महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,750

कंटाळलेल्या जिंदगीची व्यथा दर्शविणारी कादंबरी “हूल’ !

By Discover Maharashtra Views: 3915 4 Min Read

कंटाळलेल्या जिंदगीची व्यथा दर्शविणारी कादंबरी “हूल’ !

हूल ही भालचंद्र नेमाडे यांची चांगदेव चतुष्ट्यमधली दुसरी कादंबरी आहे.1975 मध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या बिढार आणि हूल या दोन कादंबऱ्या आल्या. भालचंद्र नेमाडेंच्या लिखाणात महानुभाव शैलीचा प्रभाव जाणवतो.अगदी दिलीप चित्रेही हूलबद्दल बोलताना म्हणतात, “नेमाडेंची ही मेटॅफिझिकल वृत्ती आणि त्यानं निर्माण केलेल्या चांगदेव पाटील ह्या प्रमुख पात्राचा संसारापासून अलिप्त राहून संसाराचा सर्वव्यापीपणा कधीच नजरेआड न करणारा पारमार्थिक दृष्टिकोण ध्यानात घेणं अटळ आहे. यावरूनच एकंदरीत नेमाडेंच्या लिखाणाबद्दलची वाचकांना असलेली आवड कळते.

बिढारपासून पुढे हूल कादंबरी सुरू होते.बिढार कादंबरीच्या शेवटी चांगदेव पाटील मुंबई सोडत असतो.नाम्या त्याला रेल्वेस्टेशनवर सोडायला येतो.मुंबईच्या गर्दीत वैतागलेला अस्वस्थ झालेला चांगदेव शांती,समाधान मिळवत आयुष्य जगण्यासाठी एका गावात प्राध्यापकीसाठी रूजू होतो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने हुल सुरू होते.स्थलांतराचं वैताग जीवन,त्यातून परत असुरक्षितता, अपेक्षाभंगामुळे आलेलं नैराश्य यातून जाताना चांगदेवचा प्रवास कोणत्या दिशेने होतो याचं सुंदर चित्रमय वर्णन ,कथात्म आणि आशयपातळीवरही समृद्ध असणाऱ्या हूलमधून येतं.

गावात स्थायिक झाल्यावर चांगदेवला पवार,आझम,शबीर,पाचलेगावकर,झोपे,गायकवाड, पारू सावनूर यांसारखे अनेक मित्र, चांगली माणसे मिळाली पण आत्मपरीक्षण करता करता आणि स्वतःशी संवाद साधताना जी पोकळी होती ती तशीच राहिली.त्याचा एक पात्र म्हणून अंगी असणारा उपरेपणा कायम राहिला.बिढारमध्येही तो मुंबईसारख्या मोठ्या शहरात साहित्याला आलेल्या धंदेवाईक, बाजारू स्वरूपाला वैतागला होता आणि ईथे तो गावात जातिधर्मावरून ,गावगाड्याच्या राजकारणावरून प्रचंड अस्वस्थ होतो.मग कथेत प्रत्येक पात्रांच्या जातीय अस्मितेची भावनिक मतं,विचारही येत राहतात.
प्रेमाच्या बाबतीतही चांगदेव बराचसा ईनसेक्युअर आहे. आतल्या माणसाचा मृत्यू व्हावा एवढा वाईट भवताल असताना चांगदेवने खोलात जाऊन घेतलेला स्वः चा शोध त्याला पारूपासून दूर घेऊन जातो.परिणामी चांगदेव कोणत्याही एका टोकापर्यंत जाऊ शकत नाही. चांगदेवची आध्यात्मिक वृत्ती आणि दि.पु.चित्रेच्या मताप्रमाणे त्याचे एक पात्र,स्थळ,घटना म्हणून अपरिहार्य तपशील जरी ऐहिक आणि जडाच्या पातळीवरील असले तरी त्यांचा आशय आध्यात्मिक आहे.

पारूबद्दलचं सहानुभूतींनी भरलेलं प्रेम व्यक्त करताना कादंबरीत चांगदेव म्हणतो ,”सौंदर्य म्हणजे केवढी जोखीम असते हे एकदा कळलं आणि तिचं हसू संपलं.सुंदर लोकांची दुःखं अशी वेगळीच असतात.त्यामुळेच आपोआपच त्यांना यातना सहन करण्याचं मोठेपण प्राप्त होतं.’ एकूणच जीवनाच्या कथेचं बोजड कथात्म तपशील देऊन लेखक पाने भरवत नाही तर घटनांमागचा अर्थ ,त्यामागचा अर्थ,त्यामागचं तत्वज्ञान, कार्यकारणभावही आपल्यासमोर आपल्या खास नेमाडे शैलीत नेमाडे करतात. चांगदेवच्या बारीकसारीक कृतीचं अगदी बारकाव्यानं आणि चित्रमय वर्णन,निवेदन केलेलं आपल्याला आढळून येतं.

कोसला,बिढार या कादंबऱ्याप्रमाणेच नेमाडेंच्या या कादंबरीत एका बाजूला तणावाच्या छायेत बंदिस्त झालेलं जीवन दिसतं तर दृष्यंत कुमारच्या कवितांप्रमाणेच आयुष्य चालत राहतं,आयुष्याचं निरंतर सुरू राहणं,मनात आशेचं जिवंत राहणं हे विचार दिसून येतात.
एकटेपणामुळे स्वातंत्र्याचं भणंगपणात,उद्ध्वस्तपणात झालेलं रूपांतर आणि पराकोटीची हतबल परिस्थिती या दोन गोष्टी कादंबरीत ठळकपणानं अधोरेखित झाल्या आहेत.कॉलेजमध्ये प्राध्यापकी करताना तिथे सुरू असणारं पदासाठीचं राजकारण, उच्चशिक्षित तरूणांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली बेरोजगारी, अभिजन वर्गाने आणि बहुजनवर्गाने स्वतःपुरत्या बनवलेल्या आयडिओलॉजी हे सर्व हूलमध्ये दिसत राहतं.
कादंबऱ्या बदलतात पण पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव पाटील या दोन्ही पात्रांबद्दल आपला जिव्हाळा कायम राहतो. किंबहुना या दोन्ही पात्रांमध्ये असणारा बराच सारखेपणा वाचकाला भावतो.पण गर्दीतही एकटं राहणं किंवा त्यापेक्षा आपण एकटं पडणं म्हणू अधिक संयुक्तिक वाटेल.ते ईथे व्यवस्थित दर्शवलं गेलंय.

जसंजसं माणसाचं स्थलांतर होतं,अर्थार्जनासाठी प्रयत्न सुरू होतात तसंतसं त्याच्यातला उपरेपणा वाढतो.मग त्यातून गायकवाडसारखं पैसा वगैरे असूनही समाधान नसणारं आणि आपल्या भावनिक- मानसिक गरजा न भागलेल्यांचा,चांगदेवसारख्या ‘फाईडिंग नेवरलँड’ प्रकारचं शोधत राहणाऱ्याचा,पारूसारखं आयुष्यात लग्नातून जम बसवू पाहणाऱ्याचा ,पवारसारखं फक्त मित्राची सोबत न लाभलेल्यांचा आपोआप गट पडत जातो.माणसाच्या ह्दयाचा एक कोपरा सर्वाचा रिकामा असतो.आपण जसंजसं त्यात झाकून बघण्याचा प्रयत्न करू तसंतसं त्यातून सांगवीकर ,चांगदेवसारखी वैचारिक माणसं जन्म घेतच राहतील.
एकूणच हूल कादंबरी खास नेमाडे शैलीतली,नेमाडे वळणावरची आणि नेमाडे विश्वाचं सखोल दर्शन घडवणारी आहे.ती वाचकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते.जरीही मधला काही भाग कंटाळवाणा वाटत असला तरीही तो अल्पसा भाग कथेची गरज असून तिथेही आपल्यापुढं बोलकं होऊन संवाद साधायचा अधिकाधिक प्रयत्न नेमाडे करतात.सर्व दृष्टींनी वाचकांना नेमाडेमय करणारी ही कादंबरी सत्तरीच्या दशकातलीच नव्हे तर समकालाशीही उत्तम संवाद साधणारी कादंबरी ठरते.

माहिती साभार – Rushikesh Telange

सहकार्य आणि आभार – मराठी पुस्तकप्रेमी फेसबुक ग्रुप

Leave a Comment