समोर’चौक’ चौकाच्या सभोवती ओवर्यामध्ये पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था,कारकुनांचे फड, मालकांची गादी असायची.हा चौक ओलांडला की दुसरा चौक असे या चौकाभोवती पुजाघर, स्वयंपाकघर,बाळंतीणीची खोली व न्हाणीघर असायचे.येथे महिलांची ये जा असायची . पहिल्या चौकातून दुसर्या चौकात जाण्यासाठी ज्या खोलीचा वापर करायचे त्यास ‘माजघर’म्हणत असत.माजघराच्या खोलीचा दरवाजा सहसा जाळीदार असायचा जेणेकरून पहिल्या चौकात कामानिमित्ताने आलेल्या पुरुषांना आतील महिला दिसू नयेत.सर्वसामान्य व्यक्तिंचे वाडे दुचौकीच असत तर चौकाभोवती ओवर्या व माड्या बांधलेल्या असत माड्यांवर ‘दिवाणखाना’ व ‘रंगमहाल’असत . एखाद्या असामी तालेवार असेल तर त्याच्या वाड्यास तीन किंवा चार चौक असत व त्याप्रमाणे माड्यांची संख्या वाढत असे.काही वाडे सात चौकी व सात मजली असल्याचे उल्लेख आहेत.(शनिवार वाडा).
महाराष्ट्रात कुठेही गेला तरी वाड्यांची रचना अशीच दिसते पण वाडा या शब्दाची नेमकी व्युत्पंती सापडत नाही.वाडी या शब्दाचा अपभ्रंश होऊन वाडा हा शब्द तयार झाला असे अनेक इतिहास कारांचे म्हणणे आहे.पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने वाड्यामध्ये खुप माणसे राहत असत जणू एखाद्या वाड्यास वाडीचे स्वरूप प्राप्त होत असे.बहुदा त्यामुळेच वाड्यासारखा मोठ्या घरांना वाडी म्हटलं जाई व पुढे त्याचेच वाडा झालं असावं.
सध्या बर्याच वाड्यांचे फक्त अवशेषच उरले आहेत संपुर्ण महाराष्ट्रात दोन ते अडीच हजार तालेवार वाडे होते.आता मोजक्याच ठिकाणी पाहण्यास मिळतात
मोठमोठ्या वाड्यांमध्ये दिवाणखाने,खाजगी खोल्या,महाल,भोजनशाला,खास नृत्यांसाठी नृत्यमहाल,शिसवी लाकडी खांब, मखमली किनखापी पडदे, उत्तमोत्तम गालीचे व बिछायतींनी वाडे सजवले जात असत.दिवाणखान्यातील छताच्या बारीक कोरीव कामास फार महत्त्व होते.काही ठिकाणी छत झाकेल असा मखमली पडदा लावला जाई व त्यास काळ्यानिळ्या चांदण्या लटकविल्या जात त्यामुळे आपण मोकळ्या आकाशात चांदण्यांच्या प्रकाशात बसलोय असे वाटे.काही ठिकाणी वाड्यांच्या भित्तींवर वेगवेगळी चित्रे रेखाटली जात . दिवाणखान्यात पाहुण्यांची उठबस असल्याने दिवाणखान्यातच अशी चित्रशलाखा पाहण्यास मिळे यामध्ये समुद्र मंथन, दशावतार, रामायण, महाभारत व विविध पौराणीक कथांवर चित्र रेखाटली जात.चिकट मातीत भाताचा पेढां ,चुना, गवताचा चारा,शिपल्यांची भुकटी यांचे मिश्रण करून गिलावा केला जाई. त्यामुळे भिंतीस तडे जात नसत.निपाणीच्या वाड्यातील चित्रशलाखा पाहण्याजोगी आहे.
काही वाड्यांच्या चौकात कारंजे असत रहाटगाडग्यांच्या साहाय्याने पाणी वर चढवून खापरी पाईप मधून पाणी वेगाने सोडून कारंजे उडविले जात असत त्यासाठी मोठे हौद तयार केले जात या हौदांच्या कोनाड्यात दीप पेटवून रतिक्रिडाही केल्या जात असत.
वाड्याच्या भिंती चार फुटांपेक्षाही जाड असत व त्यातून जिने काढले जात. वाड्यांच्या बाहेरील भिंतीमध्ये देवड्या केल्या जात व आतमध्ये दोन कप्पे केले जात असत जेणेकरून या कप्यांमध्ये पक्षी बसत व दुसऱ्या कप्यात अंडी घालत म्हणजेच वाड्यात फक्त माणसांचीच नाही तर पक्षांची सुध्दा सोय पाहीली जात
वाड्यांच्या बांधकामासाठी दगडाबरोबर,चीरा, भाजक्या चपट्या विटा वापरत असत व त्या सांधण्यांसाठी चुना लावीत असत नगर जवळील पारनेरचा चुना प्रसिद्ध आहे.सातार्यात एका वाड्याच्या बांधकामासाठी पारनेरच्या तीन मण हिरव्या कळ्या पाठवल्याच्या नोंदी आहेत.काही वाड्यांच्या भित्तीं पाणी खेळवण्यासाठी मुद्दाम पोकळ ठेवल्या जात.भितींमध्ये लपण्यासाठी केलेली जागा शत्रू वाड्यात शिरताच त्याला चकवण्यासाठी अर्धवट केलेले जिने विशेषत्वाने दिसतात.वाड्याची बांधणी भुकंपरोधक केली जात असे.वाड्यामध्ये सुरक्षेसाठी भुयारी मार्ग सुध्दा तयार केले जात तसेच वाड्यातील सर्व खोल्यामध्ये स्वच्छ हवा खेळावी म्हणून वाड्यांच्या गच्चीवर वायुविजनासाठी खापरी पाईप बसविली जात.अर्धगोलाकार दोन पाईप जोडून वाड्यामध्ये पाणीपुरवठा खेळवला जात असे.
वाड्याच्या बांधकामासाठी सांधेबांध ही पद्धत प्रसिद्ध होती दोन दगडांचे सांधे योग्य पध्दतीने आडक केली जात.चुन्याच्या घाणीवर चुन्यामध्ये चुनखडी,शिपल्यांची बारीक राख यांचे मिश्रण करीत व बांधकाम करताना या मिश्रणाबरोबर शिसे ओतले जात असे.त्यामुळे ते भुकंपरोधक बनून त्यांची मुळ रचना कधीच हालत नसे त्यामुळे अशा वाड्यात बळद(भुयारी मार्ग) असत.बळदामध्ये कितीही दिवस माणूस राहीला तरी त्यास मोकळी हवा मिळण्याची सोय खापरी पाईप द्वारे केली जात.
तालेवार वाड्यांच्या दिवाणखान्यात लावण्यात आलेले आरसे थेट बेल्जीयम हून आण्यात येत त्याद्वारे त्या व्यक्तीची समाजातील श्रीमंती व्यक्त होत असावी.जुन्या वाड्यांचे हे वैभव सर्व इतिहास प्रसिद्ध शहरात पाहण्यास मिळते.आपल्या तोलामोलाचे वाडे फक्त राजे,रजवाडे,सरदार,जाहगिरदार यांनी बांधले असे नाही तर सावकार व्यापारी दरबारात धार्मिक कार्य करणारे यांनीही बांधल्याचे उल्लेख सापडतातथ.
लेखणी – संदिपसिंह उर्फ नाना सावंत साळुंखे
शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर