परकीयांच्या नजरेतून मराठ्यांच्या छावणीतील होळीचा सण –
होळी-रंगपंचमीचा सण म्हणजे रंगेबीरंगी रंगांची उधळण, नुसती धमाल. पण ही धमाल मराठ्यांच्या राज्यात देखील होती बरका. रंगपंचमीच्या सणाचे उल्लेख मराठ्यांच्या (पेशवाईत) इतिहासात तर आढळतातच पण त्यासोबतच परकीयांच्या नजरेतूनही मराठे होळी कशी साजरी करत हे एका विशेष साधनातुन कळतं त्याबद्दल थोडेसे.मराठ्यांच्या छावणीतील होळीचा सण.
‘ब्रॉटन’ हा इ.स. १८०९ मध्ये दौलतराव शिंदे यांच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंटसोबत असलेल्या ब्रिटिश तुकडीचा प्रमुख होता. त्याने ३२ पत्रं आपल्या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भावाला लिहली आणि त्याचं संकलन करून Letters From A Maratha Camp हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पत्रात दौलतराव शिंद्यांच्या सैन्याच्या छावणीचं वर्णन केलंय. विशेष म्हणजे हा ब्रॉटन इ.स. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणाच्या वेढ्यात मराठ्यांच्या सोबत होता. विशेष असं की मराठ्यांच्या छावणीत होणाऱ्या होळी सणाचं विस्तृत वर्णन आलंय. हा ब्रॉटन राजस्थान जवळील डूनी जवळ असताना होळीचा सण साजरा झाला त्याबद्दल तो लिहतो,
“आम्ही त्या ठिकाणी मुक्कामाला असताना, होळीच्या सण होता, तेव्हा रंग खेळण्याची सर्व तयारी केली होती. होळीमध्ये ‘सिंगारा’ नावाच्या जलकमळापासून बनवलेले, लाल चंदनाने रंगवलेले पीठ एकमेकांच्यावर फेकतात. याला ‘अबीर’ म्हणतात. या समारंभात एकमेकांवर ‘अबीर’ फेकणे, त्यांच्यावर नारंगी रंगाचे पाणी शिंपडणे हाच मुख्य मनोरंजनाचा भाग असतो. चमक वाढवण्यासाठी काहीवेळा ‘अबीर’ मध्ये खडिया मिसळतात. असा ‘अबीर’ डोळ्यांत गेला तर खुप त्रास होतो. कधीकधी जिलेटिनसारख्या द्रवातून बनवलेल्या, लिंबाच्या आकाराच्या गोल आकाराच्या चेंडूंमध्ये ‘अबीर’ असतो.त्याचा नेम धरून फेकतात”
“आम्ही शिंद्यांकडे या विलक्षण मनोरंजनात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. त्यांनी आम्हाला होळीच्या निमित्ताने उभारलेल्या सुमारे शंभर-पन्नास फूट लांबीच्या तंबूत नेले. ते स्वतः उंचीवर असणाऱ्या व्यासपीठावर बसले होते. समोर एक कारंजे उभारले होते, ज्यामध्ये काही दरबारी मनोरंजनासाठी एकमेकांना बुडवण्याचा प्रयत्न करत होते. समोरच्या बाजूला नाचणाऱ्या बायकादेखील होत्या. आम्ही या प्रसंगासाठी योग्य असा, पांढऱ्या लिनेनचे जॅकेट आणि पॅन्ट असा पेहराव करून गेलो होतो. आत जाताना आम्हाला सांगण्यात आले की, खेळ संपेपर्यंत कोणालाही तंबू सोडून जाता येणार नाही.”
“आम्ही बसल्यावर काही मिनिटांतच मोठे तांब्याचे ताट आले. त्यामध्ये मी आधीच वर्णन केलेले अबीर आणि छोटे गोळे भरले होते. त्यासोबत प्रत्येक व्यक्तीसाठी मोठी चांदीची पिचकारी होती. महाराजांनी (शिंदे) स्वतः गुलाबदाणी घेऊन आमच्यावर थोडेसे लाल आणि पिवळे पाणी शिंपडून सुरुवात केली. मग सर्वजण जवळच्या लोकांवर अबीर फेकू लागले आणि पिचकारी मारू लागले. दरबाराच्या शिष्टाचाराप्रमाणे कोणीही महाराजांवर रंग फेकू नये असा नियमच होता. मात्र महाराज म्हणाले “मला काही हरकत नाही, मीही सज्ज आहे. आता कोण चांगले फेकू शकतो ते पाहू” परंतु, लवकरच आम्हाला हे लक्षात आले की, आमची त्यांच्याशी बिलकुल तुलना होऊ शकत नाही. कारण, त्यांच्या सेवकांनी त्यांच्या हाती पिवळ्या पाण्याने भरलेली मोठ्या यंत्राची नळी दिली. तंबूतले सगळेच जोरदार भिजले. आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तेथील जमीन काही इंचांपर्यंत गुलाबी आणि नारंगी रंगाच्या चिखलाने झाकली गेली. माझ्या आयुष्यात मी असा प्रकारचा देखावा कधी पाहिला नव्हता.”
ब्रॉटन पुढे म्हणतो , “होळीचा सण संपूर्ण हिंदुस्थानात सर्व वर्गांमध्ये साजरा केला जातो. हा सण रोमन सॅटर्नालिया उत्सवादरम्यान खेळल्या उत्सवासारखाच आहे . या सणात महिलाही सहभागी होतात. हिंदू वर्षाचा शेवटचा महिना ‘फाल्गुन’ आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला हा सण येतो. होळीच्या उत्सवा दरम्यान, गाण्यांचे कार्यक्रम होतात तेव्हा त्यातले संगीतकार हे नेहमीच ब्राह्मण असतात. त्यांचा पोशाख जवळपास नाचणारी मुलींच्या पोशाखाशी थोडाफार मिळताजुळता असतो, परंतु त्यांचे नृत्य आणि गायन हे सामान्यतः बरेच चांगले असते. सैनिकांना हे कार्यक्रम इतके आवडतात की ते त्यांचा आनंद घेण्यासाठी रात्रभर जागरण करतात.
मराठी भाषांतर – रोहित पवार