सरदार बंडगर घराण्याचा इतिहास भाग १
अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांच्या अन्यायविरुध्द बंडखोरपणाचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे हट्टी लोकांमध्ये झेंडे,मेंढे,बरगे प्रमाणेच बंडी/बंडे नामक एक उपसमूहच तयार झाला होता. १५ व्या शतकात लिहिलेल्या ऐन-ए-अकबरी नामक ग्रंथात तर हाटकर लोकांना बंडखोर म्हंटले गेले आहे. बंडगर हे आडनाव याच उपसमूहातील दर्शक आहे. बंडगर हे अग्निवंशी क्षत्रिय असून ते सोळंकी या प्राचीन कुळातील आहेत.सरदार बंडगर घराण्याचा इतिहास.
प्रस्तुत माहिती हि श्री. संतोषराव पिंगळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
सरदार पदाजीराव बंडगर (अमीर-उल-उमराव )भाग १
बंडगर हे नावंच शौर्य,पराक्रम, व स्वाभिमान या गोष्टींचा निर्देश करते. बहिर्जी बंडगर नावाच्या पराक्रमी पुरूषास शिवाजी राजांनी सरदारकी बहाल केली होती. हा बहिर्जी परगणे महांकाळ कवठे येथील आपली देशमुखी वंशपंरपंरेने चालवत असे .त्याचा मृत्यू कधीचा या बाबत निश्चित विधान करता येत नाही.
इ.स.वी सन १६९८ च्या सुमाराला राजाराम महाराजांनी बंडगर घराण्यातील ज्या वीर पुरूषांच्या नावे सरंजाम बहाल केला त्यांची नावे १पदाजी २ मुधोजी ३ जावजी ४ सुभानजी व ५ संताजी असी होती. पुढे महाराणी ताराबाई यांनी ६ जिवाजी ७ शिवाजी ८ मानाजी ९ होनाजी या बंडगर बंधूनाही स्वतंञ सरंजाम बहाल केला. पदाजी व मुधोजी यांचा खासा सरदार असाही निर्देश झालेला आहे.
औरंगजेबाशी सुरू असलेल्या संघर्षाच्या वेळी पदाजी व मुधोजी हे बंधू बहिर्जी घोरपडे हिंदुराव यांच्या दिमतीला असत.पदाजीला “अमीर-उल-उमराव” तर मुधोजीला”नुसरतजंगबहाद्दर” असे किताब देण्यात आलेले होते. त्यांच्या नावे देण्यात आलेल्या कित्येक सरंजामपञांत याचा उल्लेख आढळतो. बहुधा हे किताब राजाराम महाराजांनीच त्यांना दिलेले असावेत कारण यापूर्वी बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांचा लहान भाऊ असलेल्या व त्यांच्याच दिमतीला असलेल्या मालोजी घोरपडे यांस अमीर उल उमराव हा किताब होता पण त्यांचा मृत्यू १६९८ पूर्वीच झालेला होता. आणी पदाजी हा त्याचीच जागा चालवत होता असे म्हणता येईल.
संदर्भ : शाहू दफ्तर पुराभिलेखागार पुणे येथील अस्सल कागदपञ
माहिती सौजन्य- श्री.संतोषराव पिंगळे