महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,945

हुजूरपागा, पुणे

By Discover Maharashtra Views: 1460 2 Min Read

हुजूरपागा, पुणे –

एच. एच. सी. पी. म्हणजेच हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, तथापि या शाळेला ‘हुजूरपागा’ या नावानेच ओळखले जाते. शैक्षणिक कार्याचा आपल्या नावाशी काहीही संबंध नसलेली ही कसली शाळा, असा प्रश्न तेथील विद्यार्थिनींनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही पडल्यास नवल नाही. परंतु गोष्ट खरी आहे. असे जगावेगळे नाव लाभणाऱ्या शाळेच्या आवारात पूर्वी पेशव्यांची अश्वशाला किंवा घोड्यांची पागा होती.

हजूर किंवा हुजूर हा फारसी शब्द, महत्त्वाची किंवा खास व्यक्ती या अर्थाने वापरात आहे. तसेच हुजुरात म्हणजे अशा खास व्यक्तीसाठी नेमलेले घोडेस्वारांचे पथक किंवा अंगरक्षक दल. त्या काळची पुण्यातील सर्वांत मोठी, महत्त्वाची खास व्यक्ती म्हणजे पेशवे. ऐतिहासिक पत्रव्यवहारांतून व कादंबऱ्यांतूनही त्यांचा उल्लेख ‘खाशा स्वाऱ्या’ असा केलेला आढळेल. पेशव्यांची हुजुरात काही दोन-पाच शिपायांची नसे. किमान दीड-दोन हजार स्वार तरी खाशा हुजुरातीत नेहमीच असत, लढाईवरही ही खाशी हुजुरात कायमच पेशव्यांच्या अवतीभोवती असे.

पेशव्यांचा मुक्काम पुण्यात असेल त्या वेळी जरी सर्व हुजुरात जवळ बाळगण्याची जरुरी नसली, तरी सात-आठशे घोडे तरी कायमच ठाणबंद असणार हे उघड होते. एवढ्या मोठ्या संख्येने घोडे बांधायला जागा, त्यांचे तबेले, गवताची साठवण, देखभालीची व्यवस्था याकरता जागाही मोठी व प्रशस्त असणे जरुरीचे होते. सगळाच पसारा शनिवारवाड्यात मावणे शक्य नव्हते.

प्रथमत: हुजूरपागा चिमाजीअप्पा पेशवे यांच्या ताब्यात आणि नंतर त्यांचे पुत्र व नानासाहेबांचे चुलत बंधू आणि पानिपतावर वीरमरण आलेले सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या अखत्यारीत असायची. पागेसाठी स्वतंत्र खाते केलेले होते आणि स्वतंत्र अधिकारीही नेमलेले होते. तसेच घोड्यांची निगा, खरारा, चारा-पाणी यांसाठी दीड-दोनशे माणसांची कायमस्वरूपी नेमणूक होती.

पेशवाईच्या अस्ताबरोबरच हुजुरांची हुकुमत संपली. हुजुरातीची गरज राहिली नाही. पागाही ओस पडली. तटबंदीचे कोंदण असलेल्या हुजूरपागेत झाडे-झुडपे वाढली.

ही जागा नुसतीच मोकळी ठेवणे उचित नव्हते. त्या जागी काहीतरी उपयुक्त काम चालावे या हेतूने इ.स. १८८४ मध्ये तिथे मुलींची खास शाळा सुरू झाली. ती जागा सरदार पटवर्धनांकडे होती. त्यामुळे त्यांचेच नाव शाळेला देण्यात आले.

या शाळेतील मुली आपल्या शाळेचे नाव भले एच.एच.सी.पी. हायस्कूल सांगोत, परंतु गेली दोन-अडीचशे वर्षं तरी ही जागा हुजूरपागा या नावानेच ओळखली जाते आणि ती ओळख पुढेही राहील.

संदर्भ –
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी.

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment