महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,281

इतिहास कसा अभ्यासावा?

By Discover Maharashtra Views: 2880 6 Min Read

इतिहास कसा अभ्यासावा?

इतिहास म्हणजे काय :-

भूतकाळात घडलेल्या घटना म्हणजे इतिहास . चालू वर्तमानातील प्रत्येक घटना ही उद्याच्या इतिहास आहे. इतिहास हा एखाद्या देशाचा, प्रदेशाचा , व्यक्तींचा , भौगोलिक परिस्थिति , राहणीमान , सजीव प्राणी व निर्जीव वस्तूंचा असतो .(इतिहास कसा अभ्यासावा?)

इतिहास आपणस आकर्षित करण्याची कारणे :-

मानवाला भूतकाळातील घटना , आपले पूर्वज व त्यांच्या विषयी जाणून घेण्याची सुप्त इच्छा असते. भूतकाळातील घडलेल्या चांगल्या वाईट घटना ज्या आपणास आपल्या वाडवडिलांकडून ऐकीव माहितीवर ज्ञात होतात त्या घटनांची सत्यता पडताळण्यासाठी इतिहास मनुष्यास आकर्षित करतो . तसेच त्या काळातील जीवन पद्धती , राहणीमान , संस्कृती , सणसमारंभ चालीरीती जाणण्यासाठी इतिहास संशोधनाची गरज भासते.

महाराष्टाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास हा प्रामूख्याने चर्चिला जातो . मराठा म्हणजे अठरापगड जाती स्वराज्यासाठी , भगव्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात वीरांनी रक्त सांडले ते सर्व मराठाच .

इतिहासाची साधने :- समकालीन साधने व उत्तरकालीन साधने अश्या दोन विभागात साधनांची विभागणी केली जाते.

समकालीन साधने :- इतिहासात घडलेली घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्ति किंवा त्या घटनेत सहभागी असणाऱ्या व्यक्ति किंवा या व्यक्तींशी संबंधित असणाऱ्या व्यक्ति किंवा तत्कालीन तटस्थ व्यक्ति यांनी केलेले लिखाण हे समकालीन लिखाण उदा. बखर , शिलालेख , पत्रव्यवहार , शकावल्या , सनद , ग्रंथ , पोवाडा , नाणी , तत्कालीन परकीय प्रवासी , परकीय व्यक्ति यांनी केलेल्या नोंदी , विरुद्ध पक्षातील लोकांनी केलेल्या नोंदी

उत्तरकलीन साधने :- भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल ऐकीव माहिती किंवा त्या वेळेच्या समकालीन साधनांचा आधार घेऊन केलेले लिखाण हे उत्तर कालीन लिखाण उदा. बखर , शिलालेख , ग्रंथ , पोवाडा , परकीय प्रवासी , परकीय व्यक्ति यांनी केलेल्या नोंदी , विरुद्ध पक्षातील लोकांनी केलेल्या नोंदी

समकालीन साधने ही प्रथम दर्जाची तर उत्तरकालीन साधने हे दुय्यम दर्जाची मानली जातात . इतिहास अभ्यासकास समकालीन व उत्तरकालीन साधनांनचा तुलनात्मक दृष्टीकोणातून अभ्यास करणे आवश्यक आहे

इतिहास अभ्यासकांनी इतिहास कसा अभ्यासावा –

इतिहास अभ्यासकांनी आपणास ज्या विषयी अभ्यास करावयाचा आहे त्या विषयी प्रथम कोणतेही पुर्वदूषित किंवा अनुकूल दृष्टिकोन ठरवून अभ्यास करू नये . इतिहास अभ्यास पूर्ण झाल्यावर ती व्यक्ति किंवा ती घटना योग्य की अयोग्य ठरवावे. अगोदरच एखाद्या घटनेविषयी किंवा व्यक्ति विषयी अभिमान बाळगला तर अभ्यासात त्या विषयी एखादी चुकीची घटना किंवा संदर्भ आढल्यास आपले मत आधीच तयार केल्याने ते सत्य आपण स्वीकारण्याएवजी पळवाट शोधण्याचा किंवा त्या व्यक्तीची ती कृती योग्यच ठरवण्याचा प्रयत्न करतो.

अगोदरच एखाद्या घटनेविषयी किंवा व्यक्ति विषयी दूषितपुर्वग्रह बाळगला तर अभ्यासात त्या विषयी एखादी चांगली घटना किंवा संदर्भ आढल्यास आपले मत आधीच तयार केल्याने ते सत्य आपण स्वीकारण्याएवजी पळवाट शोधण्याचा किंवा त्या व्यक्तीची ती कृती अयोग्यच ठरवण्याचा प्रयत्न करतो.

एखादी घटना घडली त्यात त्या व्यक्तीचा वैयत्तीक किंवा राजकीय लाभ होता का ? कींवा रागाच्या भरात किंवा अनावधानाणे किंवा पूर्व वैमन्यासातून किंवा धार्मिकतेतून किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यातून ती घटना घडली आहे का ह्या व इतर बाबींचा अभ्यास करूनच ती व्यक्ति किंवा ती घटना योग्य की अयोग्य ठरवावे.

मराठ्यांचा इतिहास लिहिणारे कृष्णराव अर्जुन केळुसकर , रियासतकर सरदेसाई , वी का राजवाडे , सेतु माधवराव पगडी , गणेश हरी खरे ,विजयराव देशमुख , वा. सी बेंद्रे , सदाशिव शिवदे , अ.रा. कुलकर्णी , गजानन मेहंदळे , जयसिंग पवार , इंद्रजीत सावंत तसेच इतर अनेक इतिहासकारांनी इतिहासात घडलेल्या एका घटनेविषयी वेगवेगळी मत मतांतरे मांडलेली आढळून येतात.

इतिहासात अनेक नवीन संदर्भ व शोध लागत असतात त्यामुळे वेळोवेळी इतिहासाची पुनर्मांडणी ही होत असते त्यामुळे १९०६ साली शिवचरित्र लिहिणारे कृष्णराव अर्जुन केळूस्कर व आज ११५ वर्षानी इतिहास लिहिणारे गजानन मेहंदळे यांच्या शिवचरित्रात आपणास तफावत किंवा त्रुटी आढल्यास कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांनी लिखाण केलेला कालखंड , उपलब्ध संदर्भ , त्यावेळेची परिस्थिति पाहता त्यांनी केलेले विधान हे आता कालबाह्य ठरू शकेल परंतु तो दोष लेखकास देता येणार नाही .

इतिहासकार हा कितीही मोठा असो किंवा त्याचा त्या विषयातील अभ्यास व अनुभव कितीही दांडगा असो तरी इतिहास अभ्यासकाने त्यांनी लिहिलेला इतिहास हा संदर्भासाहित व समकालीन दाखले देऊन लिहिला आहे का , त्यांनी ज्या साधंनांचा आधार घेऊन इतिहास लिहिला आहे त्याची त्याने योग्य प्रकारे चिकित्सा केली आहे का हे तपासण्याची जबाबदारि इतिहास अभ्यासक व वाचक यांची आहे .

इतिहासात चंदन आणि कोळसा दोन्ही आहेत आपण काय उगाळायचे हे प्रत्येकाने ठरवावे.

इतिहास हा सोयीनुसार लिहिला आहे का ?

१ ) इतिहास लेखन करणाऱ्यांची मानसिकता व लेखनकर्ता ज्याच्या आश्रयास आहे त्यानुसार इतिहास लेखन अवलंबून असते.

२ ) इतिहास लेखन करताना इतिहास लेखनकर्त्याकडून इतिहास लपवला जातो किंवा सोईस्कररीत्या मांडला जातो.

३ ) एखाद्या व्यक्तीशी वैयतिक हेवेदावे असल्यास त्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी इतिहास लिहिला जातो . एखाद्या व्यक्तीशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यास त्या व्यक्तीचे अवास्तव गुणगौरव करण्यासाठी इतिहास लिहिला जातो.

४ ) उत्तरकालीन इतिहासातील काही लेखन हे ऐकीव माहितीवर अवलंबून असते किंवा समकालीन एखाद्या गोष्टीचा विपर्यास असू शकते.

५ ) ऐतिहासिक साहित्यात कालांतराने जाणूनबुजून बदल करण्यात येऊन सोयिस्कर इतिहास मांडला जाऊ शकतो .

वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता इतिहास अभ्यासकाने इतिहास वाचन करून आपली मते ठरवावीत.

– नागेश सावंत

Leave a Comment