महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,629

मोडी लिपीचा इतिहास भाग १

By Discover Maharashtra Views: 2498 5 Min Read

मोडी लिपीचा इतिहास भाग १ –

मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. [पहा: Typography Of Devanagari, १९६१, मुद्रक: महाराष्ट्र सरकार.] मोडी लिपीचा इतिहास.

मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.

मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात. देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्लिश भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.

मराठी लेखनाबद्दल ज्ञानेश्वरांनी खालील ओळीत उल्लेख केला आहे. :-

१]हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु, वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)

२]सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)

३]दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)

४]आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)

इ.स. १८०१मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ, श्रीरामपूर बंगालयेथे बनवला.

“रघु भोसल्यांची वंशावळी “,” मराठी भाषा व्याकरण”,”मराठी कोष”, “नवा करार “(१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.

ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला.

मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे – यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसू लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.

अलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून त्यांत असलेली लिपी, ही मोडी लिपी शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी(म्हणजे महाजनी) आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे. गुजराती आणि बंगाली भाषा या सुरुवातीला देवनागरी लिपीत लिहिल्या जात, परंतु तेथील भाषाभिमान्यांनी हट्टाने वेगळ्या लिपीची उभारणी करून ती वापरण्यास सुरुवात केली.

संदर्भ : – मोडी भाषेतील कागदपत्रे, मोडी लिपीचा इतिहास.

Nishant Kapse 

Leave a Comment