महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,589

मरहट्टी साम्राज्यातील पट्टीजन/पाटील यांच्या शोधात भाग ३

By Discover Maharashtra Views: 1365 3 Min Read

मरहट्टी साम्राज्यातील पट्टीजन/पाटील यांच्या शोधात भाग ३ –

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात कारेपूर, हारवाडी, कोळगाव या ठिकाणी हाटकर घराणे हाके पाटील यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर भोकरंबा, टाकाळगाव, आसराचीवाडी आणि कारेपूरमध्ये हाके ची काही घरे आहेत. याच भागात पाटीलकि परंपरा असणारे वाघमोडे, नरोटे, देवकाते, बंडगर हि हाटकर घराणी सुद्धा आहेत. मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीप्रमाणे चालुक्यांचे मांडलिक राष्ट्रकूट यांचा पहिला ज्ञात राजा दंतिदुर्ग ह्याचे मूलस्थान लातूर असल्याचे उल्लेख कोरीव लेखांतून मिळतात. त्यांत लातूरचा उल्लेख लट्टलूर असा केला आहे. पुढे राष्ट्रकूटांचा राजा पहिला अमोघवर्ष (सु. ८०८ -८८०) याच्या आधिपत्याखाली ते काही वर्षे होते.

लट्टलूर म्हणजेच लातूर हे राष्ट्रकुट घराण्याचे मुलस्थान असल्याचा उल्लेख मिळतो. पुढे हे घराणे उत्तर महाराष्ट्रात विदर्भात गेले असावेत. राष्ट्रकूट राजे स्वतःला लट्टलूरपुरवराधीश हे बिरूद लावीत. पहिल्या अमोघवर्षाच्या सिरूर आणि निलगुंड ताम्रपटांतून लट्टलूर हे एक उत्तम नगर असल्याचा उल्लेख मिळतो. राष्ट्रकूटांच्या पाडावानंतर उत्तर कालीन चालुक्यानी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांवर प्रभुत्व प्रस्थापिले. त्यानंतर हा प्रदेश देवगिरीच्या यादवांनी घेतला. यादवांच्या पतनानंतर तो मुसलमानांच्या ताब्यात गेला. त्यानंतर या भागात राज्य करणारी अनेक पराक्रमी घराणी हि निजामादि शाह्यांमध्ये पराक्रम गाजवू लागली, त्यातीलच एक हाके पाटलांचं घराण ज्यांचे उल्लेख मराठेशाहीत हि मोठी कामगिरी केल्याबद्दल आढळतात.

आमचे मित्र आणि इतिहास संशोधक श्री. राजेनरेशजी जाधवराव यांनी दिलेल्या माहितीनुसार रेणापुरमध्ये हाके घराण्याचा वाडा खुप भव्य होता. परंतु आज त्याची पडझड झालेली आढळते. रेणापुर येथे छत्रपती शाहु महाराज यानी हाटकर सरदार मानसिंहराव हाके याना इनाम मोकासा दिलेले होते. रेणापुर येथे हाके घराण्याच्या दोन समाध्या देखिल आहेत. या समाध्या म्हणजे अप्रतिम शिल्पकलेच्या अजोड नमुनाच आहेत. परंतु सदरील समाध्यांची खुपच दुरावस्था आहे. सदरील समाधी मानसिंहराव हाके व त्यांच्या पत्नीच्या असु शकतील. तसेच, गिरजोजी हाके नामक सरदारांचा उल्लेख चंद्रसेन जाधवराव यांचे पुत्र राजे रामचंद्रराव यांच्या पत्रातील असुन ते निजामाकडेच होते. मानसिंहराव यांचा उल्लेख चंद्रसेनरावाच्या काळातील आहे. गिरजोजी हे मानसिंहरावांचे पुत्रच असले पाहिजेत.

माझ्या अभ्यासानुसार लेखक रेड्डी आणि पलसोकर यांनी त्यांच्या ‘Bajirao I: an outstanding cavalry general’ या पुस्तकात निजाम आणि थोरले बाजीरावांच्या संदर्भात सरदार निंबाळकर सोबत मानसिंहराव हाके यांचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर कुलकर्णी लिखित ‘Battle of Kharda: Challenges and Responses’ या पुस्तकात देखील हाटकर सरदार रुस्तुमराव पांढरे सोबत सरदार मानसिंहराव हाके यांचा उल्लेख आहे, बहुतेक खरड्याच्या लढाईत त्यांनी सुद्धा पराक्रम गाजवला असणार पण आज ते इतिहासाला अज्ञात आहेत.

फोटो सौजन्य- श्री. राजेनरेशजी जाधवराव
माहिती साभार- सुमितराव लोखंडे

Leave a Comment