मी सह्याद्रीचा दगड
होय, मी सह्याद्रीतील एका गडकोटातला दगड बोलतोय. साधारण ४०० वर्षांपूर्वी मला खूप महत्व दिले जायचं. अगदी तुम्ही जशी देवाची पूजा करता, तशीच माझीही पूजा व्हायची. ती माणसं अजूनही आठवतात किती प्रेम करायची आम्हा दगडधोंड्यावर. त्यांची जिद्द , चिकाटी पाहून आम्हांसी हुरूप यायचा. तोफांचे कितीही गोळे आले तरी आम्ही गळू चिटकून बसल्यासारखे घट्ट बांधून राहायचो. हिंदवी स्वराज्याच्या या परम लौकिक राज्यात आम्हाला आमच्या मनाप्रमाणे श्वास घेत येत होते. पण आज आम्ही थकलोय अन शिनलोय या महाराष्ट्राला अन आमच्या जगण्याला. आमचे जोडीदारही आमची साथ सोडत आहेत. जीव नकोस झालाय. पाऊस , ऊन , वारा यापासून तर आम्ही जीव वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो पण या मानवजातीपासून कस वाचणार आम्ही..?? कसलेही अन कोणतेही लोक गडावर येतात आणि नको नको त्या गोष्टी घडतात, एखादं युगुल येत अन गडांच्या भिंतीवर मजकूर लिहीत बसतं. रोज ज्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहायचे सडे पडायचे तिथ आज ही अवस्था..!!
नाही पाहवत हि गोष्ट, त्यातूनही आम्हास जपणारे काही हात पुढे येतायत तर सरकार तेही हात बांधून ठेवत आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आम्ही होतो म्हणून तुम्ही आहात नसतो तर आज ही बाब ऐकायला मिळाली नसती अन तुम्हीही नक्की या जगात असता कि नाही माहित नाही. हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यापासून आम्हावरी झालेले घाव सोशीत आम्ही आजही उभे आहोत, आम्हाला उभारी देण्यासाठी त्या वेळी या सह्याद्रीतील असंख्य मावळे झटले आता ते त्यांचं कार्य करून निघून गेले, तुमचं कर्तव्य आहे की अजूनही हजारो वर्षे त्या छत्रपतींचं गुणगान गात उभे राहण्यास आम्हाला हातभार लावा.
आहे तुमच्यात ती ताकद , सळसळ करतंय रक्त अजूनही धमण्यात, पण त्यास बाहेर यायला मार्ग नाही.
येउद्या त्याला बाहेर अन व्हा सिद्ध आपल्या छत्रपतींचं गुणगान गायला….!
ज्यांनी आयुष्य पणाला लावून या महाराष्ट्राला उभा केल.
घुमू द्या हर हर महादेव ची गर्जना….!!
उठा जागे व्हा, वज्रमुठ बांधा एकीची…!!