महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,02,644

हुतात्मा राजगुरू वाडा, पुणे

Views: 2678
4 Min Read

हुतात्मा राजगुरू वाडा, पुणे –

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पहिला तर, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खूप लोकांना बलिदान द्याव लागले. ते आपल्याला सहजासहजी मिळालेल नाही, अनेक क्रांतिकारकांनी त्यासाठी आपले प्राण हसत हसत अर्पण केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे त्रिकुट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील तीन अनमोल रत्ने होती. त्यातल्याच हुतात्मा शिवराम राजगुरू यांच्या जन्म गाव खेड चे नाव बदलून राजगुरुनगर केल.(हुतात्मा राजगुरू वाडा, पुणे)

१६ व्या शतकातले कचेश्वर ब्रह्मे हे चाकणचे रहिवासी राजगुरू घराण्याचे संस्थापक. नामवंत संतकवी म्हणून त्यांचा आदराने उल्लेख होई. शंभूपुत्र छ. शाहूराजे यांचा ताराराणीशी राज्यासंबंधी बेवनाव चालू होता. शाहूराजे या कचेश्वरांच्या दर्शनाला गेले. कचेश्वरांनी त्यांना “यशस्वी भव” असा आशीर्वाद दिला. त्यानंतर खेडला झालेल्या लढाईत छ.शाहूराजांना विजय मिळाला. त्यामुळे वाचासिद्धी असलेल्या कचेश्वरांना त्यांनी राजगुरू म्हणून नेमले. त्यांना काही गावे इनाम करून दिली आणि खेड येथे एक वाडा बांधून दिला. चाकणचे कचेश्वर ब्रह्मे आता खेडमध्ये येऊन राहू लागले. त्यांच्या पुढच्या काही पिढ्यांनंतर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा २४ ऑगस्ट १९०८ म्हणजे श्रावण वद्य १३ शके १८३० रोजी या वाड्यात जन्म झाला.

राजगुरू यांचे शिक्षण प्रथम पुणे आणि नंतर वाराणसीमध्ये झाले. वाराणसीमधल्या त्यांच्या वास्तव्याच्या काळात सचिंद्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते इ.स. १९२४ साली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये सामील झाले. या संघटनेचा मुख्य उद्देश हा देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देणं होता. संघटनेच्या कार्यकालादरम्यान  राजगुरू यांनी पंजाब,लाहोर, आग्रा आणि कानपूर सारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन लोकांना संघटित करून त्यांच्यात क्रांतीची मशाल पेटवण्याचे काम केले. अहिंसेच्या मार्गाने ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. परंतु लाला लजपत राय यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांचा हा लढा सशस्त्र बनला. लाला लजपत राय यांच्या मृत्युला कारणीभूत असलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट याला गोळी मारून ठार करण्याच्या उद्देशाने गेलेल्या भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी चुकीने स्कॉट ऐवजी सँडर्स याची हत्या केली. त्यानंतर ३० सप्टेंबर १९२९ ला नागपूरहून पुण्याला जात असताना त्यांना अटक झाली. लाहोर मध्ये या सर्व क्रांतिकारकांवर खटला चालवण्यात आला. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यावर सँडर्सच्या हत्येचे अपराधी असल्याचा निकाल देऊन त्यांना २३ मार्च १९३१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी लाहोर मधल्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली. हा दिवस आपण या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करतो.

अशा या देशभक्ताचे स्मारक पुण्याजवळच्या राजगुरुनगरमध्ये आहे. पुण्यापासून अंदाजे ४५ कि.मी. अंतरावर पुणे – नाशिक महामार्गावर चाकणच्या पुढे खेड पोलीस चौकीपासून डावीकडे एक रस्ता जातो. त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आपण हुतात्मा राजगुरू यांच्या जन्म स्थळापाशी पोचतो.९ ऑगस्ट १९९६ रोजी राजपत्राद्वारे हुतात्मा राजगुरूंचे वास्तव्य असले हा वाडा स्मारक म्हणून घोषित केला गेला. राजगुरूंच्या कर्तृत्वाला साजेशा अशा राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती केली जावी, अशी येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याची दखल घेऊन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने राजगुरूंचा वाडा हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. या राज्य स्मारकाच्या बांधकामास पुरातत्त्व विभागाकडून २००७ मध्ये सुरवात करण्यात आली.वाड्यातील देवघराची दुमजली इमारत संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बांधण्यात आलेली आहे. राजगुरूंचे जन्मस्थळ असलेल्या खोलीची सुद्धा डागडुजी करण्यात आली आहे.

संदर्भ:
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या  – श्री. प्र. के. घाणेकर
फोटो ५ : Wikipedia

पत्ता :
https://goo.gl/maps/8mYo9d1E7o5MieUf6

Leave a Comment