महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,337

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला ? भाग १

By Discover Maharashtra Views: 18563 6 Min Read

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला ? भाग १

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.

केवळ ५० वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बखरी मधले आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत तर काही इंग्रजांनी लिहिलेले आहेत. मात्र या पुराव्यांमधून केवळ २ प्रकारची माहिती पुढे येते. एक म्हणजे ज्वर झाला होता अशी जी बहुतांश पुरावे थोड्या फार फरकाने सांगतात आणि दुसरी म्हणजे विषप्रयोग झाला अशी. यांमुळे या सर्व पुराव्यांची चिकित्सा करणे हे फार महत्वाचे ठरते. आपण प्रथम एका खाली एक लिखित पुरावे काय सांगतात ते पाहू म्हणजे त्यानंतर आपल्याला निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

  • १. सभासद बखर-

कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या सल्लागाराने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिली. हा सभासद महाराजांच्या पदरीच कामाला असल्याने त्याने लिहिलेल्या बखारीची विश्वासार्हता ही इतर अनेक बखरीपेक्षा कैक पटीने जास्त आणि सर्वमान्य आहे. सभासद असे सांगतो की, “मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.”

सभासद पुढे कुणा कुणाला बोलावले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. ” बितपशील- कारकून – निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत [हे] जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक – हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ.” या सर्व जाणत्या माणसांना राजांनी काही उपदेश केला, “त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले [होते] की ‘तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे. म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे.” राजांचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो.

  • २. याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात  सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंगलीश रेकॉर्ड्स मधील २८ एप्रिल १६८० रोजीचे हे पत्र, हे पत्र समकालीन आहे.

“Wee have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased, it’s said of a bloody flux, being sick 12 days. How affaires goes in his country wee shall advise as comes to our knowledge. At present all is quiett, and Sombajee Rajah is at Pornollah.”

  • ३. जेधे शकावली

जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे,

“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला”

  • ४. मराठ्यांची बखर- ग्रांड डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन

डफने ही बखर अनेक पत्रांचा आधार घेऊन लिहिली असल्याने अनेक जण याचा संदर्भ ,म्हणून वापर करतात परंतु ही तितकी विश्वासार्ह नाही. डफ म्हणतो,

“यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा, शिवाजी रायगडी असतां त्याला गुढघी म्हणून रोग झाला. तो प्रतिदिवशी वृध्धींगत होत चालला. मग त्याच्या योगेकारून मोठा ज्वर झाला. ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.”

  • ५. श्रीमंत महाराज भोसले (शेडगांवकर) यांची बखर- मराठी रुमाल भाग १

“शके १६०२रौद्रनाम संवत्सरे फसली सन १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.”

संदर्भ साधने-

  • १. एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
  • २. सभासद बखर- कृष्णाजी अनंत सभासद
  • ३. मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
  • ४. जेधे शकावली
  • ५. शिवकालीन पत्रसारसंग्रह
  • ६. English records on Shivaji
  • ७. History of Aurangzeb (vol. IV, southern India 1645-1689) -Sir Jadunath Sarkar
  • ८. History of the Marathas-Grant Duff (मराठी अनुवाद- कॅ.डेव्हीड केपन साहेब)
  • ९. Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci
  • १०. मासिरे आलमगिरी – साकी मुस्तैदखान

माहिती साभार:- © 2017, Shantanu Paranjape

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment