महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,028

गौतमाचा बुद्ध कसा झाला याची कथा

Views: 1555
12 Min Read

गौतमाचा बुद्ध कसा झाला याची कथा –

सिध्दार्थ गौतम यांच्या बद्दल इतके लिहिले तरी मी का कशासाठी लिहिते आहे? कारण एक प्रश्न मला सतावतो तो म्हणजे गौतम हा एक शाक्य कुळातील शुध्दोधन याचा पुत्र होता. तो राजा होता की नाही की गणप्रमुख होता, या वादात न पडता बुद्ध किंवा तथागत होतो, हा प्रवास, एक माणूस म्हणून कसा झाला? शुध्दोधन स्वतः शेती नांगरत असे आणि जांभळाच्या झाडाखाली गौतम ध्यान करत असे, असे उल्लेख बौध्द साहित्यात येतात, म्हणजे लहानपणापासून ध्यानधारणा करत असे हे लक्षात येते.गौतमाचा बुद्ध कसा झाला?

धर्मानंद कोसंबी यांच्या “बुध्दचर्या” या पुस्तकात बुद्ध साहित्याच्या आधारे बुध्द चरित्राचा वेध घेतला आहे. त्यातील अतिरिक्त महात्म्याचे पुटं कोरून काढून गौतमांचा बुध्दापर्यतचा प्रवास सविस्तर मांडला आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर, गणराज्ये आणि नगरराज्ये नष्ट होऊन एकाधिकारशाही म्हणजे राज्यव्यवस्था उदयास येत होती आणि प्रत्येक राजाला साम्राज्य उदयास आणण्यासाठी, सम्राट होण्याची घाई झाली होती. म्हणजे एका अर्थाने राजकिय धामधुमीचा काळ होता.

महापरिनिर्वाण सुक्तात, पिपलीवन येथे मौर्य कुळाची बुध्द अनुयायी लोकांनी, त्यांना बुध्दांच्या अस्थिकलशाचा कमी भाग मिळाला, अशी तक्रार केली, असा उल्लेख आहे, कदाचित त्या काळात तो लहान कमी महत्त्वाचा गट असावा. नंतरच्या काळात चंद्रगुप्त मौर्य हा सम्राट राजा याच कुळातील झाला आणि त्याचा नातू अशोक यांची आई सुद्धा मौर्य कुळातील होती. गौतम हे सुद्धा याच कुळातील वाक्य गणाचे होते असे समजले गेले. (त्यांच्या बद्दल तज्ञांत बरेच वाद आहेत त्या वादात न पडता )

बौध्द साहित्यात अजून एक महत्वाचा उल्लेख येतो तो म्हणजे या गणांची सभा होत असे आणि त्या सभागृहाला संथागार असे म्हणत. या गणसंस्थेचे महत्त्वाचे कार्य या संथागारात होत असत. मल्ल्या आणि लिच्छवी या गणांच्या ही संथागारांचा उल्लेख येतो. काशी, कोसल, वज्जी, लिच्छवी ,मगध कपिलवस्तू अशी संमिश्र नगरराज्ये, गणराज्ये आणि मगध आणि कोसल यासारखी राज्यव्यवस्था जी आपला पसारा वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते.अजातशत्रू याचा वज्जी विरोधात यांचे कारण बौध्द साहित्यात दिसत नाही तरी जैन साहित्यात दिसते.

तसेच कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रात स्वतंत्र गण सैनिकी बळाने नष्ट करायला कठीण असते, तसेच त्यांच्यासाठी लोकसत्ता ही राज्यसत्तेला नष्ट करणे धोक्याचे आहे. असे प्रतिपादन केले आहे. खरं तर या काळात मुख्य लढाई कोसल आणि मगध यांच्यात होती पण दोघांनी एकाच वेळी गणांशी लढले. गणराज्यांना कमकुवत करत आपल्या राज्याला जोडीत.

गौतम बुद्ध जिवंत असतानाच कोसलांनी शाक्यांवर हल्ला करून प्रचंड नरसंहार केला, अगदी बायकामुलांसकट कत्तल केली. पण कारण सांगताना प्रसेनजीत राजाने वाक्य कन्येला मागणी घातली आणि शाक्यांनी नकार दिला हे कारण सांगितले जाते, एवढातेवढ्यावरून नरसंहार करायला ते इतके मुर्ख नव्हते, मुख्य उद्देश हा प्रदेश जिंकून घेणे हाच होता, या युध्दखोरीमुळे जनसामान्यांच्या जीवनात बरेच बदल झाले. मोठ्या सैन्याची आवश्यकता पडायला लागली, सैन्याचे स्वरूप बदलले आणि गणांचे स्वातंत्र्य गेले, म्हणजे गणराज्यात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली बदलली, या अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी ती प्रजा तयार नव्हती आणि अवरोध निर्माण झाला असावा. कारण साहजिकच आहे, एकाधिकारशाही आली की, मग स्थानिक सैन्याची जागा राजसैन्याने घेतली. मोठे सैन्य, अधिकारी, पगार आणि मग लोकांवर कराची सक्ती आली, युध्दाचा भार हा प्रजेवर आला. या कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे बोलकी आहे, “बली पतीग्गहकार, निग्गहाकार( torturer) ,बलीसाधकस, ” असे उल्लेख जातककथात येतात.

साहजिकच या बदलत्या परिस्थितीचा परिणाम होऊन एक निराशावादी विचार जन्माला आलेले दिसतात. नियतीवाद हा त्याचेच फळ आहे असे काहींना वाटते.  या काळात धार्मिक आणि वैचारिक दृष्टिकोन काय होते? याचा विचार केला तर वैदिक आणि श्रमण संघ परंपरा मुख्य परंपरा दिसतात. त्यातील वैदिक परंपरेतील उपनिषदांनंतरचा हा काळ मानला तर एक वैचारिक मंथन सुरू होते हे लक्षात येते. यातील तत्वज्ञानाचे आस्तिक आणि नास्तिक दर्शने उदयास येत होती आणि वैदिक कर्मकांडे नाकारणारी मोठी असंतुष्ट विचारवंतांची संख्या बरीच होती हे लक्षात येते. रानडे आणि बेलवलकर यांच्या मते, भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करतांना, बुध्दपुर्वकाळातील सुरवातीच्या तत्वज्ञान जे जैन साहित्यात विखुरलेले साहित्यात आहे, त्याकडे दुर्लक्ष झाले, त्यात सुत्रकृतांग, स्थानांग, आचारांग, नंदीसुत्र, गाम्मातसार( दहाव्या शतकात आचार्य नेमीचंद सिध्दांत चक्रवर्ती प्राकृत मधील यातील कर्मस्कंद), ज्यांत चार मुख्य भाग होते, क्रिया योग, अक्रियायोग, अज्ञानवाद, आणि विनयवाद होत. जी आगमग्रंथ होती आणि अशी एकूण ३६३ मते प्रचलित होती आणि ती भगवान महावीर यांना अवगत होती. असे संदर्भ मिळतात जरी ती महावीरांचे गौरवगान करण्यासाठी वापरली असली तरी त्या काळात ती अस्तित्वात होती हे मानायला काही हरकत नसावी.

बुद्धाच्या काळात अजून एक श्रमण संघाचा उल्लेख मिळतो, “यानि च तीठी,यानि ची सट्ठी ‘ तीन आणि साठ म्हणजे ६३ मते असलेली श्रमण संघ अस्तित्वात होते. अर्थातच ही श्रमण परंपरा ही वेगळी आणि विशेष होती. हिचे उल्लेख बौध्द साहित्यात दिघ्घनिकायातच मिळतात. श्रमण म्हणजे श्रम करणारे, अब्राह्मणी, वैदिक परंपरेपासून दूर राहिलेले अनार्य समजले गेले, आजिविक, चार्वाक, लोकायत, जैन, अज्ञानवादी या परंपरा बुध्दपुर्वकाळापासून अस्तित्वात होत्या यांचे उल्लेख बौध्द साहित्यात समन्नफलसुक्तात येतात. त्यांना संबोधल्या जाणाऱ्या शब्दांत ” गणचरियो” म्हणजे शिक्षक,” सिरापाब्बाजीतो म्हणजे परत सांगणारा, यसरसी, नेतो, संघगणी म्हणजे प्रमुख असे वर्णन केले आहे.

यात आधीच्या काळातील पण जेष्ठ समकालीन सहा विचारवंतांचा उल्लेख मंजिमानिकायात आहे,

” येते भो गौतम समण ब्राम्हण संघिनो गणिनो गणचरिया त्याचा यसस्सिनो चित्रकला साधुसम्मता बहुजनस्य, सेय्यथीवं पूरणो कस्सपो, मख्खलि गोसालो, अजितो केसकंबलो, पकुधो काच्चायनो, संजयो बेलट्ठपुत्तो”।

जी बुध्दाला समकालीन व बुध्दांपेक्षा वयाने मोठी आहे, यातील पुरण कश्यप हा अक्रियावादी, मंखली गोसाल हा आजिविक आणि नियतीवादी, अजित केसकांबळी हा लोकायतवादी, उच्छेदवादी, पकुध कात्यायनाच्या संशय वादी तर निग्रंथ नातपुत्ता म्हणजे जैन महावीर तर संजय वेठलीपुत्त हा अज्ञेयवादी होते.

या सगळ्या राजकीय गोंधळात हा वैचारिक गोंधळ होता. घरातून बाहेर पडल्यावर गौतम आधी

आलार कलाम यांचेकडे ध्यानाचे सात प्रकार शिकायला गेला, काही अभ्यासकांच्या मते आलाम हा सांख्य विचारांचा आचार्य होता तर काहींच्या मते ध्यानधारणा शिकवत होता आणि कपिलवस्तूलाच रहात होता,गौतम आधीपासूनच त्यांचेकडे ध्यानमार्ग शिकत होता पण शिकल्यावर ही त्याचे समाधान झाले नाही, म्हणून मग रामपुत्ताकडे ध्यानाचा आठवा प्रकार शिकायला गेला, परत शिकल्यावर उरूवेल येथे तपश्चर्या केली, या तपश्चर्येचे तपशीलवार वर्णन धर्मानंद कोसंबी यांनी बुध्दचर्या या पुस्तकात केले आहे.(गौतमाचा बुद्ध कसा झाला याची कथा)

या आधीच्या श्रमण परंपरेत अहिंसा हे तत्व असल्याचे लक्षात येते, कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नये, कष्ट देऊ नये, वगैरे सारखे नियम दिसतात, या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात राहून ज्ञानसाधना करण्याची पध्दत प्रचलित दिसते. तपश्चर्या ही एकेकट्याने किंवा एकत्र संघात करावी, असे अनेक संघ होते, काही पाचशे पाचशे शिष्य असलेले संघही होते. यात हठयोग, ध्यानमार्ग, राजयोग या वेगवेगळ्या पायऱ्या होत्या. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मग गौतम तपश्चर्या केल्यानंतर मारयुध्दांचा म्हणजे मनातील विकारांविरोधात वाढल्यावर गौतम हे बुद्ध झाले. खरंतर ही देह आणि मन यांच्या सखोल मंथनातून आलेली पायरी आहे.

अश्वघोष या इसवीसन पुर्व दुसऱ्या शतकातील कविच्या “बुध्दचरीत” या दिर्घकाव्यातून ही माहिती मिळते. तसेच विशुध्दीमार्ग समजतो. चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाचा उद्घोष होतो. दुसरा कवी आणि अनुयायी नागार्जुन यांच्या ” माध्यमककारिका” मधून “प्रत्युत्तसमुत्पाद” समजतो.

चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग, बहुजनां हीतासाठी धर्मप्रसार ही मोठी क्रांती करू शकले, कदाचित ही ज्ञानाची आणि ध्यानाची शक्ती आहे.

थाॅमसेन जरी म्हणत असले की, “कुटुंब आणि ईश्वर खाजगी मालमत्तेच्या बाबतीत हातात हात घालून असतात” तरी गौतम बुद्ध संघाच्या माध्यमातून ईश्वराविना धर्म तत्वज्ञान प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले.

असे कुठले प्रश्न गौतमाला पडले होते की ज्यांची उत्तरे वैदिक,उपनिषधांतील तसेच सहा श्रमण परंपरेत नव्हते, याचा विचार केला तर कदाचित तत्कालीन राजकीय परिस्थितीचा आणि धार्मिक परिस्थिती तसेच गौतमाला आलेल्या विरागी भावनेत होते का? तसेच शाक्य गणाचे इतर गणांशी वैवाहिक संबंध नव्हते मग गौतमाची आई ही कोलीय गणांची होती, असे परस्पर विरोधी बाबी बुचकळ्यात टाकतात.

शुध्दोधनाने गौतमाला आठ वर्षांचा असतांनाच सब्बामित्र यांचेकडे भाषा आणि व्याकरण यांचे शिक्षणासाठी पाठवले जे वेद,,, उपनिषदे आणि वेदांग यात पारंगत होते. वयाच्या २८ व्या वर्षी प्रवज्जा घेतली असे म्हटले जाते.

या सर्व गोष्टींचा विचार करताना मध्यममार्ग काढून, वास्तविक स्वरूप दिले जे माणूस करू शकत होता या निव्वळ संकल्पना नव्हत्या.

राहुल सांकृयायन यांच्या बौध्द दर्शन यात जे त्रिपिटकांवर आधारित आहे त्यात ते शरीर आणि मन म्हणजेच आत्मा होय. गौतम बुद्धाच्या मुळ विचारात ईश्वर ही माणसाची मानसिक सृष्टी आहे. मनापेक्षा आत्मा नावाचे काही नाही. मन,चित्त, विज्ञान,आत्मा ही सगळी एकच आहे आणि तेच ग्रहण ,चिंतन, आणि निर्णय यांचे कार्य करते. १ ईश्वराला न मानणे, मनुष्य हा स्वतः आपला मालक आहे.

२. आत्म्याला नित्य न मानणे,

३. कुणालाही ग्रंथ प्रमाण न मानणे, अन्यथा अनुभव आणि बुध्दीची प्रामाणिकता जाईल. याला क्षणिक अनात्मवाद म्हणता येईल.

४ जीवन प्रवाहास शरीरापुर्वी आणि मृत्यू नंतर मानणे हे अस्विकारणीय आहे. ५. आत्मा आणि मन एकच आहे आणि क्षणाक्षणाला बदलत आहे. शरीर आणि मन मिळून आत्मा होतो.

बुद्ध दर्शनात दुःख, दुःखाचा हेतु, दुःखाचा निरोध, विनाश, दुखनिरोधाचा मार्ग, दार्शनिक विचारांत अनित्य, दुःख,अनात्म या बाबी ज्याला क्षणिकवाद म्हटले गेले यात स्कंद, आयतन (१२), धातु या बाबींचा समावेश आहे तर ६. रूप, वेदना,संज्ञा,संस्कार,विज्ञान या होय.

७. इंद्रिय धर्म आणि मन, इंद्रियांचे वेदना,संज्ञा आणि संस्कार तर इंद्रियांचे विषय यात रुप, शब्द,गंध,रस,स्पष्ट‌‌व्य, धर्म येथे स्वभाव होय, हे येतात.  ८. धातु ,सर्व आहाराचे निदान,कारणे, तृष्णा, वेदना,स्पर्धा होय.

प्रतित्यसमुत्पाद म्हणजे नेमके काय? याला एका अर्थाने क्रांतिकारक सिध्दांत म्हणायला हवे कारण क्षणिकवाद, कार्यकारणभाव आणि विद्या यांचे बारा अंग आहे. त्या बारा विद्या म्हणजे अविद्या, संस्कार, विज्ञान,नामरूप आणि इंद्रिये यात सहा आयतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, आणि ग्रहण करण्याची क्षमता ती म्हणजे उपादान, भव म्हणजे आवागमन, विभव म्हणजे प्रतिबिंब, जती म्हणजे जन्म आणि जरामरण  होय.बुध्द दार्शनिक संप्रदाय तयार झाले आणि ही ज्ञानाची परंपरा अडीच हजार वर्षे अखंडपणे चालू आहे.

आंबेडकर यांच्या बुद्ध आणि धम्म यात त्यांनी काही जनमानसात रूजलेल्या बौध्द धर्माचा आढावा घेतला आहे त्यात पहिले प्रतिपादन करतात ते म्हणजे बुद्धांचा धम्म हा तथाकथित धर्म या संकल्पनेपेक्षा वेगळा होता, कसातर त्यात वास्तविक शक्यता होत्या. कुठल्या ही धर्माचे ज्ञान आणि मौलिकता आणि वाईट शक्तींचा नायनाट हे संभव गोष्टी आहेत. माणसांच्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करून ज्ञानप्राप्ती तसेच निर्वाण म्हणजे दुःखा तून सुटका शक्य आहे. मुर्खपणा आणि आंधळा विश्वास यास छेद देण्यासाठी चिकित्सा ही जरूर आहे. बुद्ध म्हणजे तर्कशुद्ध विचार आणि तर्कसंगती यांचे समर्थक होते.

आंबेडकर यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले ते म्हणजे गौतमाने बघितलेले चार जीवनाविषयी चे प्रसंग आणि आलेली विरक्ती हे ते फेटाळून लावतात.आणि २९ व्या गौतमाने घेतलेली परिव्रजा, दुसरा प्रश्न म्हणजे आर्यसत्ये हे खरोखरच बुद्धांची शिकवण आहे का? ही सुत्रे बुद्ध यांच्या खऱ्या विचारांचा पाया ढासळवतात असे त्यांना वाटते कारण प्रत्येक गोष्ट ही दुखांत आहे तर मग ना तत्वज्ञान ना धर्म माणसाला मदत करीन, सुखाने जगण्यासाठी म्हणून यांनी मोठा अडथळा निर्माण झाला आहे असे आंबेडकर यांना वाटते, तिसरी बाब आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तिघांना बुध्दांनी नाकारलेले आहे.

क्रमश: गौतमाचा बुद्ध कसा झाला.

संदर्भ:
बुध्दचर्या, धर्मानंद कोसंबी
लोकायत, देवीप्रसाद चटोपाध्याय
हिस्ट्री ऑफ इंडियन फिलोसोफी, रानडे आणि बेलवलकर
बुध्द दर्शन, राहुल सांकृयायन
बुध्द आणि धम्म, बाबासाहेब आंबेडकर

@सरला भिरूड

Leave a Comment