महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,367

मरहट्टी साम्राज्यातील पट्टीजन/पाटील यांच्या शोधात भाग २

Views: 1381
3 Min Read

मरहट्टी साम्राज्यातील पट्टीजन/पाटील यांच्या शोधात भाग २ –

नमस्कार, हाटकर संस्कृतीत बाराहट्टी घराण्यांमध्ये ज्याचं नाव मोठ्या अभिमानान घेतलं जाते ते म्हणजे ‘थोरात’ पाटलाच घराण याच कुळाच्या महारणवार आणि लोखंडे, खटके या भावकीने इतिहासात पराक्रम गाजवले आहेत, पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य बंडखोर, लुटारू म्हणूनच हिणविले गेले. पुणे जिल्ह्यातील हिंगणगाव, मिरवडी या गावातून जाताना थोरात घराण्याची श्रीमंती, पराक्रमाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला साद घालतात. मी आणि प्राध्यापक संतोष पिंगळे सर हिंगणगावला भेट द्यायला निघालो, त्यात आम्हाला श्री. अर्जुनराव थोरात पाटील यांची मोलाची मदत लाभली. थोरात घराण्याच्या प्राचीनत्वविषयीचा इतिहास इ.स. सन १२०५ पर्यंत असल्याची ऐकीव माहिती मिळते, तसेच या संबंधाने गिनीज बुकमध्ये नोंद होणार होती असेही समजते, परंतु आज पुराव्याअभावी थोरात पाटील घराण्याचा बराच इतिहास दडून आहे.

प्राध्यापक संतोष पिंगळे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार थोरात घराण्याच्या माहितीसाठी पुरालेखागार, पुणे येथील अस्सल कागदपञ उदा. संरजामपञ, वतनपञ, सनदा, आज्ञापञ, राजपञ इत्यादी. छञपती सातारा व पेशवे दफ्तरातील अस्सल कागदपञांचा आधार घेण्यात आला आहे. याच घराण्यातील एक वीर पुरुष येसाजीराव थोरात हे शिवाजी राज्यांच्या काळात स्वपराक्रमाने नावारूपाला आले. त्याबदलात महाराजांनी त्याला सरदारकी देऊन त्याचा गौरव केला. थोरात घराण्यात होऊन गेलेल्या वीर व पराक्रमी सरदारांची नावे सरदार येसाजी थोरात, देवजी, तावजी, संताजी, दमाजी रूस्तूमराव, राजजी, चंद्रभान, खंडोजी रूस्तूमराव. दमाजी थोरातांनी त्यांच्या ‘रुस्तुमराव; किताबाचा उल्लेख त्याच्या शिक्क्यात हि केलेला दिसतो. त्याशिवाय त्यांच्या नामे देण्यात आलेल्या कित्येक सनद पत्रांमध्ये हि दमाजी थोरात रुस्तुमराव असेच उल्लेख आढळतात. काही कागद पत्रांमध्ये त्यांचा ‘दमसिंग’ असाही उल्लेख आढळतो.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात थोरात मंडळींची पाटीलकीची वतन गावे आहेत, त्यात प्रामुख्याने हिंगणगाव प्रसिद्ध आहे. हिंगणगावात थोरात पाटील घराण्याच्या ३ गढ्या दिसल्या, त्यातील २ गढ्या पूर्ण उध्वस्त असून डोंगर पठारावर आता फक्त युद्धाच्या खुणा दिसून येत आहेत, १ गढी आजही अस्तित्वात असून तिचे तीन बुरुज अर्धवट असे मातीच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. या गढीचे संवर्धन केल्यास पूर्ण गढी दिसून येईल. याच गढीत भट घराण्यातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना सरदार दमाजी थोरात यांनी कैदेत ठेवले होते. गावात एक प्राचीन शिवमंदिर असून तिथे वीरगळी हि अस्तित्वात आहेत, त्यांची परिस्थिती तर फार वाईट आहे. तसेच आत्तापर्यंत गावात ३ समाध्या सापडल्या असून त्यांची अवस्था सुद्धा बिकट आहे. आणि २ जुन्या बारव असून १ बारव आम्हाला पाहायला मिळाली, ती शिवलिंगाच्या आकारात बांधलेली आहे. त्या काळात बारवपासून गढीपर्यंत पाणी नेण्याची सोय केली होती असा जुना बोल असल्याची माहिती श्री. अर्जुन थोरात यांच्या आजीनी दिली.

माहिती आणि फोटो सौजन्य- सुमितराव लोखंडे

Leave a Comment