महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,226

संभाजी महाराजांचा इतिहास कोणत्या पुस्तकांमधून वाचायला हवा?

By Discover Maharashtra Views: 2036 4 Min Read

संभाजी महाराजांचा इतिहास कोणत्या पुस्तकांमधून वाचायला हवा?

14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. संभाजी महाराज म्हणलं की ‘छावा’ आणि ‘संभाजी’ च्या पुढे दुसऱ्या पुस्तकांची नावे सुचत नाहीत. थोड्याफार लोकांना वा. सी. बेंद्रे, कमल गोखले किंवा सदाशिव शिवदेंचे चरित्र माहीत असते. संभाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांच्या कारकीर्दीवर अनेकांगाने अभ्यास करून बरीचशी पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा थोडक्यात मागोवा आपण घेऊ.

भीष्माचार्य वा . सी. बेंद्रे यांनी लिहिलेलं ‘छत्रपती संभाजी महाराज’ हे संशोधनात्मक चरित्र तर सर्वांना सुपरिचित आहे. त्यांच्या लेखणीने संभाजी महाराजांच्या इतिहासाला सर्वप्रथम न्याय दिला. बेंद्रेंच्याच मार्गदर्शनाखाली ‘War tactics of Sambhaji’ हा विषय घेऊन फार मोठे संशोधन कमल गोखले यांनी केले. पुढे अनेक नवीन संदर्भांना एकत्रित करून ‘शिवपुत्र संभाजी’ या पुस्तकाची त्यांनी निर्मिती केली. सदाशिव शिवदे सरांचे ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ अलीकडच्या काळात प्रकाशित झालेलं एक उत्तम पुस्तक आहे.

याच शिवदे सरांनी ‘छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे’ या नावाने अजून एक पुस्तक प्रकाशित केले आहे. शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांवर अनेक अभ्यासकांनी चिकित्सक दृष्टीकोनातून चर्चा केली आहे. या काळातील पत्रांचा संग्रह करून अनुराधा कुलकर्णी यांनी ‘शिवछत्रपतींची पत्रे खंड 1 आणि 2’ प्रकाशित केले आहेत. पण संभाजी महाराजांच्या पत्रांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला नाही. त्यामूळे संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणाऱ्या नवीन पिढीस हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल.

याच अंगाने लिहिलेले अजून एक पुस्तक म्हणजे केदार फाळके संपादित ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनिती’. मागच्या वर्षी प्रकाशित झालेलं हे पुस्तक संभाजी  महाराजांच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडू शकते. संभाजी महाराजांची राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थकारण, व्यापार व उद्योगधंदे, चलनव्यवस्था, वेतन व इनामे इ. अतिदुर्लक्षित बाबींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. यासाठी अनेक अस्सल कागदपत्रांचा आधार घेण्यात आला आहे.

रा. आ. कदम सरांनी लिहिलेलं ‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृतसाहित्य’ हे पुस्तक त्याप्रकारातील एकमेव म्हणावे लागेल. संस्कृत भाषेत संभाजी महाराजांच्या इतिहासाचे जे काही वर्णन आले आहे, त्याची एकत्रितपणे चिकित्सा या पुस्तकात कदम सरांनी केली आहे. ज्यात अनेक संस्कृत ग्रंथ, दानपत्रे, शिलालेख इ. समकालीन साधनांचा आधार घेतला आहे.

जयसिंगराव पवार सर संपादित ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’ हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. एकूण 52 वेगवेगळ्या इतिहासकारांचे, कादंबरीकारांचे लेख या ग्रंथात एकत्र केले आहेत. ज्यात बेंद्रे, रियासतकार सरदेसाई, कमल गोखले, विजयराव देशमुख, पिसुरलेकर, सेतुमाधवराव कुलकर्णी, नरहर कुरुंदकर, अ. रा. कुलकर्णी, भाऊसाहेब पवार, निनाद बेडेकर यांची नावे प्रामुख्याने घ्यावे लागतील. याचबरोबर ग्रंथामध्ये काही अशा व्यक्तींचे लेख समाविष्ट केले आहेत, ज्यांचे इतिहासात महत्वाचे स्थान आहे. औरंगजेबाच्या दरबारात इतिहासलेखनाचे काम करणाऱ्या खाफिखान, साकी मुस्तैदखान, ईश्वरदास नागर यांच्या समकालीन लेखांचा समावेश या ग्रंथात केला आहे. खाफीखानच्या लेखाचे शीर्षक ‘शिवाजीपेक्षा दहापटीने अधिक तापदायक राजा’ असे दिलेले असून नागरच्या लेखाचे शीर्षक ‘संभाजी : बादशाहास ताजिम न देणारा राजा’ असे देण्यात आले आहे. या ग्रंथाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जयसिंगराव पवार सरांनी दिलेली 90-95 पानांची प्रस्तावना. हा ग्रंथ आज दुर्मिळ झाला असला तरीही पवार सरांनी त्यांची विस्तृत प्रस्तावना ‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा’ या पुस्तकरूपाने प्रकाशित केली. आज हे छोटेखानी पुस्तक सहजपणे उपलब्ध होण्यासारखे आहे.

वर दिलेल्या सात-आठ पुस्तकांमध्ये संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास समाविष्ट नाही. भविष्यात होणाऱ्या नवीन संशोधनामुळे यात अजून भर पडेल, याची कल्पना आहे. पण सद्यस्थितीला ही पुस्तके संपूर्ण शंभूचरित्राची व्याप्ती लक्षात आणून देण्यासाठी पुरेशी आहेत. अर्थात हे वैयक्तिक मत..

दरवर्षी संभाजी महाराजांची जयंती आली की काही ठराविक पोस्ट, मॅसेज सर्वत्र फिरतात, फिरवले जातात.. यामुळे होतंय काय, संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत अजूनही पोहचला नाही, याची जाणीव होत राहते. संभाजी महाराजांनी 80 लढाया लढल्या, 120 लढाया लढल्या, 150 लढाया लढल्या असे मॅसेज यायला सुरुवात झाली आहे. पण 5 लढायांचे नाव सांगा म्हणलं की गोवा, जंजिऱ्याच्या पुढे गाडी सरकत नाही. यासाठी आपणच जबाबदार आहोत, असं समजूया. शक्य होईल तेवढा इतिहास पुस्तकांच्या साहाय्याने समजून घेऊया.. त्याचा प्रचार-प्रसार होतच राहील. आधी वस्तुस्थितीची जाणीव आपल्याला होणं महत्वाचं आहे. नाहीतर आपणच आपल्या छत्रपतींच्या पराक्रमाची केलेली ही एकप्रकारे विटंबनाच..

केतन पुरी

Leave a Comment