महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,335

औंधचा इतिहास

Views: 4823
4 Min Read

औंधचा इतिहास…

साताऱ्या पासून ६ कोसावर कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड गावचे जनकोजी शिंदे व त्यांची बायको द्वाराकाबाई या दाम्पत्यास एक मूल झाले त्यांचे नाव राणोजी शिंदे. चिमजीआप्पांबरोबर वसईची मोहीम आटोपून ते पुण्यास आले. त्यांनी औंध या गावची निम्मी पाटीलकी त्र्यंबकजी आणि सूर्याजी यांच्याकडून घेतली.आणि ते या भागातून महसूल जमा करू लागले.याच दरम्यान पाषाण आणि औंध या गावाचा सीमेचा वाद विकोपास गेला.राणोजीनी वादाच्या जागेची मोजणी केली परंतु निकाल हा पाषाणकरांच्या बाजूने लागला. औंधमध्ये राणोजीचा आदरयुक्त दरारा होता.मौजे मिर्झापुर प्रांत सुजालपुर येथे पायाला झालेल्या जुन्या जखमेमुळे राणोजीस कैलासवास झाला. सुजालपुर तहसील, जिल्हा शाजापुर, ग्वाल्हेर च्या जवळ असून त्यास राणोगंज हे नाव राणोजीचा देहवासनानंतर देण्यात आले. मौजे मिर्झापुर येथे वडिलांच्या शवास अग्नि दिल्यानंतर रक्षा उज्जैन येथे आणून जयप्पाने राम घाटावर वडिलांचे दुसरे स्मारक बांधले.औंधचा इतिहास.

राणोजी शिंदे यांस दोन स्त्रिया होत्या निंबाबाई आणि चिमाबाई. निंबाबाईस तीन पुत्र होते जयाजी (जयप्पा), जोत्याजी,आणि दत्ताजी. कनिष्ठ चिमाबाईस दोन पुत्र होते तुकोजी आणि महादजी.

जयप्पा यांचा खून होऊन दत्ताजी शिंदे हे दिल्लीकडे झालेल्या एका लढाईत धारतीर्थ पडले. राणोजीनंतर जयप्पाचा मुलगा जाणकोजी हे सरदार झाले. तेही पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडले.राणोजीचे चौथे पुत्र तुकोजी हेसुद्धा पानिपतच्या युद्धात पडले.

तुकोजींची स्त्री लक्ष्मीबाई ही देवजी तापकीर यांची कन्या असून त्यांना केदारजी रावलोजी व आनंदराव हे तीन पुत्र आणि दोन मुली होत्या. केदारजी हे खूप हुशार आणि कर्तबगार होते.शाळूबाई या रानवडे पाटलांच्या कन्या होत्या.या दाम्पत्याने नदीकाठील विठ्ठल मंदिर उभे केले.या मंदिरातील पूजेसाठी विष्णू अमृत पुराणिक ( विष्णूभट) या ब्राम्हणाची नेमणूक केली होती. त्याची समाधी विठ्ठलमंदिरा समोर अस्तित्वात आहे. शाळूबाई यांनी नदीवर घाट बांधले. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांनी जागोजाग विहिरी खोदल्या त्यापैकी एक विहीर मिल्ट्री परिसरात रस्त्याच्या कडेला आहे. तसेच दुसरी खणखण विहीर औंध येथे आहे. केदारजी शिंदे,त्यांची बायको शाळूबाई व भाऊ रावलोजी यांची निधनतिथी मिळत नाही परंतु त्यांचे देहावसान औंध मध्ये झाले. नदीकाठी जो प्रसिध्द वाघाचा घाट आहे त्या ठिकाणी रावलोजी यांची समाधी आहे. तसेच विठ्ठल मंदिरासमोरील जागेत केदारजी शिंदे यांच्या समाधी शेजारी शाळूबाई यांची समाधी आहे.

ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे तेथे पूर्वी ५५ खणी शिंदे सरकारचा वाडा होता.

शिंदेसरकारांच्या वाड्याला लागून पश्चिम दिशेला महादेवाचे पुरातन मंदिर आहे. सध्या ते नव्याने डागडुज्जी करण्यात आले आहे. या मंदिराच्या आवारात दगडातील दोन पिंडी व दोन समाध्या दिसतात. मंदिराच्या जवळील मठातील साधूने याच ठिकाणी जिवंत समाधी घेतली. त्यांची व त्यांच्या शिष्याची अशा त्या दोन समाध्या आहेत.

महापराक्रमी महादजी शिंदे वानवडी येथे वारले. वानवडी येथे दौलतरावांनी त्यांची समाधी छत्री बांधली. ही छत्री अलीकडे माधवराव शिंदे यांनी टोलेजंग केली.

महादजीना मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपल्या भावाचा नातू दौलतराव यांना दत्तक घेतले. दौलतराव निपुत्रिक असल्यामुळे त्यांनी जाणकोजी यांना दत्तक घेतले. तेही निपुत्रिक असल्यामुळे त्यांनी जयाजीराव यांना दत्तक घेतले. जयाजीराव यांच्यानंतर त्यांचा मुलगा माधवराव गादीवर आले. आणि नंतर ती गादी जिवाजीराव शिंदे यांच्याकडे आली.

मुळानंदीकाठी आणखी दोन समाध्या आहेत त्या बद्दल इतिहास मौन बाळगून आहे.

प्रस्तुत लेखामध्ये काही व्याकरणाच्या चुका असतील वाचकांनी त्या समजून घ्याव्यात.

संदर्भ:-

१) शिंदेशाहीचे आद्य प्रवर्तक

2)मराठी रियासत खंड ५ वा

3)मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६

4)सुभेदार राणोजी शिंदे

5) शिंदेशाही इतिहासाची साधने

6)पेशवा बाळाजीराव खंड ५

7) महाराष्ट्राचा इतिहास

8) मराठी रियासत खंड ८

केशव मस्के – ९९२०२९७९३८

Leave a Comment