महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,50,708

होट्टलचे शिल्पवैभव

By Discover Maharashtra Views: 2804 4 Min Read

होट्टलचे शिल्पवैभव –

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे. एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.होट्टलचे शिल्पवैभव.

मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्यार इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्यागचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.

मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.

पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्नच सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?

एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?

ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्यार मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.

आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्यांानी आधी पुढाकार घेतला पाहिजे.

मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.

होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्याय वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या.

श्रीकांत उमरीकर

Leave a Comment