महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,189

ट्रेक / भटकंती करण्यापूर्वी

By Discover Maharashtra Views: 2524 11 Min Read

ट्रेक / भटकंती करण्यापूर्वी –

सह्याद्री…प्रत्येकजण पहायला गेलं लहान थोर सगळेच जण या सह्याद्रीच्या प्रेमात.सह्याद्री हा एवढा भुरळ पाडतो की कधीकधी आपण या सह्याद्रीत वावरताना आपले भान विसरून अगदी मुक्तपणे बागडत सुटतो.पण कसंय निसर्गाशी मैत्री करावी पण त्याच निसर्गामध्ये वावरताना तेथील जे काही सह्याद्रीच्या कुशीत वावरणारे जीव आहेत त्यांन धोका न पोहचवता.(ट्रेक/भटकंती)

सध्याची पिढी पहायला गेली तर खुप बेभान होऊन पुढचा मागचा विचार न करता, आपल्या तब्येतीची किंवा सह्याद्रीमध्ये अचानकपणे घडणा-या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून बेभान भटकंती करत सुटते आणि कुठली दुर्घटना घडली तर स्वतःचा जीव जातोच, घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळतोच आणि शेवटी बदनाम होतो तो सह्याद्री व सह्याद्री परवतरांगांमध्ये बनलेले गडकिल्ले…

सध्या अशा दुर्घटना घडण्याचा जणू ब-यापैकी सपाटाच चालू आहे.लाॅकडाऊनमुळे घरी असल्यामुळे भटकंती करणा-याची शारीरीक क्षमता ढासळलेली असणारच. पण तरीही सह्याद्रीमध्ये वावरण्याचे भूत मानगुटीवरुन काही उतरणार नाही. कधी कधी सह्याद्रीत वावरताना असं दिसतं की फॅशनच्या वस्तू बॅगेत जास्त आणि प्रथमोपचाराच्या वस्तू बॅगेतून गायब असतात आणि मग अनपेक्षित दुर्घटना घडली तर एकतर जीवास मुकावे लागते आणि जीव वाचलाच तर घरच्यांकडून भटकंतीसाठी पूर्णविरामाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात येते. म्हणून सह्याद्रीमध्ये वावरताना  आपण पुढील काळजी घ्यावी व आपल्यासोबत कोणत्या वस्तू असाव्या जेणेकरून पुढे अनपेक्षित घडणा-या घटनांना आवर घालता येईल व भटकंतीचा आनंदही लुटता येईल.

ट्रेकिंग करण्यापूर्वी काही आवश्यक बाबी.

१. ट्रेकींग करताना फुलपॅन्ट,फुल टीशर्ट, शुज,टोपी, काठी,बॅटरी प्रत्येक ट्रेकरकडे असणे आवश्यक. ( वाटल्यास संस्थेने काठीची स्टार्टिंग पाॅईंटला अरेंजमेंट करून देणे.)

२. ट्रेक लिडर व जमल्यास सहभागी सदस्यांचा अपघाती विमा काढून घेणे आवश्यक.प्रत्येक सहभागी सदस्याचा कन्सेंट फाॅर्म भरुन घेणे.

३. ट्रेक लिडर हा अनुभवी हवाय.प्रत्येक गोष्टीत हजरजबाबीपणा व निर्णय घेण्याची क्षमता हवीय.ज्या ठिकाणी ट्रेक करणार आहोत तेथील गोष्टींची माहीती ट्रेक लिडरला हवीय.तेथे असणारे वन्य प्राणी,  साप याबद्दल ट्रेक लिडरला माहीती असली पाहीजे.

४. ज्या गावातून ट्रेक चालू होणार आहे व जेथे संपणार आहे तेथील गावातील निदान पाच लोकांचे संपर्क क्रमांक, सरपंचाचा संपर्क क्रमांक,  ३ गाडी ड्रायव्हर चा संपर्क, तेथे उपलब्ध असणा-या हाॅस्पिटल व क्लिनिक यांचा संपर्क क्रमांक व त्या ठिकाणी ट्रेकींगला उदभवणा-या अपघाती गोष्टींवर उपचार होईल का याची माहीती असणे आवश्यक आहे.जमल्यास एकतरी वाटाड्या सोबत असावा.

५. प्राथमिक उपचार किट व त्याच्या वापराबद्दल माहीती ही ट्रेक लिडरला असणे आवश्यक आहे.

६. संस्थेतील महत्वाच्या सदस्यांनी ट्रेक चालू होऊन ट्रेक संपेपर्यंत ट्रेक लिडरच्या संपर्कात असणे आवश्यक आहे.

७. ट्रेक स्टार्ट होणा-या गावामध्ये व ट्रेक संपणा-या गावामध्ये एक सदस्य वाॅकीटाॅकीसहित हजर असणे आवश्यक आहे.

८.ट्रेक लिडरने गवतातून जाताना काठीचा आडवा पट्टा मारत जाणे जेणेकरून काही असेल तर ते दूर जाईल.ट्रेक करताना , गवतातून चालताना बेफिकीर राहू नये.

९.कडेकपारीत हात घालताना आधी निदान जागा पाहून मग हात ठेवावा.

१०. ज्या ठिकाणी ट्रेक करणार आहोत तेथील रेस्क्यू संघटनांची लिस्ट व संपर्क क्रमांक असलेली लिस्ट ट्रेक लिडरकडे, वाॅकीटाॅकी असलेल्या गावातील सदस्यांकडे असणे आवश्यक.

११. सर्प ( विषारी,बिनविषारी, निमविषारी) किंवा अन्य वन्यप्राण्यांबद्दल पुर्णपणे माहीती असल्याशिवाय त्यांचे छायाचित्र घेण्यास जवळ जाऊ नये.

१२.ट्रेकला येणा-या सदस्यांना सक्त ताकीद देऊन ठेवायची की आपण ट्रेकला कुठपासून कुठपर्यंत जाणार आहोत याची पूर्णतः माहीती घरी देऊन यावे. तसेच ट्रेक लिडर व संस्थेतील दोन तीन सदस्यांचे संपर्क क्रमांक घरी द्यावेत.

१३.रात्री मुक्कामाला टेंट असणे अत्यावश्यक आहे. नसेल तर निदान मोकळ्या जागेमध्ये साफसफाई झोपावे.

१४.ट्रेकला येण्यापूर्वी संबंधीत ट्रेक लिडरला सदस्यांच्या आरोगयविषयक तक्रारी असतील तर त्याची माहीती, तसेच सदस्याकडे संबंधीत आजारावरील औषधे उपलब्ध आहेत का याची खात्री करून घेणे.

१४.स्टार्ट अथवा एंड पाॅईंटला एक चारचाकी बॅकअपसाठी असणे आवश्यक आहे.

१५.निसर्गामध्ये वावरताना निसर्गातील गोष्टींचा आदर करूनच त्यांचा आस्वाद घ्यावा.

१६.गडावरील संवर्धन कामे करताना जाड ग्लोव्ह्ज असणे आवश्यक.मातीमध्ये अथवा दगडाखाली हात घालताना बेफिकीर राहू नये.

१७. मुख्य गोष्टींकडे वळूया.

प्रत्येक ट्रेकरकडे प्रथमोपचार पेटीमध्ये निदान खालील साहीत्य असावे.
  1. A) हळद पावडर – जखम झाल्यास जखमेतून होणारा रक्तप्रवाह थांबविण्यासाठी जखमेवर हळद लावणे.जळू लागून रक्तप्रवाह होत असल्यास तेथे हळद पावडर किंवा लोध्र चुर्ण GUAZE SWAB ने धरून ठेवावे.( रक्तप्रवाह जर जास्त असेल तर लोध्रचुर्ण जखमेवर टाकून GUAZE SWAB वर धरून जखमेवर थोडे प्रेशर देणे जेणेकरून रक्तप्रवाह थांबण्यास मदत होईल.)

टीप : लोध्र चूर्ण आयुर्वेदिक औषधी मिळणा-या औषधालयात मिळेल.

  1. B) MEDICATED BANDAGE : जर शरीरावर हात पायाच्या ठिकाणी कापले गेले असल्यास तेथे मेडिकेटिड बँडेज लावावे.
  2. C) COTTON ROLL : जखम साफ करण्यासाठी कापूस वापरला जातो.
  3. D) GUMEE ROLL ( Small ) : याचा उपयोग जखम झाल्यास ती GUAZE SWAB सोबत बांधण्यासाठी तसेच जर एखादवेळी पडून अस्थिभग्न (FRACTURE ) झाल्यास, विषारी साप हात व पायावर चावल्यास विष शरीरात पसरू नये यामध्ये दंशठिकाणापासून वर बांधण्यासाठी उपयुक्त.
  4. E) ELECTRAL POWDER : उष्णतेने थकवा येऊन चक्कर येणे, अतिघाम येऊन व अतिसार होऊन थकवा येणे यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये ELETRAL POWDER चे एक सॅचेट मिक्स करून घ्यावे.

F ) LOPERAMIDE CAPSULES ( 2mg ) – जुलाबाचे वेग जास्त असल्यास १ कॅप्सूल कोमट पाण्यासह / साध्या पाण्यासह घ्यावी.

  1. G) CROCIN ADVANCE : ताप आला असल्यास १ गोळी पाण्यासह जेवणानंतर / अथवा काहीतरी खाऊन घेणे.
  2. H) देशी गायीचे तुप : तोंड आले असल्यास तोंडामध्ये तसेच त्वचेवर खरचटले असल्यास खरचटलेल्या भागावर देशी गायीचे तुप लावावे.
  3. I) मध : काटा लागला असल्यास त्याने जखम झाल्यास तेथे जखम साफ करून काटा काढून तेथे मध लावावे.
  4. J) पत्री खडीसाखर : घश्यामध्ये खवखवणे ,घसा सुकल्यासारखे वाटणे, अश्यावेळी पत्री खडीसाखरेचे तुकडे तोंडामध्ये चघळावे.
  5. K) स्वामिनी वातशामक तेल : ट्रेकिंग करताना लचक भरणे, मुरगळणे, गुडघे दुखणे, डोके दुखणे,खांदे दुखणे, कंबर भरून येणे अश्या वेळी स्वामिनी वातशामक तेल लावावे. चक्कर येत असल्यास व ट्रेकिंगमध्ये चालून श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तेलाचे २ ते ३ थेंब बोटावर घेऊन चोळून फक्त नाकाजवळ धरावे व नंतर नाकाच्यावर, छातीवर व पाठीवर चोळावे.
  6. L) नारळाचे तेल ( खोबरेल तेल) : ट्रेकिंग करताना चालून चालून पायाच्या जाघांमध्ये चोळण होते व त्यामुळे चालणे खुप कठीण होऊन जाते अक्षरशः एक एक पाऊल टाकणे कठीण होऊन जाते. अश्यावेळी ट्रेक चालू होण्यापूर्वीच नारळाचे तेल जांघांच्या भागावर चोपडणे व समजा जर तेल लावणे विसरून गेले असाल व चोळण झाल्यास नारळाचे तेल लावावे त्वरीत आराम मिळून तुम्ही पुन्हा आपला ट्रेक पूर्ण करू शकाल.
  7. M) HAND SANITIZER : ट्रेकिंग करताना पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना हात धुवण्यासाठी HAND SANITIZER चा वापर करावा. चार थेंब हातावर टाकून दोन्ही हात एकमेकांवर चोळावे.
  8. N) मीठ : मीठाचा उपयोग पावसाळ्यात जळू शरीराला लागली असल्यास जळूला शरीरापासून वेगळे करण्यासाठी होतो.तसेच जुलाब होत असल्यास साखर + मीठ यांचे पाण्यात मिश्रण करून घेतात.( एक लिटर पाण्याचे मिश्रणासाठी सहा चमचा साखर व अर्धा चमचा मीठ हे प्रमाण.)
  9. O) NEOSPORIN POWDER :पावसाळ्यात चालून जांघामध्ये चोळण होते व दोन दिवसाचा ट्रेक असेल तर अश्या वेळी जांघामध्ये असणारी चोळण चिघळू नये व जखम वाढू नये यासाठी ह्या पावडरचा उपयोग होतो. तसेच छोटी जखम रक्तप्रवाह नसल्यास अश्या ठिकाणी ही पावडर लावावी.
  10. P) DETTOL ANTISEPTIC LIQUID : ह्याचा वापर जखम साफ करण्यासाठी होतो. हे पाण्यामध्ये मिक्स करूनच मग जखम धुवण्यासाठी ते पाणी वापरावे. जखम साफ करताना SURGICAL COTTON ROLL चाच वापर करावा.
  11. Q) BETADINE OINTMENT : छोट्या जखमांच्या, किंवा कापलेल्या जागी याचा वापर करावा.

टीप: कोणत्याही जखमेवर अथवा कापलेला भाग हा साफ करुन सुकल्यानंतरच तेथे वरील उल्लेख केलेल्या सर्व ointment व पावडरींचा वापर करावा.

  1. R) ODOMAS CREAM : जंगलातून जात असताना डासांचे प्रमाण जास्त असल्यास अथवा मुक्कामाच्या ठिकाणी शरीराच्या उघड्या भागावर CREAM लावावे.
  2. S) GUAZE SWAB : जखम बांधण्यासाठी तसेच रक्तप्रवाह थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो.
  3. T) सुंठ पावडर : तापसदृश्य लक्षणे, अपचन अश्यामध्ये १ लिटर पाण्यामध्ये १ चमचा पावडर टाकून ते पाणी एक उकळी येईपर्यंत उकळवावे व कोमटच पाणी दिवसभर पिण्यासाठी वापरणे.
  4. U) लिंब: सतत तहान लागत असल्यास व पुढे पाणी अथवा स्वतः कडे पाणी नसल्यास लिंबू कापुन थोडे मीठ टाकावे तोंडात ठेवून त्याचा रस गिळावा.
  5. V) तुळशीची ओली पाने: विंचू दंश झाल्यास तेथे तुळशीच्या पानांचा रस लावावा. व पाने तोंडातल्या ठेवून चघळावीत व रस गिळावा.जवळ रूग्णालय असल्यास तेथे दाखवावे.
  6. W) नाकाचा घोणा फुटून रक्त येत असल्यास नाकामध्ये दुर्वाचा रस ५ -६ थेंब टाकावा. हे नसल्यास खडिसाखरेचे पाणी, देशी गायीचे तुप ( कोमट करून ) ४-५ थेंब नाकपुडित टाकावे व GUAZE SWAB ने नाक बोटांच्या चिमटीत पकडावे जेणेकरून नाकावर दबाव येऊन रक्तप्रवाह थांबेल.

X ) साप चावल्यास प्रथम तो साप विषारी आहे कि बिनविषारी, निमविषारी हे ओळखावे. जमल्यास सापाचे फोटो घेणे. दंशस्थानापासून ते साधारण एक हातभर वर GUMJEE ROLL / CRAPE BANDAGE गुंडाळून वर पर्यंत बांधणे. बांधताना GUMJEE ROLL / CRAPE BANDAGE व त्वचेमध्ये साधारण एक बोट जाईल एवढी जागा सोडावी. एकदम घट्ट बांधू नये. जेणेकरून साप विषारी असल्यास रक्तप्रवाहामार्फत शरीरात विष पसरू नये. ज्याला सर्पदंश झाला आहे त्याला धीर देणे महत्वाचे. कारण ब-याच वेळा मानसिक धक्क्याने सुद्धा प्राण जातो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस पाणी देणे.त्यानंतर त्वरीत हालचाल करून त्यास सरकारी रूग्णालयात अथवा जवळील रूग्णालयात हालविणे जेथे सर्पविषाची चिकित्सा होत असेल.साप चावल्यापासून प्रथम २ तासात योग्य ते उपचार मिळणे आवश्यक असते.

तसेच TORCH (बॅटरी), PLUCKER (चिमटा), SMALL SCISSOR (कैची), व SMALL KNIEF ( छोटा चाकू ), CANDLE (मेणबत्ती) , MATCHBOX (माचीस) अथवा आपल्या बॅगमध्ये असणे आवश्यक आहे.

अशा त-हेने आपण सर्व खबरदारी घेऊन जर भटकंती केली तर सह्याद्रीतील भटकंतीचा आनंद नक्कीच घेता येईल.

टीप: आपणास वरील वस्तूंचे फोटो पहावयाचे असल्यास गुगलला सर्च करणे.

–   डाॅ.अक्षय ठाकूर ( विरार )

Leave a Comment