अभिनव होळी स्मारक, पुणे –
पुणे हे शहर जसे पेशवाईसाठी ओळखले जाते तसेच ते भारताच्या स्वातंत्र लढ्यातील नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्यासाठी देखील ओळखले जाते. मागच्या शतकातील लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, शि. म. परांजपे असे एक ना अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीत एकनिष्ठेने भाग घेत होते. स्वातंत्र मिळवण्यासाठी देशभर आंदोलने आणि स्वदेशीचा जागर सुरू झाला होता. विद्यार्थी समाज नावाची एक संघटना पुण्यातील विद्यार्थी विश्वात कार्यरत होती. त्यातील एक विख्यात व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांनी एक अभिनव उपक्रम मुठेच्या काठी साकारला. अभिनव होळी स्मारक, पुणे.
स्वदेशी आंदोलनात विद्यार्थ्यांची भूमिका ठरवण्यासाठी त्यांनी पुण्यात सभांचे आयोजन केले. १ ऑक्टोबर १९०५ रोजी सायंकाळी सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात एक सभा घेतली. साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्या सभेत सावरकरांनी “परदेशी कपड्यांची सार्वजनिक होळी” करावी अशी कल्पना मांडली. लोकमान्य टिळक त्यावेळी पुण्यामध्ये नसल्याने काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांनी या विचारांना दुजोरा देऊन टिळकांशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा असे ठरले. पुढे चर्चा करताना टिळकांनी सुचवले की अर्धी गाडीभर तरी विदेशी कपडे जमा व्हायला हवे नाहीतर नुसता पोरकटपणा होईल. यावर सावरकरांनी ओंकारेश्वर आणि महाराष्ट्र विद्यालय येथे २ सभा घेतल्या.
७ ऑक्टोंबर १९०५ विजयादशमी, या दिवशी एका अनोख्या होळीची तयारी सुरू झाली. दसऱ्याच्या दिवशी गाड्यांवर विदेशी कपड्यांचा ढीग रचला. त्यावर गुलाल, फुलं उधळून तो गाडा आणि वाद्य व हजारोंचा जमाव अशी मिरवणूक निघाली. काळकर्ते शि. म. परांजपे, भालाकार भोपटकर यांच्यासह निघालेली मिरवणूक चित्रशाळेशी आल्यावर त्यात लोकमान्य टिळक सामील झाले. लकडीपूलाच्या पलीकडे ही मिरवणुक पोहोचली. गाड्यावरील कपड्यांचा ढीग एका शेतात रचला आणि टिळक, परांजपे यांच्या स्फूर्तिदायक भाषणानंतर अखेर ही होळी पेटवली गेली.
ते होळीचे ठिकाण सध्याच्या विमलाबाई गरवारे शाळेच्या समोर एस. एम. जोशी पुलाच्या कोपऱ्यात आहे. कालांतराने त्या ठिकाणी एक अप्रतिम भित्तीचित्र तयार केले. त्यात अभिनव होळीचा प्रसंग रेखाटला आहे. बाजूलाच माहिती फलक आणि विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक व शि. म. परांजपे यांचे अर्धपुतळे उभारले आहेत. शेजारीच पुणे महानगरपालिकेने एक दुमजली सावरकर सांस्कृतिक भवन उभारले असून तेथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
अनादी मी । अनंत मी। अवध्य मी भला।। अस स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील दुर्दम्य इच्छाशक्तीचा संदेश देणार हे स्मारक आपल्याला प्रेरणा देत उभे आहे.
संदर्भ –
मुठेकाठचे पुणे : प्र. के. घाणेकर
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पत्ता :
https://goo.gl/maps/j9vPhgQWFMP1yWVp9
आठवणी इतिहासाच्या