महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,007

मरहट्टी साम्राज्यातील पट्टीजन/पाटील यांच्या शोधात भाग ५

Views: 1421
6 Min Read

मरहट्टी साम्राज्यातील पट्टीजन/पाटील यांच्या शोधात भाग ५ –

‘लोखंडे’ पाटील घराण्याच्या गावांपैकी फलटण तालुक्यातील ‘ढवळ’ हे मल्लांच/ पैलवानांच गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मुळामुठा नदीकाठच्या हिंगणगाव वगेरे प्रदेशातील थोरात पाटील घराण्यांचे कुळीचे भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोखंडेच्या मूळ पुरुषाविषयी सध्यातरी काही माहिती उपलब्ध नाही. ढवळशेजारील वावरहिरेचे पांढरे, दुधेबावीचे सोनवलकर, माळशिरसचे वाघमोडे हि सर्व लोखंडे घराण्यांची सोयरिक मंडळी ज्यांचा मध्ययुगीन इतिहासात मोठा दबदबा दिसून येतो, परंतु कागदपत्रांच्या अभावी आज लोखंडे घराण्याचा इतिहास अपरिचित राहिला आहे.

लोखंडे नाव कसे प्राप्त झाले याविषयी ‘महा रणवार’ यांच्याप्रमाणेच एक लोककथा प्रचलित आहे, थोरात कुळातील काही मंडळीनी युद्धात लढताना लोखंडाच्या तलवारी तुटल्यावर मनगटातील बळावर हातानेचे शत्रूशी युद्ध खेळले, त्यामुळे त्या टोळीला लोखंडे म्हटले गेले. या कथेचा काहीही काल निश्चित नाही, किंवा पुरावा नाही, पण ढवळ गावच्या मल्ल/पैलवान लोखंडे मंडळींकडे बघून हे कोणालाही जाणवेलच. १९८१ साली सातारा जिल्ह्याला पहिली मानाची गदा मिळवून देणारे पैलवान श्री. बापूराव लोखंडे पाटील हे वतनदार घराण्यातील आहेत. फक्त लष्करीच नाही तर पारंपारिक बाबतीतसुद्धा लोखंडे पाटील घराण्याने नाव कमावले आहे. २६ जानेवारी १९६९ साली पांगरी येथून दिल्लीला गजी मंडळ नेऊन लोखंडे आणि इतर मंडळीनी धनगरी नृत्याचा कार्यक्रम करून चांदीची ढाल मिळविल्याची माहिती ओविकार श्री. तानाजी केरु लोखंडे पाटील यांनी दिली, तसेच, त्या आठवणीचा एक फोटो देखील उपलब्ध करून दिला आहे. योगायोगाने या घटनेला उद्या २६ जानेवारी २०१६ रोजी ४६ वर्षे पूर्ण होत आहेत.

लोखंडे घराण्याच्या एकूण पाच शाखा आत्तापर्यंत मिळाल्या असून या गावांमध्ये त्यांची संख्या बहुल आहे. यापैकी ढवळ आणि बोरवंड बु. च्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद आजही लोखंडे घराण्याकडे असून पांगरी आणि पिरंजी गावची मूळ पाटीलकी लोखंडेकडेच आहे. मी साताऱ्यातील ढवळ आणि लोखंडे वस्ती, पांगरी या गावाना अभ्यासभेटी दिल्या आहेत, त्याठिकाणच्या लोखंडे पाटलांचा इतिहास शक्य तितका मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

१) गाव ढवळ, ता. फलटण, जि. सातारा
२) गाव पांगरी (लोखंडे वस्ती), ता. माण, जि. सातारा
३) गाव बोरवंड बु, ता. जि. परभणी
४) गाव पिरंजी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ
५) गाव शिरणाळवाडी जि. बेळगावी, राज्य- कर्नाटक

संशोधक वीरेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार ढवळ आणि धनगर यांचा जुना संबंध असून गावात अजपाल, गोपाल, धनपाल आणि रणधवल हे चार राजे होऊन गेले. सध्या तेथील लोकांना ‘लोखंडे धनगरा’ म्हणून ओळखले जाते असेहि त्यांनी पुढे नमूद केले आहे. या माहितीला आत्तापर्यंत मला काहीही संदर्भ मिळालेला नसून गावातील लोककथानुसार ‘धवल’ नामक राजाच्या नावावरून ढवळ हे नाव गावाला पडले आहे. ढवळ गाव ज्या प्रांतात येते तो म्हणजे फलटण प्रांत हा महानुभाव साहित्यात ‘पालेठाण’ म्हणून उल्लेखीला आहे. त्यामुळे ढवळ गावातील ‘पाल’ नामक प्रत्यय असणाऱ्या राजांबद्दल अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. ढवळ गावातील हेमाडपंथी सदृश शैली असणारे मंदिर आणि तेथील प्राचीन वीरगळी पाहिल्यावर लोखंडेंची वसाहत किती प्राचीन असेल याचा अंदाज येतो. यादवकाळात (इ.स.पू. १००० ते १४००) फलटण भागात अनेक मंदिरे बांधली गेली असून काहींचे भग्नावशेष अद्यापि आढळतात. कालदृष्ट्या जबरेश्वर मंदिर हे प्राचीन असून ते बाराव्या शतकात बांधले असावे. जबरेश्वर व श्रीचंद्रप्रभू ही मूळची जैन मंदिरे असावीत. मंदिराच्या वास्तुशिल्पशैलीवर द्राविड, विशेषतः दक्षिणेकडील होयसळ शैलीची, छाप आढळते.

ढवळ आणि पांगरी गावांवर कितीही आक्रमण आली तरी तेथील लोखंडे पाटलांनी जोरदार संघर्ष केलेला दिसून येतो, याचेच प्रतिक म्हणून आजही ढवळमध्ये दोन वीर पुरुषांच्या मोठ्या समाध्या असून त्याच्याच पाठीमागे दोन सतीची स्मारके आहेत त्यावर तुळशी वृन्दावने दिसतात. यावरून लोखंडे पाटलांची लष्करी परंपरा ध्यानात येते. तसेच, गावात दोन जुने मोठे वाडे असून आजही लोखंडे घराण्यातील पाटील मंडळी त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गावात हेमाडपंथी सदृश शैली असणारे शिव मंदिर असून मंदिराचे बांधकाम हे महाराष्ट्र केसरी पै. बापूसाहेब लोखंडे पाटील यांनी करून घेतलेले आहे. मंदिराच्या आवारात अनेक वीरगळी वाईट अवस्थेत पडलेल्या आहेत, कदाचित आजही त्या गोधन, स्वराज्यासाठी लढलेल्या लोखंडे पाटलांनी केलेला संघर्ष सांगत चिरंतर उभ्या आहेत असे वाटते. त्याचबरोबर माण तालुक्यातील पांगरीच्या लोखंडे वस्तीत अनेक वीरगळी, शिल्पे सापडली असून तिथेदेखील लोखंडे पाटलीनीचां पार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी दोन सती समाध्या होत्या, पण आज बिरोबा मंदिर बांधकामात त्यांचे अस्तित्व नष्ट झाले असून त्याच मंदिराच्या पाठीमागे लोखंडे घराण्यातील एक सतीचे स्मारक चांगल्या अस्वस्थेत असून त्याच्याच शेजारी वीरगळी आणि दडस या लोखंडेच्या पुजारी घराण्याची शिल्पे इतस्तः पसरलेली आहेत. पांगरी गावापासून काही अंतरावर तोंडले/टाकेवाडी गावात एका शिखरावर सतोबा- बिरोबा नामक देवस्थान असून तेथील पुजारकीचां मानं हा लोखंडे घराण्याकडून दडस मंडळीना देण्यात आला होता, तेव्हापासून दडस आणि लोखंडे कुळीचेभाऊ प्रमाणे मानीत असल्याचे सांगितले जाते.

आत्तापर्यंतच्या अस्सल पुराव्यानुसार मराठेशाहीच्या कालखंडात लोखंडे पाटलांना पांगरी आणि ढवळ गावची वतने, इनाम करार करून देण्यासंबंधीची पत्रे छत्रपती शाहू महाराजांच्या दफ्तरात आढळतात. त्यामध्ये होनाजी लोखंडे पाटील आणि जोगोजी लोखंडे पाटील या दोन योध्यांची नावे आढळतात. लोखंडे पाटील योध्यांनी मधल्या कालखंडात मोठे पराक्रम गाजविले असणार हे निश्चित परंतु अपुऱ्या साधनांमुळे बराच इतिहास परिचित नाही, तरी शक्य तितका इतिहास अभ्यासण्याचा/शोधण्याचा पुढेही प्रयत्न करू. आणि गावातील काही अति महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी राहिल्या असून लवकरच त्यांची भेट घेऊन अभ्यासात्मक माहिती मिळविण्यात येईल. ढवळ गावचे विद्यमान सरपंच पै. श्री. आप्पा लोखंडे पाटील यांनी आमच्या विनंतीला मान देऊन प्राचीन वास्तूंचे काम त्वरित सुरु करण्यात येईल असे सांगितले आहे, त्याबद्दलचे त्यांचे हार्दिक आभार, आणि ढवळचे श्री. सुमितराव लोखंडे पाटील यांचे देखील विशेष आभार. त्याचबरोबर लोखंडे वस्ती, पांगरी येथील वस्ती शाळांचे महाराष्ट्र, संघटक प्रमुख श्री. धनाजी लोखंडे पाटील आणि डॉ. श्री. विजयराव लोखंडे पाटील, पांगरी गावचे प्राचीन पुजारी घराण्यांपैकी एक श्री. महेंद्रराव दडस यांनी तेथील प्राचीन शिल्पे, वीरगळी यांच्या संवर्धनासाठी शक्य ते प्रयत्न करू असे सांगितले आहे.

माहिती आणि फोटो सौजन्य- सुमितराव लोखंडे,ठाणे.

Leave a Comment