महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,989

शहाजी राजांनी हत्तीचं वजन कसं केलं?

By Discover Maharashtra Views: 1675 5 Min Read

शहाजी राजांनी हत्तीचं वजन कसं केलं?

शहाजी राजे हे नाव घेतलं की काही लोकांच्या डोळ्यासमोर ‘आदिलशाहीचा’ एक इमानी चाकर उभा राहतो, पण ज्यांनी ससंदर्भ इतिहास अभ्यासला आहे अश्या लोकांना शहाजी राजे म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्याची’ पार्श्वभूमी तयार करणारा एक दूरदृष्टी, प्रभावी नेता डोळ्यासमोर येतो. शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी प्रोत्साहन, पाठींबा, संस्कार आणि ऊर्जा देणाऱ्या जिजाऊ आऊसाहेब जितक्या महत्वाच्या आहेत, तितकेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करावं यासाठी दूरदृष्टी ठेऊन त्यांना योग्य ते Foundation उभं करून देणारे, मूक राहूनही आपल्या कृतीतून शिवरायांना सतत पाठींबा देणारे शहाजी राजेही तितकेच महत्वाचे आहेत. अर्थातच स्वतःच्या आयुष्यात ‘स्वराज्य’ उभं करण्याचा प्रयत्न ज्या शहाजी राजांनी केला, आणि जरी ते या प्रयत्नात अपयशी ठरले असले तरी, त्यांच्यात एक मुत्सद्दी राजकारणी, शूर सेनापती, योग्य Calculation करून risk घेणारा नेता, संस्कृत पंडित, कला गुणांना वाव देण्याचा चोखंदळपणा तसंच पुन्हा पुन्हा अपयश येऊनही आयुष्यात खचून न जाणं, असे कित्येक गुण होते. या सर्व गुणांसोबत शहाजी राजांकडे एका लढवय्या सेनापती कडे नक्कीच असावं असं ‘व्यावहारिक चातुर्य’ अर्थात ‘Practical Intelligence’ होता. याची एक अपरिचित कथा आहे.

१६३३ मध्ये शहाजी राजांनी ‘स्वराज्य’ स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करताना, मूर्तिजा नावाच्या लहान मुलाला मांडीवर बसवून निजामशाही चालवायचा प्रयत्न केला. शहाजी राजे स्वतः मुख्य वझीर बनून शहाजहानला म्हणजे मुघलांना आव्हान देऊ लागले. अश्यावेळी आदिलशहाने शहाजी राजांनी थाटलेल्या या निजामशाहीला अधिकृत समर्थन द्यायचं ठरवलं. यासाठी या छोट्या मूर्तिजाच्या म्हणजेच निजामशहाच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला आदिलशहाने आपल्या एका मुख्य सरदाराला म्हणजे मुरार जगदेवांना आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. या समारंभाहून परत येताना नागरगावला मुरार जगदेव यांनी सूर्यग्रहणानिमित्त स्वतःची सुवर्णतुला अर्थात स्वतःच्या वजनाइतकं सोनं दान करणे, अश्वदान अर्थात घोडा दान करणे, होम हवन अन्नछत्र अशी कित्येक दानं करायचा घाट घातला. या समारंभाला शहाजी राजेसुद्धा उपस्थित होते. जवळ जवळ सगळा दानधर्माचा सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडला.

शेवटच्या दानाची वेळ आली जे होतं ‘गजतुला’ यात हत्तीच्या वजनाइतकं द्रव्य मुरारपंत दान करणार होते. उत्साहाच्या भरात मुरारपंतांनी ही सगळी दानं करण्याचा संकल्प तर सोडला पण गुजतुला हे दान करताना आता मुरारपंतांना प्रश्न पडला की हत्तीचं वजन करू शकू इतका मोठा तराजू कुठून आणायचा. मुरारपंतांसोबतचे सगळेच सरदार पेचात पडले. मुहूर्ताची वेळ जवळ येऊ लागली. मुरारपंतांना त्यांचे परममित्र शहाजी राजांची आठवण झाली. राजांच्या प्रसंगावधान आणि व्यावहारिक चातुर्याबद्दल पंतांना खात्री होती. मुरारपंतांची ही घेऊन समस्या घेऊन एक हुजऱ्या शहाजीराजांकडे आला. यावेळी शहाजी राजे भीमा इंद्रायणीच्या संगमावर उभे राहून निसर्गसौंदर्य न्याहाळत होते. राजांनी दोनच क्षण विचार केला स्वतःशीच हसले आणि हुजऱ्याला म्हणाले ‘मुरारपंतांना म्हणावं हत्ती घेऊन इकडेच म्हणजेच नदी काठाजवळ या’ पंतांना शहाजी राजांचा निरोप मिळाला, राजांच्या डोक्यात काय कल्पना आहे हे कळलं नाही पण पंतांचा राजांवर विश्वास होता. पंत हत्ती घेऊन शहाजी राजांजवळ पोहोचले तोपर्यंत राजांनी हातात एक गेरू चा दगड म्हणजे खुणा करण्यासाठी वापरायचे तो दगड घेतला होता.

पंतांना आणि इतर सरदारांना अजूनही शहाजी राजांच्या डोक्यात काय कल्पना आहे ते कळेना. सगळेच उत्साहाने राजे पुढे काय सांगतायत त्याची वाट बघू लागले. राजांनी एक रिकामी नाव मागवली आणि मुरारपंतांना म्हणाले ‘पंत हत्ती नावेमध्ये चढवा’. जसा हत्ती नावेवर चढला तशी नाव पाण्यात आणखी खोल जाऊन नावेबाहेरची पाण्याची पातळी वाढली. राजांनी लगेच पाण्याच्या पातळीपर्यंत गेरूच्या दगडाने खूण केली. राजांनी हत्तीला नावेबाहेर काढायला सांगितलं आणि हसतमुखाने पंतांना म्हणाले ‘पंत या खुणेपर्यंत नाव परत पाण्यात बुडेल इतकं द्रव्य नावेत घाला की झाली तुमची ‘गजतुला”. मुरारपंत हर्षोल्हासाने आणि अचंबित होऊन राजांकडे पाहतच राहिले.

अश्याप्रकारे आपल्या व्यावहारिक चातुर्याची चुणूक दाखवून शहाजी राजांनी मुरारपंतांचा दानधर्माचा संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. स्वतः शहाजी राजांनीसुद्धा त्यांची सुवर्ण आणि रौप्य तुला करवून दानधर्म केला. शके १५५५ श्रीमुख नाम संवत्सरे, भाद्रपद वद्य अमावास्येला म्हणजे २३ सप्टेंबर १६३३ ला हे तुलादान नागरगावला करण्यात आलं. या ‘तुळादानामुळे’ या गावाचं नाव ‘तुळापूर’ ठेवण्यात आलं. अशी ही शहाजी राजांच्या व्यावहारिक चातुर्य आणि प्रसंगावधानाची चुणूक दाखवणारी छोटीशी गोष्ट, तुम्हाला नक्कीच आवडली असावी. धन्यवाद.

टीप: काही इतिहासकारांच्या मते ही दंतकथा आहे, पण Practically विचार करता ‘श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र’ या बखरीतली ही गोष्ट शक्य आहे.

हा लेख व्हिडिओस्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

संदर्भ:
१. श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
२. बसातीनुस्सलातीन
३. श्री राजा शिवछत्रपती

Leave a Comment